झुमरुची मदत...

दिंनाक: 20 Jul 2019 17:35:54


एक मोठं जंगल होतं. त्यात वेगवेगळी झाडं, वेली, छोटी-छोटी झुडपं होती. या झाडांवर लाल, पिवळी, निळी, केशरी वेगवेगळ्या रंगांची छान छान फुलं होती. त्या फुलांमधला मध गोळा करायला वेगवेगळे कीटक यायचे. त्यात भुंगा, फुलपाखरे, मधमाश्या, मुंगळे या सर्वांची ये-जा असायची. या जंगलात एक छोटसं फुलपाखरू त्याच्या आई-बाबांच्या बरोबर राहायचं. त्याचं नाव होतं झुमरू. झुमरूचे आई-बाबा मध गोळा करायला दिवसभर लांब जायचे. त्यामुळे घराच्या आजूबाजूला झुमरू एकटाच फिरायचा. त्याची भुंगा, मधमाश्या, मुंगळे सार्‍यांशीच खूप मैत्री झाली होती. त्यांच्याबरोबर तो खेळायचा, बागडायचा.

एकदा झुमरूला घराजवळ उडत असताना कोणाच्यातरी रडण्याचा आवाज आला. त्या आवाजाच्या दिशेने तो गेला; तेव्हा त्याला म्हातारे मुंगी आजी-आजोबा रडताना दिसले. त्याने त्यांना रडण्याचं कारण विचारलं. ते म्हणाले, ‘‘आम्ही आमच्या मुला-बाळांबरोबर चालत होतो. अचानक जोराचं वादळ आलं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पालापाचोळा उडाला. या वादळामुळे आम्ही जखमी झालो. आमचे सर्व नातेवाईक इकडे-तिकडे पळाले. पण, आम्ही दोघं म्हातारे, आम्हाला पळता येत नाही आणि दिसतंही कमी, त्यामुळे आम्हाला घरही सापडत नाही. दोन दिवस आम्ही उपाशी आहोत.’’ हे ऐकून झुमरूला खूप वाईट वाटलं. त्याला त्या आजी-आजोबांची दया आली. त्याने आपल्या एका पंखावर मुंगी आजीला व एका पंखावर आजोबांना बसायला सांगितलं आणि त्यांना थेट आपल्या घरीच नेलं. घरी आल्यावर झुमरूने आईला सर्व कथा सांगितली आणि त्यांना आपल्याच घरी ठेवून घेण्याचा हट्ट धरला. झुमरूच्या आईनेही याला लगेच मान्यता दिली. ती म्हणाली, ‘‘बरं झालं, नाही तरी आमचा झुमरू दिवसभर एकटाच असायचा. त्याच्याकडे आता आजी-आजोबांचं लक्ष राहील. तुम्हालाही घर मिळेल आणि आम्हालाही तुमची सोबत होईल.’’ हे ऐकून झुमरूला खूप आनंद झाला. नंतर तो रोज मुंगी आजी-आजोबांची सेवा करायचा. त्यांना पानावर सोंडेतून मध आणून द्यायचा. नंतर आपल्या पंखांवर बसवून फिरवून आणायचा.

एकदा तो मुंगी आजी-आजोबांना पंखांवरून नेत असताना त्याला एक गोष्ट दिसली. एक माणूस कुर्‍हाडीने मोठं झाड तोडत होता. त्या झाडावर पक्ष्यांची घरटी होती. त्या घरट्यात छोटी-छोटी पिल्लं होती. त्या कुर्‍हाडीच्या घावांमुळे झाड खूप हादरायला लागलं. सगळी पिल्लं घाबरून रडायला व ओरडायला लागली. झुमरूला त्यांची दया आली. त्याला एक युक्ती सुचली.

झुमरूने आजी-आजोबांना काही तरी सांगितले. त्या माणसाच्या पायाशी त्यांना सोडून तो पटकन उडत गेला. इकडे मुंगी आजीने त्या माणसाच्या एका पायाला कडकडून चावा घेतला आणि मुंगी आजोबांनी दुसर्‍या पायाचा चावा घेतला आणि पटकन एका पानाखाली लपून बसले. तो माणूस जोरजोरात पाय आपटत ओऽऽयऽ ओऽऽयऽ ओरडत नाचायला लागला. इकडे झुमरूने उडत जाऊन आपल्या मैत्रिणी मधमाश्यांना ओरडून बोलावले. त्यांनी त्या माणसाला चावून चावून त्याचा चांगलाच समाचार घेतला. त्या माणसाची चांगलीच त्रेधा उडाली. तो ब्रेकडान्स करतच पळत सुटला.

त्याची झालेली फजिती पाहून झुमरू, मधमाश्या, पक्ष्यांची पिल्लं, आजी-आजोबा सगळेच पोट धरून हसत सुटले. मग सगळ्यांनी फेर धरला व आनंदाने नाचायला व गाणं म्हणायला लागले.

आयडिया भारी झुमरूची

फजिती झाली माणसाची!

- जयश्री एडगावकर