पियुची वही

दिंनाक: 15 Jul 2019 14:44:05


 

निरागसता हे बालसाहित्याचं एक प्रमुख लक्षण आहे. बालसाहित्यातून मुलांना उद्बोधनाबरोबरच निखळ आनंदही मिळाला पाहिजे. ते वाचनीय तर असावंच, पण मुलांचं मनोरंजन करणारंही असावं. थोडक्यात काय, तर डॉक्टर जी कडूकडू गोळ्या, औषधं शुगर कोटेड (sugar coated) करून देतात, तसं बालसाहित्यातून रंजक पद्धतीने मूल्ये रुजवली गेली पाहिजेत. म्हणूनच उत्तम दर्जाचं बालसाहित्य निर्माण करणं कठीण गोष्ट आहे. मात्र हे शिवधनुष्य संगीता बर्वेयांनी ‘पियूची वही’मधून लीलया पेलले आहे.

अलीकडेच माझी पाच वर्षांची मुलगी पारुल; जिला अजून लिहिता-वाचता येत नाही, तिला वाचनाची आवड लागावी; म्हणून मी काहीबाही वाचून दाखवत असते. हे करत असतानाच माझ्या हाती एक चागलं पुस्तक आलं, ‘पियूची वही’ नावाचं. तिला वाचून दाखवण्याच्या निमित्ताने मी ते हातात घेतलं आणि मीच कधी लहान मुलगी झाले ते कळलंच नाही.

‘पियूची वही’ हे मुलांचं भावविश्‍व समृद्ध करणारं पुस्तक आहे. ‘पियूची वही’मध्ये पियू ऊर्फ PU ऊर्फ प्रियांका नावाची जी मुलगी आहे, तिला उन्हाळ्याची सुट्टी लागलेली आहे. तिच्या आईने तिला तंबी दिलेली आहे की, ‘उगाचच उन्हातान्हात कुत्री मारत हिंडायचं नाही. जे काय आहे ते चार नंतर.’ आईसमोर बिच्चार्‍या पियूचं काही चालेल तर शपथ! तर आपल्या या पियूने त्रागा न करता आईचं ऐकायचं ठरवलं. तिने आपलं अभ्यासाचं कपाट धुंडाळलं. त्यात तिला नवीकोरी रंगपेटी दिसली. एकदम तिच्या डोक्यात ‘आयडियाची कल्पना’ आली, ती म्हणजे घराची जुनीपुराणी खिडकी रंगवण्याची तिने आईला विचारलं आणि काय आश्‍चर्य! आईने तिला खिडकीला लावण्याचे रंग बाबाकरवी आणून दिले. मग तिने व बाबाने मिळून खिडकी पहिल्यांदा साफ केली. पियूने एकटीने लाल, पिवळ्या रंगाने ती खिडकी रंगवली. तिच्या लाडक्या अंजूमावशीकडून खिडकी सजवायला एक मनीप्लँटचं रोपही आणलं. मग काय बाब्बा! पियूची खिडकी एकदम टकाटक झाली. पियूला त्या खिडकीतून सार्‍या विश्‍वाचं दर्शन घडायला लागलं.

पियूच्या वहीत मुलांना असणार्‍या रंगांचं आकर्षण आलेलं आहे. म्हणूनच तर तिची खिडकी ‘रंगीत खिडकी’ या नावाने प्रसिद्ध झाली. कविता कशी स्फुरते, रोजनिशी कशी लिहावी, निबंध कसा असावा, याचा उत्तम वस्तूपाठच या पुस्तकातून दिला गेला आहे. आपली ही पियू रोज तिच्या वहीत छान छान काहीबाही लिहिते आणि रोजच्या लिखाणातून तोचतोचपणा टाळण्यासाठी रोज काहीतरी नवनवीन गोष्टी करून पाहते.

आपल्याला या पुस्तकातून एका सुखी कुटुंबाचं चित्रच पाहायला मिळतं. आई-मुलगी, बाबा-मुलगी यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध आपल्याला इथे दिसतात. हल्लीच्या विभक्त कुटुंबांत विरळ होत जाणार्‍या नातेसंबंधाच्या तुलनेत इथे शेजार्‍यापाजार्‍यांशी असणारं घट्ट नातं पाहून आपल्याला अप्रूप वाटतं. मैत्रीचं मूल्य या पुस्तकातून जपलं गेलं आहे. पियूची मैत्रीण उमाने वेलिंगटनहून तोडक्यामोडक्या मराठीत लिहिलेलं पत्र तर मजेशीरच आहे. त्या पत्रावर दिवसभर पियू आणि तिच्या आईने येता-जाता हास्याचे मळे फुलवले आहेत.

पियूच्या वहीत आपल्याला विज्ञान उमटलेलंसुद्धा दिसतं. लहान मुलांचा जिज्ञासूपणा, चौकसबुद्धी आपल्याला पियूमध्ये पाहायला मिळते.

मला संगीता बर्वे यांचे ‘पियूची वही’बद्दल अभिनंदन करावंसं वाटतं कारण हल्ली मुलांसाठी एवढी मनोरंजनाची साधनं उपलब्ध असताना त्यांच्यावर मात करून संगीताताईंनी एवढं देखणं पुस्तक मुलांसाठी लिहिले आहे. याची भाषा साधी, सोपी, सरळ, मुलांच्या भावविश्‍वाला साजेशी अशीच आहे. मुलांना खिळवून ठेवणारं हे एक सुंदर चित्रमय पुस्तक आहे. मुलांना ते नक्कीच आवडेल.

- प्रज्ञा करडखेडकर, सहशिक्षिका

अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स