कण्हेर

दिंनाक: 11 Jul 2019 17:23:06


 

कण्हेर हा वृक्ष नसून मोठे झुडूप आहे. हा लावण्यासाठी सोपा, वर्षभर भरपूर रंगीबेरंगी फुले देणारा, पाणवठ्यांचे संरक्षण करणारा आणि हवेतील प्रदूषणातही ताठ उभा राहणारा हा, विविध औषधी तत्वांनीसुद्धा परिपूर्ण आहे.

कण्हेरीचे वनस्पती नाव नेरियम ओलिअँडर आहे. पण ती अॅपोसायनेसी कुळात मोडते. शंकराला वाहिली जातात. ती याचीच पांढरी फुलं ! कण्हेरच्या प्रत्येक भागात एक विषारी ग्लुकोसाइड असतं. या फुलातील विष फक्त महादेवच पचवू शकतो, म्हणून ते त्याला वाहिले जाते. गाई-गुरं, शेळ्या-मेंढ्या याची पाने खात नाहीत. पण गंमत म्हणजे कॉमन क्रो नावाचं फुलपाखरू याच झाडावर अंडी घालतो. त्यावरच त्यांचे सुरवंट पोसले जातात. या विषारी सुरवंटांना पक्षी किंवा इतर भक्षक तोंड लावत नाहीत. पूर्वी कण्हेरीचे साधे वाण म्हणजे सरळसोट उंच वाढणारी लाल पांढरी फुलं. सर्व बागांतून दिसायची, पण शास्त्रज्ञांनी अनेक बदल करून नवीन प्रजाती विकसित केल्या. आता पिवळी लाल, गडद राणी रंगाची फुलही मिळतात. काहींची पानं हिरवी-पिवळी असतात. याला वर्षभर भरपूर फुलं येतात हे विशेष.

हिरोशिमाचे राज्यफूल म्हणून आजही ओळखले जाते. १९४५ ला हिरोशिमात अणुबॉम्ब पडला. सर्वत्र राखरांगोळी झाली आणि याच राखेतून पहिले फूल उमलले ते या ओलिअँडरचे. म्हणून हा मूळचा सदाहरित लहान वृक्ष आफ्रिका खंडातील. पुढे हजारो वर्षापासून भारतात आढळतो. तो नेपाळ, काश्मीरपर्यंत गंगेचे खोरे आणि नाल्यांच्या काठानेही आढळतो. याची उंची १८ ते २० फूट, सरळ खोड, फांदीच्या टोकाला पांढरा अथवा लाल फुलांचा वल्लरीदार गुच्छ, पाने प्रत्येक पेरावर तीन आणि ती सुद्धा लांब, हिरवीगार, जाड, निमुळती असतात. त्यामुळे हा सहज ओळखता येतो. फुले मंद सुवासिक असतात. काही फुलांमध्ये पाकळ्यांचे एकच वर्तुळ असते तर काहीत तीन-चार वर्तुळांमुळे ती फुलं गुलाबासारखी दिसतात. कण्हेरच्या सर्व भागात दुधी चीक असतो. याची फळं शेंगेसारखी लांब असून त्यात अनेक बिया असतात. तर बियांच्या टोकास तपकिरी केसांचा झुबका असतो. बी अथवा कलामांनी नवीन लागवड करतात. कमी पाण्यातही ती वाढते. एप्रिल ते जून मध्ये छान बहार येतो. हिला प्रखर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. हिला पाच पाकळ्या असतात. पण त्या अतिशय नाजूक व पातळ असतात. या फुलांचा वापर हार, गजरे तसेच आरास करण्यासाठी केला जातो. फुलांपासून मिळणाऱ्या सुगंधी द्रव्याचा उपयोग अगरबत्तीसाठी केला जातो. कण्हेरीला संस्कृतात ‘करवीर’ असे म्हणतात. फुलपाखरे मध पिण्यासाठी या फुलांवर येतात. गणपतीला वहिल्या जाणाऱ्या २१ गणेशपत्री मध्ये देखील कण्हेरीच्या पानांचा समावेश आहे. याची फुले गणपती व श्रीसूर्यनारायणालाही वाहिली जातात.

पाणथळ जागेचा हा दर्शक वृक्ष आहे. पूर्वी नदीचे पाणी स्वच्छ ठेवण्याचे कार्य कण्हेर करत असे. पण ती नष्ट होत चालली आहे. याचे मुख्य कारण नद्यांचे प्रदूषण. त्यांचे बंद झालेले वाहणे, कोरडी पडलेली पात्रे, आटलेले डोह हे आहे. तेव्हा जैवविविधतेमधील कण्हेर ही अतिशय महत्त्वाची वनस्पती होती. पाणथळ जागा टिकवायची असेल तर तेथे जवळ यांची झाडे लावली पाहिजेत. त्यासाठी त्यांचा मोठा वाटा होता. शेताजवळही ती लावावीत. शेतातील पिकलेले धान्य, बरेचदा उंदीर, घुशी फस्त करतात. अशावेळी कण्हेरीच्या मुळांचा वास, त्यातील विषाचा अंश या प्राण्यांचा धान्यापासून दूर ठेवतो. शोभिवंत वनस्पती म्हणून बागा, उद्याने, मंदिर परिसर, रस्त्यांच्या मध्ये दुभाजकात हिची लागवड केली जाते. ती अनेकदा कीटक, फुलपाखरे यांचे निवासस्थान व अन्नसुद्धा देणारी आहे.

आयुर्वेद, युनानी उपचार पद्धतीत बाह्य उपाय म्हणून सूज कमी करण्यास, त्वचारोगावरही याचा वापर केला जातो. ही वनस्पती पूर्ण विषारी. तिची मुळे, खोड, पाने, फुले, बिया यामध्ये विषाचा अंश असतो. आयुर्वेदात हृदयरोग, अस्थमा, मलेरिया यावर प्रभावशाली औषध देतात. मुळांचा अर्क वा पानांचा काढा, अल्सर, रिंगवर्म, नागीण, गजकर्ण, चामखीळ यावरही उपयोगी औषधी आहे. सालीमधील टॅनीन व उठून जाणारे तेल त्वचारोगावर उपयुक्त तर पानातील द्रव्य हृदयाची शक्ती वाढवण्यास उपयुक्त असते. फुलांचा मंद सुवास यासाठी फार उत्तम. त्या वासाने मन प्रसन्न होऊन उत्साही होते.

वारंवार छाटणी करीत राहिल्यास कुंड्यांमध्येही झाड सहज लावता येते. फुलंही खूप मिळतात.

- मीनल पटवर्धन