अवसेचा पाऊस

दिंनाक: 01 Jul 2019 15:17:00


“आज अवसेचा पाऊस आहे रे, कशाला जाताय डोंगराकडे?” आईनं आम्हाला थांबवत विचारलं. तेव्हा मी म्हटलं, “हे बघ आई... अमावस्या पौर्णिमेला काहीही विशेष घडत नसतं.” त्यावर आई म्हणाली, “नाही कसं? चंद्राच्या प्रभावामुळेच तर समुद्राला भरती ओहोटी येते ना? अमावस्येला उधाणाची भरती येते ती उगीच? शास्त्र कशाला खोटं बोलेल?”

“तुझं म्हणणं खरं आहे, पण ते काही प्रमाणातच. एरवी अमावस्या-पौर्णिमा काही वाईट दिवस नसतात. बरं ते असो, आम्ही डोंगरावरच्या देवळात जाऊन आरती म्हणतो, तिथंच जेवतो आणि लवकर परत येतो.”

असं सांगून आणि सोबत रात्रीच्या जेवणाचा डबा घेऊन आम्ही काही शाळकरी मित्रमंडळी डोंगरवाटेनं मंदिराकडे निघालो. आमचं जुई गाव हे डोंगराच्या कुशीतच वसलेलं होतं. डोंगराच्या माथ्यावर रामेश्वराचं मंदिर. त्या खालच्या उतरावर गावातल्या सर्व गावकर्‍यांचे गुरांचे गोठे आणि पुढच्या सपाट माळरानावर आमची इटुकली पिटुकली कौलारू छपरांची पाच-पंचवीस कोकणी घरं. त्यापुढे अगदी गावाबाहेर एक शाळाही होती. अद्याप शाळा सुरू व्हायच्या होत्या. त्यामुळे शाळा-कॉलेजातली आम्ही मुलं दिवसभर गावात उनाडक्या करण्याशिवाय काय करणार? दर दोन-तीन दिवसांनी का होईना सायंकाळी आम्ही आपापले जेवणाचे डबे घेऊन रामेश्वराच्या मंदिरात जायचे. तिथपर्यंत वीज पोहोचली होती म्हणून बरं. तिथं मग गप्पांचा फड रंगायचा. देवाची आरती करायची. मग शांतपणे अंगत-पंगत करून जेवायचं. रात्री झोपायला आपापल्या घरी परतायचं, हा ठरलेला कार्यक्रम असायचा. त्या दिवशीही आम्ही आपापली भाजी भाकरी बांधून घेऊन निघालो तर आईनं टोकलं. ‘आज अमावस्या आहे.’ म्हणून पण तरीही आम्ही निघालोच. जेमतेम रामेश्वराच्या मंदिरापर्यंत पोहोचलो असेन नसेन तोच जोरदार पावसाला सुरुवात झाली. मंदिराची चढण चढणारे दोन-चारजण छत्री असूनही पुरेपुर भिजले. कारण आज पावसासोबत वाराही भरपूर होता. कसेबसे देवळात निवार्‍याला पोहोचलो आणि वार्‍याचा जोर वाढला. देवळावरचे पत्रे फडफडू लागले. वार्‍याच्या आणि पावसाच्या आवाजामुळं आपापसात बोलणंही अशक्य झालं. एकमेकांना जोरदार हाका मारत सगळे देवळाच्या गाभार्‍यात जमलो. घंटा वाजवित देवाची आरती सुरू केली आणि अचानक वीज गायब झाली. तसेच काळोखात चाचपडत काडेपेटी शोधून देवापुढची समयी लावली. परंतु वार्‍यापुढे तिचा टिकाव लागेना. शेवटी पेटीत सापडलेली कापूर आणि धूप जाळू लागलो. आरती पूर्ण करून पुन्हा सभामंडपात आलो. बाळ्याने त्यांच्या सामानातून टॉर्च शोधून काढली. त्या टॉर्चच्या प्रकाशात गोल बसून सगळेजण जेवू लागले.

