गगन सदन तेजोमय

दिंनाक: 02 Jul 2019 15:06:08


 

काही काही गाणी ही समजून घेऊन शिकावीत अशी असतात. त्यातही आपल्या मराठी भाषेतसुद्धा सुंदर प्रार्थना आहेत, ज्या दिग्गज लोकांनी लिहिल्या आणि दिग्गज लोकांनी संगीतबद्ध करून गायल्या आहेत, त्या चित्रपटांतदेखील वापरल्या आहेत आणि त्यामुळे त्या आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत.

आता अशी गाणी नुसती ऐकली तरी छानच वाटतात. परंतु त्याचा जर आपण वेगवेगळ्या दृष्टीकोनातून विचार केला, त्या गाण्याचे रसग्रहण केले, तर त्या गाण्यातून मिळणारा आनंद द्विगुणीत होतो आणि त्या गाण्यातून आपल्याला शिकायलादेखील मिळते. आता रसग्रहण म्हणजे नक्की काय करायचे. आम्ही तर बाबा नुसते गाणे लावतो आणि ऐकतो आणि वाटले तर पाठसुद्धा करतो. मग अजून काय करायचे बरे? तर आपण एक प्रार्थना घेऊ आणि तिचे रसग्रहण करू या, म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे गाणे ऐकताना त्याला किती पैलू पडतात ते. कदाचित नंतर याच गाण्याचे माझ्यापेक्षा जास्त पैलू तुम्हाला दिसतील. कारण प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळी समज असते, प्रत्येक व्यक्तीची विचारांची ताकद वेगळी असते, प्रतिभा वेगळी असते. तर मी इथे एका गाण्याचे रसग्रहण करते. नंतर तुम्हीसुद्धा तुम्हाला या गाण्याविषयी जे जाणवेल ते लिहा.

‘गगन सदन तेजोमय’ हे गाणे बर्‍याच जणांनी ऐकले असेल. तर हे ‘उंबरठा’ चित्रपटातील गाणे आहे. हे लिहिले आहे गीतकार वसंत बापट यांनी. याचे जे अत्युच्च दर्जाचे संगीत आहे ते संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी दिले आहे आणि ते गायले आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या लता दीदींनी.

हे गाणे ‘तिलक कामोद’ या रागावर आधारित आहे. पूर्वीची गाणी ही एखाद्या रागावर आधारित असायची आणि म्हणून ती इतक्या वर्षांनंतरसुद्धा अजरामर राहिली आणि ती अवीट गाणी वर्षानुवर्षे मनात घर करून राहतात, विसरली जात नाहीत. हीच या शास्त्रीय संगीताची किमया आहे. शास्त्रीय संगीतामुळे या गाण्यांवर एक प्रकारचा संस्कार होतो.

‘गगन सदन तेजोमय तिमिर हरून करुणाकर

दे प्रकाश देई अभय’

हे या गाण्याचे धृवपद आहे. हे गाणे भगवंताला उद्देशून गायले आहे. भगवंत म्हणजे आपले श्रद्धास्थान; मग ते कोणतेही असू शकते. याचा अर्थ असा की, ‘हे दयाघना, तेजोमय परमेश्वरा, तुझ्या नभरूपी सदनातून आम्हाला प्रकाश दे, अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दे, आमची भीती घालव, आम्हाला निर्भय बनव. म्हणजे आमचे अज्ञान दूर कर आणि आम्हाला ज्ञान देऊन निर्भय बनव.’ हे झाले कवितेचे रसग्रहण. आता गाण्याची जी चाल आहे, ती शब्दांच्या अर्थाला अनुसरून दिली आहे व त्या शब्दांचे उच्चारदेखील अर्थाला अनुसरून आहेत आणि म्हणूनच गाण्यातून येणारा भाव हा कवितेच्या अर्थाला अनुरूप आहे. यात ‘तिलक कामेाद’ या रागामुळे जो रस निर्माण होतो, त्याने शब्द मनाला भिडतात. शिवाय या गाण्यात दोन भाव प्रकर्षाने जाणवतात. एक करुण भाव आणि दुसरा निगमही भाव. जिथे या परमेश्वराचे कौतुक, वर्णन केले आहे, तिथे शब्दांना अशी चाल दिली आहे की, ज्याने करुणा उत्पन्न झाली आहे. आणि जिथे आपण भगवंताच्या चरणी लीन आहोत हा निश्चय आहे, तिथे तो दाखवण्यासाठी या शब्दांची चाल अशी आहे की, तो निश्चय प्रकर्षाने दिसून येतो. शिवाय हा निश्चय अजून जाणवून देण्यासाठी या वाक्यांना ठेका वेगळा दिला आहे व तबल्याऐवजी तेवढ्याच ओळींसाठी पखवाज वापरला आहे. पुन्हा करुणा जिथे आहे, तिथे तबला वापरला आहे. म्हणजेच, शब्दांतील भाव पोहोचवण्यासाठी शब्दांना दिलेले स्वर; म्हणजेच चाल आणि त्याचा ठेका व वाद्य यांचा वापर जसा होतो, तसे भाव निर्माण होतात व त्या शब्दांतील अर्थ जास्त स्पष्टपणे समजतो. हे तंत्र संपूर्ण गाण्यामध्ये वापरले आहे. कडव्याच्या पहिल्या दोन ओळींमध्ये भगवंताचे वर्णन आहे, तिथे करुण भाव आहे व तबला हे वाद्य वापरले आहे. शेवटच्या वाक्यात जिथे मनुष्य भगवंताच्या चरणी नतमस्तक असल्याचा निश्चय आहे, तिथे वरचे स्वर व पखवाज वापरला आहे. अशा प्रकारे चालीमधून निश्चय प्रकर्षाने जाणवतो, म्हणून या गाण्यात मृदू व निश्चयी असे दोन भाव प्रत्येक कडव्यात जाणवतील. व कवितादेखील त्याच अंगाने असल्याचे जाणवेल. इथे सूर तालांचे एकमेकांमध्ये संपूर्ण मिसळल्यावर कसे भाव रस निर्माण होतात ते ऐकायला मिळेल.

