जॉर्जी

दिंनाक: 10 Jul 2019 14:56:25


लहानपाणासूनच आपण ही कामं मुलींची, ही कामं मुलांची अशी विभागणी करतो का? यावर विचार व्हायला हवा नाही का?

आपल्या आजच्या या गोष्टीत जॉर्जी नावाचा एक खोडकर मुलगा आहे जो रोज सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या आगावूपणामुळे आईचे, शाळेत त्याच्या शिक्षकांचे बोलणे खात असतो. शाळेतही त्याला फारसे मित्र नाहीत, फार तर फार शेजारी राहणारा एक मुलगा त्याचा मित्र आहे. जॉर्जी फक्त खोडकर मुलगा आहे असं नव्हे त्याच्यात काही गुणही दडले आहेत, पण ते गुण त्याच्या आईला, त्याच्या मित्रांना अवगुण वाटतात. काय आहे तो गुण?

 तर जॉर्जी उत्तम स्वयंपाक बनवू शकतो आणि त्याला पुढे मोठं होऊन बेस्ट शेफ बनायचं आहे. त्याचीही इच्छाशक्ती खूप प्रबळ आहे. जॉर्जी खूप खेळकर स्वभावाचा आहे. त्याच्या मित्रांना जरी वाटतं की त्याला ही मुलीसारखी स्वयंपाकाची काम करायला आवडतात तरी जॉर्जी त्यावर चिडत नाही.

आणि मग एकदा जॉर्जी मस्त मशरूम बनवतो; पण ते करतानाही काही आगाऊपणा केला नाही; तर तो जॉर्जी कसला? ते बनवताना काचेचं भांडं फोडतो आणि परत आईचा ओरडा खातो, पण त्याने बनवलेले मशरूम जेव्हा त्याची आई खाते, तेव्हा मात्र तिला आपला जॉर्जी आता मोठा झालाय आणि त्याच्या आवडीला जपायला हवं याची खात्री पटते. ही गोड शॉर्टफिल्म तुम्ही खालील लिंकवर पाहू शकता.

https://youtu.be/sPupxtZ6bQQ

 

- भाग्यश्री भोसेकर- बीडकर