बाहेर पावसाचा जोर मात्र वाढतच होता. गेला अर्धा पाऊण तास नुसता मुसळधार पाऊस कोसळत होता. तसा तो गेल्या दोन दिवसांपासून पडत होता. फक्त आज सायंकाळी आम्ही घरातून निघालो तेव्हा थांबला तेवढाच! आत्ता मात्र पावसाचा रंग काही वेगळाच दिसत होता. पावसाचे शिंतोडे वार्‍यासोबत देवळात येऊन आम्हाला न्हाऊ घालीत होते. कशीबशी जेवणं उरकली आणि देवळामागे मोठ्ठा ‘धाडऽऽऽ’ असा आवाज आला. सगळेजण सामान आवरून उठलो. बॅटरी मारून पाहिलं तर जवळपास काही दिसेना. मग बाळू आणि मी टॉर्च घेऊन मंदिराबाहेर जाऊन पाहिलं तर अंगावर काटाच आला. मंदिराच्या वरच्या बाजूला डोंगराला एक मोठ्ठी भेग पडल्याचं दिसत होतं. वरून येणारं पाणी चिखल दगड-गोटे त्या भेगेत जाऊन गुप्त होत होते. आम्हाला धोक्याची जाणीव झाली व आम्ही देवळात परत येऊन सवंगड्यांना सावध करीत निघाल्याची तयारी सुरू केली. ‘एवढ्या काळोखात आणि भर पावसात कशाला खाली जायचं?’ सवंगड्यांनी विचारताच आम्ही पाहिलेल्या त्या डोंगराला गेलेल्या मोठ्या भेगेविषयी सांगू लागलो. तोच एखादा भूकंपाचा धक्का बसावा तसं झालं आणि सगळं मंदिरच हलू लागलं. घाबरून आम्ही सगळे बाहेर पडलो. परतीची वाट शोधून डोंगर उतरू लागलो. अर्ध्यावर आलो नसू तेवढ्यात आकाशात चमकणार्‍या विजांच्या प्रकाशात पाहिलं की, काहीतरी विपरीत घडतंय... झाडं जागेवरून पुढे सरकून उताराकडे जात आहेत. मोठमोठे दगड धोंडेसुद्धा उतारावरून खालच्या गुरांच्या गोठ्याकडे जात आहेत. आम्ही डावीकडे सुरक्षित बांध पकडून थांबलो आणि संधिप्रकाशात पाहिलं तर अख्खं मंदिरच चाल करून पुढे येत होतं. डोंगराचा अर्धा भाग तुटून त्या मंदिरासह उतारावरून खाली येत होता. दगडांचे आवाज आणि मोडणार्‍या झाडांचे आवाज ऐकून घाबरून आम्ही एकमेकांचे हात पकडून स्तब्ध उभे राहिलो. अगदी आमच्या डोळ्यांसमोर दरडी कोसळत होत्या. खाली गोठ्यातून गुरांचे हंबरण्याचे आवाज येऊ लागले. दरड बहुधा गुरांच्या गोठ्यावर कोसळली होती. त्याही परिस्थितीत एका टॉर्चच्या आधारे आम्ही गोठ्यांकडे धावलो. वरून येणारं चिखलपाणी गोठ्यात साचलं होतं. जवळपासचे 3-4 गोठे चिखलपाण्यानं भरू लागले होते. पलीकडच्या भागातले काही गोठे तर चक्क दरडीनं गिळंकृत केले होते. तिथल्या गुरांचे आवाजही येणं बंद झालं होतं. पाऊस थांबण्याचं नाव घेत नव्हता. वरची मोठ्ठी भेग पाण्यानं भरली की पुन्हा मोठी दरड कोसळण्याचा धोका होता. आम्ही 6-7 जणांनी त्या परिसरातले गोठे आपापसात वाटून घेतले व आम्ही त्या गोठ्यांकडे धावलो. आतल्या गायी-बैलांच्या गळ्यातले दोरखंड सोडवून त्याना चिखलातून ढकलनूच बाहेर काढलं. डावीकडच्या सुरक्षित असलेला परतीच्या वाटेवर हाकलंल. एकूण सतरा गोठ्यातील गायी-बैल आम्ही मुक्त केले आणि पुन्हा डावीकडच्या सुरक्षित पारवाडीकडे आलो. एकमेकांना हात देत थांबलो, तर पुन्हा एकदा भूकंप झाल्यासारखा हादरा बसला आणि वरून मोठी दरड खाली येऊ लागली. आम्ही पायवाटेवर सोडलेल्या गुरांच्या मागोमाग घराकडे धाव घेतली. गुरांच्या पावलांचे आवाज आणि आमचा आरडाओरड यामुळे खालच्या वाडीतले लोक जागे झाले होते. वरून दरड येतेय असं ओरडत आम्ही त्यांना सावध केले.

सगळे गावकरी आमच्यासोबत घरं-दारं सोडून गावाबाहेरच्या शाळेकडे धावले. रात्रभर पावसाचा धुमाकूळ सुरूच होता. पहाटे सगळेजण गावकर्‍यांसोबत पुन्हा घराकडे आलो.

 पाहिलं तर अख्खं गाव दरडीनं पोेटाखाली घेतलं होतं. डोंगराच्या बाजूचे सगळे गोठे गुरांसह गाडले गेले होते. सुदैवाने आणि आमच्या आरड्याओरड्यामुळे माणसे मात्र वाचली होती. आम्ही वाचवलेल्या 17गोठ्यातील गुरे मात्र शाळेजवळच्या आंब्याच्या झाडाखाली थंडीनं कुडकुडत उभी होती. गावच्या ग्रामस्थांनी सगळी परिस्थिती पाहिली, त्यांच्या ध्यानात आलं की, या मुलांमुळेच आज गाव वाचलं. काही गोठे दरडीखाली गाडले गेले तरी जे वाचले त्यांच मोल खूप मोठं होतं. पुढे सरकारी मदत आली. घरे दुरूस्त करण्यात आली. गोठे पुन्हा उभे राहिले तरी प्रत्येक ग्रामस्थाच्या तोंडी एकच गोष्ट होती, ‘या मुलांमुळेच गाव वाचलं.’

- सुहास बारटक्के