जाणीव

दिंनाक: 12 Jul 2019 15:57:45


 

आषाढी एकादशी दिवशी शाळेला सुट्टी म्हणून शाळेचा अभ्यास करून दिवसभर मैत्रिणीबरोबर खेळायचं असं माझं नियोजन झालं. खेळतानाच एक वेगळा अनुभव येईल आणि काही शिकवून जाईल असं वाटलंच नव्हतं. मी आणि माझी मैत्रीण श्रेया दोघी गणपतीच्या मंदिराजवळ खेळत होतो. तिथे जवळ गाडीपाशी एक पक्षी ओरडत होता. त्याच्याजवळ जाऊन पाहिले तर तो तडफडत होता. आम्ही त्याला उचलून घेतले. त्याला काय होतंय हे समजत नव्हतं. त्याला हाताने उचलून घेतल्यावर तो शांत झाला. पण तो कसा पडला? त्याला लागले का? वीजेचा धक्का बसला का? अनेक प्रश्‍न मला भेडसावत होते. त्यातच त्याला ऊब मिळावी म्हणून आम्ही सुती कापडात गुंडाळले. तो झोपी जात होता. काहीवेळाने तो मोठ्याने ओरडू लागला. मी एका वाटीत पाणी घेऊन त्याला चमच्याने त्याच्या चोचीत घातले. चार-पाच चमचे तो पाणी प्यायला आणि काही वेळातच त्याच फडफडणं बंद झालं. झालेल्या प्रकाराने मी शांतच झाले. काही समजत नव्हतं. पण त्या पक्षांबद्दल फार आत्मियता वाटत होती. तो पक्षी बोलत असता तर त्याने सांगितले असते, की नक्की झालं काय? माझं काय दुखतंय, मला दवाखान्यात घेऊन जा. त्यांना बोलता येत नाही म्हणून हा त्रास त्या पक्षाला झाला का? त्यांचेही डॉक्टर असते तर त्याला तिथे घेऊन जाता आले असते. पण अजून तशी सोय माझ्या पाहण्यात नाही.

या सर्व प्रकारात काहीच समजले नाही. काय करावं हे सूचले नाही. पक्षाचे प्राण गेले होते. मी घरी एकटीच होते. आई-बाबा नोकरी करत असल्याने दोघेही बाहेर. मी सुती कापडात त्याला तसेच ठेवले. एका बॉक्समध्ये ठेवले. सायंकाळी सहा वाजता आई आल्यावर आईला सर्व घडलेला प्रकार सांगितला. मला वाटले आई मला फार ओरडेल; पण आईने शाबासकी दिली. तुला मुक्या प्राण्यांवर प्रेम करता आलं. त्याच्या संवेदना समजून घेता आल्या. आता त्या पक्षाला मातीचा एक खड्डा करून त्यात पुरलं. त्याच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना केली.

घडलेल्या प्रकाराने मला शिकवले, इतरांच्या भावना समजून घ्याव्यात. आपल्याला शक्य तेवढी मदत करावी. आजचा अनुभव हा काहीतरी शिकवण देणारा ठरला.

- शांभवी संतोष जंगम

इ.5वी, अबोली रेणुका स्वरूप प्रशाला