संगीतकारचे ते कौशल्य असते की, विविध वाद्यांचा वापर व शब्दांच्या अर्थाला अनुसरून त्याला दिलेला स्वर व त्यातून होणारी भावनिर्मिती ही त्या कवितेच्या मथितार्थाला अनुसरून येईल. गायकाचे हे कौशल्य असते की, ते स्वर तसे लावणे व त्या शब्दांचा उच्चार तसा करावा की, भावनिर्मिती होईल. गाताना विशिष्ट शब्द ऑफबीट टाकण्याचासुद्धा, त्या शब्दाचा अर्थ प्रकर्षाने जाणवून देण्यासाठी उपयोग होतो. कडवे पाहू,

‘छाया तव माया तव हेच परमपुण्य धाम

वार्‍यातून तार्‍यातुन वाचले तुझेच नाव

जग, जीवन, जनन, मरण हे तुझेच रूप सदय

‘आमचे अंतिम ध्येय हे तुझी छाया माया हेच आहे. तू वार्‍यामध्ये, तार्‍यामध्ये आहेस. हे जगणे, मरणे आणि तू दिलेले जीवन यातच तू सामावला आहेस.’, असा या कडव्याचा अर्थ आहे. या ओळींमध्येसुद्धा पहिल्या सर्व ओळींना करुण चाल व तबला साथ आहे. शेवटच्या वाक्यात निश्चय दाखवला आहे व पखवाज आहे.

‘वासंतिक कुसुमातुन तूच मधुर हासतोस

मेघांच्या धारातून प्रेमरूप भासतोस

कधी येशील चपल चरण

वाहिले तुलाच हृदय’

अर्थ -

‘या उमलणार्‍या फुलातून जणू काही तूच मधुर हसत आहेस. जो पाऊस पडतो, त्या धारातून तू आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतोस. आता कधी दर्शन देशील, कारण ती तुला माझे हृदय वाहिले आहे. मी तुझ्या चरणी नतमस्तक आहे.’

या मधल्या कडव्यामध्ये जसे मूल कोमल असते, तशी त्या शब्दांना साजेल अशी कोमल चाल दिली आहे. शेवटच्या निग्रही भावनेला पाखवाजाच्या शास्त्रीय अंगाने दिलेल्या साथीने बहार आली आहे.

आणि शेवटी लता दिदींनी ‘तेजोमय’ या शब्दावर आलापी करून त्याचे तेज अधिकच तेजस्वीपणे दाखवले आहे.

म्हणजेच, गाण्यातील आलाप, ताना, मिंड, तालाचा प्रकार, ताल वाद्याचा वापर, शब्द उच्चारण या सगळ्यांमुळे त्या कवितेचा अर्थ समजतो. एखादी ओळ दोन वेळा गायली असेल, तर दोनही वेळा ती वेगळ्या प्रकारे गायलेली असते. ही सगळी त्या गाण्यातील सौंदर्य स्थळे असतात, जी गाण्याचा अर्थ व भाव आपल्यापर्यंत पोहोचवतात. तर मग मित्रांनो, हे रसग्रहण वाचून झाल्यानंतर शांतपणे हे गाणे त्यातील संगीत आशयासह परत ऐका, तुम्हाला ते गाणे समजल्याचे मानसिक समाधान मिळेल. 

 - श्रुती देशपांडे