‘‘ताई, आता हिवाळा आहे, आज रात्री हे इडलीचं पीठ बाहेरच ठेवा, फ्रीजमध्ये ठेवू नका, नाहीतर फुगणार नाही आणि सकाळी इडल्या चांगल्या होणार नाहीत!’’

‘‘हे बघ, मी या पातेल्याला चुंबक लावून बघणार.. चिकटलं तर समजेन की, तू काही स्टेनलेस स्टीलची भांडी विकत नाहीस... मग काही मी ते पातेलं विकत घेणार नाही बरं!’’

‘‘आई, तू दादाला सांग की, या पिझाचे समान चार भाग कर आणि प्रत्येकाला एक एक दे... तो स्वतःला मोठा वाटा घेतोय आणि मला छोटा देतोय...’’

अशी अनेक वाक्ये आपण रोज जाता-येता बोलत असतो. अशा अनेक ठिकाणी आपण विज्ञानाचा आधार घेत असतो, हे मात्र आपल्याला चटकन लक्षात येत नसतं. पण आपण निरीक्षण केलं, तर हे विज्ञान सहज लक्षात येईल.

वरील संवाद परत एकदा बघू.

पहिल्या संवादात इडलीचं पीठ विकताना विक्रेता सल्ला देतो आहे की, हे पीठ रात्रभर बाहेर ठेवा. फ्रिजमध्ये ठेवू नका. नाहीतर इडल्या छान फुगणार नाहीत. यामागचे कारण  असे की, कमी तापमान असल्यास या पिठात असणारे लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया जास्त वाढू शकत नाहीत. त्यामुळे पीठ जास्त आंबत नाही व फुगत नाही. पण जास्त तापमानात या बॅक्टेरियांची चांगली वाढ होते व पीठ फुगते.

दुसर्‍या संवादात ग्राहक दुकानदाराला सांगत आहे की, तुझ्याकडच्या पातेल्याला मी चुंबक (मॅग्नेट) लावून बघेन. जर ते चिकटले, तर पातेले काही स्टेनलेस स्टीलचे नाही. कारण ग्राहकाला माहीत आहे की, स्टेनलेस स्टीलच्या भांड्याला चुंबक चिकटत नाही, लोखंडाला मात्र चिकटते. लोह धातूला चुंबक चिकटते. मात्र त्यात विशिष्ट मात्रेत निकेल व क्रोमियम घातले आणि त्यावर प्रक्रिया केली की, स्टेनलेस स्टील मिळते. त्याला मात्र चुंबक चिकटत नाही आणि अर्थातच, स्टेनलेस स्टील असल्याने त्या भांड्याला गंजही चढत नाही.

तिसर्‍या संवादात एक छोटी मुलगी आईकडे दादाची तक्रार करते आहे. दादाने पिझाचा मोठा तुकडा स्वतःसाठी घेतला असे ती सांगते आहे. याचा अर्थ एका गोलाचे चार समान भाग केले; तर ते कसे दिसतील, हे तिला माहीत आहे. त्यामुळे दादाने असमान भाग करून आपल्याला छोटा दिला आणि स्वतः मोठा घेतो आहे, हा फरक तिला दिसतो आहे!

खरं तर आपल्या घरातच इतके विज्ञान आजूबाजूला असते. स्वयंपाक घरातील रसायनशास्त्र (Kitchen Chemistry) हा विषय तर खूप प्रचलित आहे. घरात तुमच्या आईला, आजीला या किचन केमिस्ट्रीच्या अनेक गमती-जमती ठावूक असतात. पदार्थ शिजवताना किती पाणी घालावे, किती उष्णता द्यावी, शिजायला किती वेळ लागू शकतो, हे त्यांना अनुभवाने माहीत असते. पदार्थांचे रंग नैसर्गिकरीत्या कसे टिकवावेत, हेही त्यांना माहीत असते.

 पदार्थ टिकवावेत कसे, या विषयात तर भारतीय स्त्रियांचा हात कुणी धरू शकणार नाही! काही पदार्थ उन्हात वाळवून, काही तळून, काही गोठवून तर काही बारीक पूड करून टिकवले जातात. उदा., पापड, आंबापोळी, कुरड्या हे पदार्थ उन्हाळ्यात कडक उन्हात वाळवून ठेवले जातात. तळलेल्या पुर्‍या 2-3 दिवस राहू शकतात. मटारचे दाणे आणि मांस असे पदार्थ डीप फ्रिजमध्ये काही दिवस/महिने टिकतात. तसेच, आमचूर पूड, पुदिना पूड पुष्कळ महिने टिकते.

साबणाने त्वचेचा, कापडाचा तेलकटपणा निघून जातो, हळदीचा डाग पडलेल्या कपड्याला साबण लावला की, तो लाल दिसतो अशाही छोट्या-छोट्या रासायनिक प्रक्रिया घरात आपण नेहमी बघतो. अ‍ॅसिडिटी झाली की, आपण इनोसारखे काही प्यायले, तर बरे वाटते. कारण  पोटातल्या अ‍ॅसिडची आणि इनोतील बेसची अभिक्रिया होऊन पाणी व एक प्रकारचे मीठ तयार होते. (उदासीनिकरण - Neutralization )

मित्राला लांबून हाक मारायची असेल, तर आपण सहजच हाताचा शंकू (Cone) करतो, कारण त्याद्वारे ध्वनिलहरी लांबवर पोहोचतात. गाडीवर जाताना खड्डा आला, तर आपण आपला वेग कमी करतो. कारण त्यामुळे धक्का जोरात बसत नाही, तसेच गाडीचे शॉक अबसोर्बरही त्यासाठी मदत करतात. हे आपण रोज अनुभवतो. आपल्या घरातील सर्व गॅजेट्स तर इलेक्ट्रॉनिक्सची चालती-बोलती उदाहरणे आहेत!

 अनेकांना गणिताची भीती वाटते. पण खरं तर आपण रोज गणिताचा भरपूर वापर करत असतो. काही वस्तू खरेदी करताना, भाजीचे वजन करून घेताना, डिस्काउंट किती टक्के मिळतोय हे पडताळून पाहताना, घड्याळ पाहून वेळ सांगताना, क्रिकेटचा चुरशीचा सामना बघताना आपण गणिताचाच वापर करत असतो. शिवाय काही प्रसंगी अमुक एक गोष्ट झाली तर असे होईल आणि नाही झाली तर तसे होईल, हा विचार करत असताना आपण तर्क, ‘लॉजिक’ वापरतो. बातम्या बघताना तर्क वापरून आपण काही निष्कर्ष काढतो. बाहेरची चार कामे करून घरी यायला कोणता रस्ता बरा पडेल, याचा निर्णय घेतानाही आपण असाच तर्क वापरतो.

या सार्‍या विज्ञान-गणिताच्या शाखा-उपशाखा आहेत.

ही सर्व उदाहरणे उपयोजित विज्ञान (Applied Science)ची आहेत. अशी अनेक उदाहरणे तुम्हाला तुमच्या घरात, अंगणात, आजूबाजूला सापडतील.

येत्या विज्ञानदिनाच्या निमित्ताने अशी काही उदाहरणे शोधून तुम्ही मला पाठवू शकता का? मी तुमच्या इमेल्सची वाट बघते आहे.

- अपर्णा जोशी