आज एक गंमत झाली होती. कधीही भाजी घेण्यासाठी न जाणारी जान्हवी, चक्क आईसोबत भाजी घेण्यासाठी भाजी मंडईत आली होती. संध्याकाळची वेळ होती. भाजी घेणार्‍यांची गर्दी आणि गडबड, तर भाजी विकणार्‍यांचा वेगळाच गोंधळ. ‘कोथिंबीर दहा रुपये, दहा रुपये; दस रुपये भाव भेंडी’, ‘बटाटा वीस, बटाटा वीस’... जणू आवाजाची भाजी मंडई होती. ‘ए आई, आम्हीसुद्धा वर्गात इतका गोंधळ घालत नाही गं!’, जान्हवी म्हणाली. आई खुदकन हसली.

त्या गर्दीत मात्र एक नाजूक आवाज येत होता. ‘कांदे चाळीस घ्या, कांऽऽऽदे’. जान्हवी आणि तिच्या आईने एकदम मागे वळून पाहिले, तर एक छोटी मुलगी कांद्याच्या डोंगरासमोर बसून कांदे विकत होती. तिला नीट वजनही करता येत नव्हते. कांद्यांचे ओझे गिर्‍हाईकाला देताना, ते त्या दोन छोट्या हातांनी उचललेही जात नव्हते. ‘भाऊ, ए भाऊ’, म्हणून ती तिच्या भावाला हाका मारत होती. तिचा भाऊ तिथेच बाजूला इतर मुलांबरोबर क्रिकेट खेळत होता. तवेढ्यात तिच्या आईने मागून येऊन टपली मारली आणि ओरडली,‘ काय गं मंजे कधी शिकणार?’

जान्हवी आणि तिची आई हे सगळे पाहत होती. ‘आई ती मुलगी लहान आहे. तिला धड वजनही नीट उचलता येत नाही. तिचा मोठा भाऊ मात्र खेळतोय. तिची आई, तिलाच मारतेय, हे बरोबर नाही ना आई!’, जान्हवी कळवळून म्हणाली. दोघी पुढे गेल्या. जान्हवीची आई कांदे घेत म्हणाली, ‘काय ताई, पोरगी लहान आहे, तरी कामाला लावली का? लहान आहे पोर. शाळेत पाठवायचं सोडून कामाला लावायचं?’, ‘हिला? अन् शाळेत? ते कशापाई? शिकून काय करणार? आधी कामं नकं का शिकवाया? लग्न करून दुसर्‍याच्या घरी जानार, मग शिकन्यासनी पैका कशाला खर्च करायचा? तो तिचा मोठा भाऊ जातो शाळंत. शिकून आम्हाला संभाळंल.’, तिची आई म्हणाली. त्या बाईने टोपलीत काढलेले कांदे वजन करून आईच्या पिशवीत टाकले. जान्हवी हे ऐकत होती, तिच्या डोळ्यांत पाणी आणि चेहर्‍यावर राग होता.

“आई, मी तुम्हाला सांभाळेन. ती मावशी चुकतेय. मुलगी आहे म्हणून ती तिला शाळेत पाठवत नाही. हे चुकतंय.’, जान्हवीला एकदम रडायला आले. आईने शांतपणे जान्हवीला जवळ घेऊन, तिचे डोळे पुसले. आई म्हणाली, ‘जान्हवी म्हातारपणी तू आम्हांला सांभाळावं, या अपेक्षेने आम्ही तुला शिकवत नाही. आम्ही, म्हणजे मी आणि तुझे बाबा म्हातारपणात व्यवस्थित राहण्यास खंबीर आहोत. तूही खंबीर बन. ते बनता येतं शिक्षणाने.’ जान्हवीची आई पुढे म्हणाली, “तुला रझिया सुलतान माहिती आहेत ना! दिल्लीच्या तख्तावर त्या काळात त्या बसल्या होत्या. युद्धकलेत, राजकारणात, न्यायनिवाडा करण्यात त्या त्यांच्या भावांपेक्षा सरस होत्या, म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना दिल्लीच्या गादीवर बसवलं. राणी लक्ष्मीबाईही तशाच. सावित्रीबाई फुलेंनी तर मुलींनी शिकावं, म्हणून किती यातना सहन केल्या. पुढे इंदिरा गांधी पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. इंदिरा नुई ही पेप्सी कंपनीची सी.ई.ओ. आहे. कल्पना चावला अंतराळवीर होती. यांच्या पालकांनी, ‘ही  मुलगी आहे, हिला कशाला शिकवायचं?’, हा विचार केला नाही. मुलींवर प्रेम करणारे पालक त्यांना ध्रुवासारख्या अढळ ठिकाणी नेऊन बसवतात, पण सगळेच लोक दुर्दैवाने हा विचार करत नाहीत. आई मुलीला शिकवत नाही आणि सासू-सुनेला पुढे येऊ देत नाही. स्त्रीने स्त्रीचा आदर करणं आवश्यक आहे. म्हणजे मुलींची संख्याही कमी होणार नाही, मुली शिकतीलही आणि पर्यायाने संपूर्ण समाज पुढे येईल. ‘रझिया सुलतान, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, कल्पना चावला, इंदिरा नुई यांनी त्यांच्या कर्तृत्वाने समाजात जागा बनवली. ते तू कर जान्हवी. त्यांचे आई-बाबा त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे होते. मी आणि बाबासुद्धा तुझ्यासोबत तेवढ्याच खंबीरपणे उभे आहोत.’ ‘आई तू सुपर आई आहेस.’, असे म्हणत जान्हवी आईला बिलगली.

तेवढ्यात छोट्या टाळ्यांचा आवाज आला. तर मंजी, जान्हवी आणि तिच्या आईसाठी टाळ्या वाजवत होती. आवाजाने त्या दोघींच्या लक्षात आले की, आपण भाजी मंडईत आहोत. आजूबाजूला आणखी लोक जमले होते, तेही टाळ्या वाजवत होते.

‘बाई, चुकले म्या, मला माफ करा. मी असा मोटा ईचार केला नव्हता. म्या अडाणी, पन माज्या पोरीला अडाणी नाय ठेवाची.’, मंजीची आई हात जोडून जान्हवीच्या आईला म्हणाली. जान्हवीच्या, तिच्या आईच्या चेहर्‍यावर आनंद मावत नव्हता. ‘थँक्यू, मावशी.’, जान्हवी म्हणाली, ‘म्हणजे मंजी आता शाळेत जाणार?’ ‘हो! हो! जानार. थेंक्यू तुला माझा ईचार बदलवलास तू पोरी. थेंक्यू’

- शुभांजली शिरसाट