सोमवार, दि. १५ जुलै रोजी ‘लेखक आपल्या भेटीला’ या शिक्षणविवेक आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या एन.ई.एम.एस. शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमांतर्गत इयत्ता ८ वी व ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याच पाठ्यपुस्तकातील ‘मी चित्रकार कसा झालो’ पाठाचे लेखक ल.म.कडू प्रत्यक्ष मुलांच्या भेटीला आले होते. मुलांनादेखील आपल्या पाठ्यपुस्तकातल्या लेखकाला  भेटण्याची उत्सुकता होती. लेखक कसा असतो? ते आपल्याशी कसे बोलतील? असे अनेक प्रश्न मनात घेऊन सर्व मुले उपस्थित होती.

सर्व मुलांनी टाळ्यांच्या गजरात लेखक ल.म. कडू यांचे स्वागत केले आणि लगेचच मुलांशी संवाद सुरू झाला. मुलांनी त्यांच्या मनातील अनेक प्रश्न सरांना विचारले व त्याचे निराकरण करून घेतले. चित्रकार व लेखक कसे झालात? तुमचे प्रेरणास्थान कोण? आवडते शिक्षक कोण? अजून कोणत्या प्रकारचे साहित्य तुम्ही लिहिता? तुमचे आवडते पुस्तक कोणते? असे अनेक प्रश्न मुलांनी विचारले. मुले व ल.म.कडू सर यांचा गप्पारूपी कार्यक्रम खूपच छान रंगला. खूप मोकळेपणाने गप्पा झाल्यामुळे मुले बोलती झाली. हव्या त्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यामुळे खूप आनंदी झाली. असा हा एक तासाचा उपक्रम खूप उत्साहात पार पडला. या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रीतम जोशी आणि शिक्षक प्रतिनिधी नीरजा पुरंदरे यांनी उत्तम नियोजन केले. पाठातले लेखक भेटल्यामुळे मुलांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

- प्रतिनिधी