मुलांनो, तुम्हाला माहीत आहे का?, मनाचे श्लोक कोणी रचले? ते कोणी उतरवून घेतले? असे म्हणतात की, चाफळला रामनवमीच्या उत्सवासाठी दर वर्षी शिवाजी महाराज मदत पाठवत असत. एका वर्षी महाराज मोहिमेवर असताना त्यांचे सेवक मदत पाठवायला विसरले. उत्सव जवळ आला तरी शिधा पुरेसा जमला नाही. उत्सव कसा पार पडणार, याची चिंता समर्थ शिष्यांना लागली; तेव्हा समर्थ रामदासांनी त्यांच्या पट्टशिष्याला, म्हणजेच कल्याणस्वामींना बोलवले. एका रात्रीत समर्थांनी २०५ मनाचे श्‍लोक रचले. कल्याणस्वामींनी ते लिहून घेतले. शिष्यांनी ते एका दिवसात पाठ केले. हे श्लोक म्हणत त्यांनी आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन धन-धान्य गोळा करून आणले. अशी मनाच्या श्लोकांच्या निर्मितीची कथा सांगितली जाते, पण या कथेची अधिकृत नोंद ऐतिहासिक कागदपत्रातही आढळत नाही.

चाफळला रामाचे भव्य राममंदिर बांधायचे ठरले, तेव्हा धन आणि धान्य या दोहोंची मोठ्या प्रमाणात आवश्यकता होती. अशा वेळेस शिष्यांनी भिक्षा मागवी व भिक्षेत मिळणारे धन-धान्य मठात जमा करावे, यासाठी मनाच्या श्लोकांची रचना झाली असावी, असे वाटते. भिक्षा मागताना समर्थ शिष्यांना हे श्लोक म्हणून आणखीही एक काम करायचे होते. त्या काळी यवनांची सत्ता होती. लोक गलितगात्र, स्वाभिमानशून्य झाले होते. त्यांच्या मनात देव, देश आणि धर्म यांच्याविषयी प्रेम निर्माण करणे आवश्यक होते. कल्पना करा, समर्थ शिष्य खणखणीत आवाजात ‘समर्थाचिया सेवका वक्र पाहे। असा सर्वभू मंडळी कोण आहे॥’ हा श्लोक म्हणत असतील, तेव्हा लोक किती अस्वस्थ होत असतील. मनाचे श्लोक म्हणताना घेतली जाणारी भिक्षा केवळ अर्थार्जनाचे साधन नव्हते, तर लोकसंग्रहाचा, जनसंपर्काचा, जनजागरणाचा मार्गही होता.

प्रभातफेरीच्या वेळेस म्हटल्या जाणार्‍या या श्लोकांतून सदाचाराचा, निर्भयतेचा, श्रद्धेचा संदेश पोहोचवला जात असे. यवनांच्या अत्याचाराला त्रासलेल्या समाजमनाला दिलासा मिळत असे, मानसिक आधार मिळत असे.

भुजंगप्रयात वृत्तातील हे श्लोक गेय आहेत. प्रत्येक चरणात १२ अक्षरे आहेत व ‘य’ चे चार गण आहेत. ‘यमाचा’ य-लघु, मा व चा-गुरू. लघु- गुरू-गुरू या क्रमाने ती अक्षरे आली आहेत, त्यामुळे श्‍लोक म्हणताना ठेका निर्माण होतो. अनेक ठिकाणी समर्थांनी अनुप्रास अलंकाराचाही वापर श्‍लोक रचनेसाठी केलेला आहे.

या श्लोकांतून समर्थांनी मनाला उपदेश केला आहे. मन हेच आपले मित्र आणि शत्रू असते. मनाने चांगला विचार केला, तर ते आपला मित्र आणि वाईट विचार केला, तर ते आपला शत्रू होते. म्हणूनच, मनाच्या दुसर्‍या श्लोकात समर्थ सांगतात,

‘जनी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे।

जनी वंद्य ते सर्व भावे करावे॥’

तिसर्‍या श्लोकात,

‘सदाचार हा थोर सांडू नये तो॥’, असे समर्थ सांगतात. सदाचार म्हणजे शुद्ध आचरण. विचार, उच्चार आणि आचार यात सुसंवाद म्हणजे सदाचार. विचाराप्रमाणेच आचरण आणि बोलणे असावे. बोलावे, तसे करावे; हाच सदाचार, हीच खरी संपत्ती. हा सदाचार समर्थांनी ३, ७, ८, १०२ ते १०६, १३१, १३२ या श्लोकांत सांगितला आहे.

२, ४, ५, ६, १३, १९, १०७, १६२ या श्लोकांमधून समर्थांनी माणसाला कल्याणकारी विचार दिला आहे. क्रोध करू  नये, वाईट कल्पना करू नये, पापाचे संकल्प करू नये, मद करू नये, दुसर्‍याच्या धनाची इच्छा करू नये, वाईट वासना ठेवू नये असे कल्याणकारी विचार समर्थ देतात.

२०५ व्या श्लोकात मनाच्या श्लोकांच्या पठनाने, मनन-चिंतनाने वागण्यात बदल होणे, ही खरी फलश्रुती. सतत श्रवण केले, तर दोष लक्षात येतात. दोष प्रयत्नपूर्वक काढावे लागतात. दोष काढले की, जीवनाचे सार्थक होते हे तत्त्वज्ञान समर्थ या श्लोकांतून सांगतात.

- सुवर्णा लेले