‘बरसल्या मृगाच्या धारा...

सोबतीला हा खट्याळ वारा

मृद्गंधाने भरला परिसर सारा

पहिल्या पावसाचा हा आनंद न्यारा...’

गणूची मुलगी कविता म्हणत होती. गणू मात्र पाणवलेल्या डोळ्यांनी ही कविता ऐकत होता. तेवढ्यात रख्मा म्हणाली, “धनी जेवून घ्या बघू! ताट वाढलयं.” गणू भानावर आला. जेवण झाल्यावर गणू अंगणात झोपायला गेला.

गणू आपल्या विचारात दंग झाला होता. यंदा तरी पाऊस होणार का? पाऊस नाही झाला तर सावकाराचं कर्ज परत कसं फेडणारं? एक तर आधीच बहिणीच्या लग्नासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज फेडताना, नाकीनऊ येत होती. परत सरकार शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी करणार का? आणि कर्जमाफी करणार तरी कधी? इथं अगोदरचं पिकांना हमीभाव नाय. गावातल्या लोकांच ऐकून आधीच दूध, भाजीपाला रस्त्यावर ओतलायं तरी ही सरकारनं काय भाव वाढवलं नाय आणि जरी भाव वाढला तरी फक्त एक-दोन पैकच फक्त जास्त मिळलं. बियाणांसाठी एवढं कर्ज घेतलयं. ते पण पाऊस नाय पडला तर एवढं कर्ज फेडणार कसं? गणू या विचारातच झोपी गेला.

सकाळी सकाळी उठून गणू शेतावर गेला आणि फक्त आभाळाकडे बघत बसला. त्याच्या मनात आत्महत्येचा विचार येत होता. पण घरात फक्त कर्ता माणूस तो एकटाच होता. आई एकतर अगोदरच आजारी होती, म्हणून ती अंथरुणाला खिळून असायची रखमा एकटी दोन पोराचं कसं भागवणार. पाणवलेल्या डोळ्यांनी आभाळाकडं बघत राहिला. तेवढ्यात पावसाच्या पाण्याचा एक टपोरा थेंब गणूच्या गालावर पडला आणि थोड्याच वेळात जोरदार पाऊस सुरू झाला. आता गणूच्या डोळ्यांतून दु:खाचे नाही तर सुखाचे आनंदाश्रु वाहू लागले. ते अश्रुसुद्धा पावसात एकरूप झाले. गणू सार्‍या शिवाराकडे बघून हसू लागला.

आज पावसामुळे एक स्त्री विधवा होता होता राहिली होती. पावसामुळे दोन मुले अनाथ होण्यापासून वाचली होती. एका आईला आपल्या मुलाचा जीव गमवावा लागला नाही.

ही गोष्ट फक्त गणूची नव्हती तर महाराष्ट्रातल्या, प्रत्येक शेतकर्‍याची गोष्ट होती. आज कित्येक शेतकरी पाऊस न पडल्यामुळे आत्महत्या करत आहेत. शेतकरी हा आपल्या जगाचा पोशिंदा आहे आणि त्यानेच जर आत्महत्या केल्या तर कसं होणार? त्यामुळे प्रत्येकाने आपल्या परीने प्रयत्न करायला हवेत.

निसर्गाची देणगी असलेला पाऊस माणासाच्या चुकीमुळे कमी होत आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेलं शहरीकरण व त्यासाठी कापली जाणारी झाडे. माणसाने यासाठी एक ध्यान हाती घेतला पाहिजे. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावले पाहिजे. यामुळे कित्येक निरागस जीवांचं आयुष्य पालटू शकते. याचा विचार केला पाहिजे. यासाठी सरकारनेही शेतकर्‍यांविषयी नोटिसा काढून त्यांची योग्य अंमलबजावणी केली पाहिजे व प्रत्येक शेतकर्‍याला आपला हक्क मिळेल याची हमी दिली पाहिजे. गणूसारख्या अनेक शेतकर्‍यांना अनेक भूमीपूत्रांना सहकार्य करायला हवे.

ईशा दारवटकर 

नू.म.वी.मुलींची प्रशाला, पुणे