राखणदार

दिंनाक: 08 Jun 2019 17:26:58

 


मे महिन्याच्या अखेरीस ऊन खूपच तापू लागलं होतं. आकाशात काळे ढग जमत होते, पण पाऊस मात्र पडत नव्हता. उष्णतेने अंगाची लाहीलाही होत होती.

दत्तू आपल्या मित्रांसोबत शेतातल्या खळ्यात लगोरीचा डाव खेळत होता. धावताना उडणारी धूळ नाकातोंडात जात होती. त्यात हा भयंकर गर्मा. सगळे मित्रही घामाघूम झाले होते.

खेळताखेळता अचानक अंधारून आलं. आकाशात ढगांची गर्दी दाटून आली. अचानकपणे जोरदार लखलखाट झाला आणि कानठळ्या बसतील; असा जोरदार आवाज झाला. ‘विजा पडतायत, पळा.’, असा सर्वांनी सामूहिक ओरडा केला आणि खळ्यातला खेळ संपला.

दत्तू घरी पोहोचेपर्यंत पाऊस सुुरू झाला होता. भलेमोठे टप्पोरे थेंब घरावर पडू लागले. कौलारं वाजू लागली. अंगणात थेंबांनी ताल धरला आणि सगळीकडे मातीचा वास पसरला. आठवीत शिकणारा दत्तू दारात उभं राहून सृष्टीचं हे कौतुक न्याहाळू लागला. मातीचा वास श्वासात भरून घेत तो म्हणाला, ‘यालाच मृद्गंध म्हणतात, हे परवाच बाईंनी सांगितलं होतं.’ तो मनोमन खूश झाला.

पडवीत दत्तूचे बाबा हडपा उघडून खुडबुड करत होते. त्यांनी दत्तूला हाक मारली. भल्यामोठ्या लाकडी पेटीत; म्हणजे त्या हडप्याच्या आत त्याला उतरवलं. हडप्याच्या चारही खणात वेगवेगळ्या प्रकारचं भात (सालासकट असलेला तांदूळ) ठेवलेेलं होतं. दत्तूनं त्यातल्या एका बाजूच्या कप्प्यात ठेवलेलं बियाण्याचं भात पायलीमध्ये (वजन, मापाचं भांडं) भरून बापाकडे देण्यास सुरुवात केली. हडप्याबाहेर उभ्या असलेल्या दत्तूच्या बापानं ते टोपलीत भरायला सुरुवात केली. पुरेसं भात काढल्यावर दत्तू त्या हडप्यातून बाहेर आला. हातापायाला लागलेलं भाताचं तूस झटकलं.

‘उद्या पेरणी करायला हवी... रोहिण्या निघाल्या.’, बाबांनी जाहीर केलं; तशी सगळी जणं तयारीला लागली. भल्या पहाटे उठून बाबांनी घराच्या वळचणीला बांधून ठेवलेला नांगर बाहेर काढला. त्याचा लोखंडी फाळ स्वच्छ केला. बैलांना खायला घालून, पाणी पाजलं आणि खांद्यावर नांगर आणि हातात बैलांचे कासरे (दोर) पकडून ते शेताकडे निघाले. मागोमाग दत्तूची आई डोक्यावर बियाण्याच्या भातानं भरलेल्या टोपल्या घेऊन निघाली. आज पेरणी करायची होती. एकाच चोंढ्यात (शेतात) नांगरणी करून पेरणी केली. बाकीची शेतं आताच नांगरायची गरज नव्हती. पेरणी संपली आणि संध्याकाळी पुन्हा पाऊस आलाच.

दमदार पावसाची आवठवडाभर रिपरिप झाली आणि शेतात पेरलेलं बियाणं रोप होऊन वीतभर जमिनीवर आलं. रान जाळल्यामुळे काळ्या झालेल्या त्या शेतात हिरवागार गालीचा तयार झाला. सकाळच्या वेळी थोडी उघडीप पाहून रोपांमधलं तण काढून, दत्तूच्या बाबांनी हळूहळू इतरही शेतं नांगरायला सुरुवात केली. पावसाचा जोर वाढला, तशी भाताची रोपंही जोरदारपणे वाढली. चांगली फूट-दीड फूट उंच झाली. मग मात्र दत्तूच्या बापानं ‘लावणी’चं आवतण सार्‍या वाडीला दिलं. एक दिवस सगळ्या वाडीतली माणसं दत्तूचं शेत लावायला आली. काळ्या चोंढ्यातली वाढलेली हिरवी रोपं उपटून त्याचे जुडगे बांधण्यात आले. सगळी शेतं नांगरून, त्यात चिखल करून, मग ही रोपं विशिष्ट अंतरा-अंतरावर शेतातल्या चिखलात लावण्यात आली. संध्याकाळपर्यंत लावणीचा कार्यक्रम सुरूच होता. लावणीची मस्त सामुदायिक गाणी गात, भाताची रोपं लावली जात होती. डोक्यावर इरलं, म्हणजे बांबूच्या कामट्यांचं, पानं लावलेलं छत्र घेऊन चिखलात लावणी केली जात होती. बाया माणसांनी शेतात बसण्याकरता छोटी लाकडी स्टूलं आणलेली होती. दिवसभर कामं करून माणसं दमली आणि सायंकाळी दत्तूच्या आईनं बनवलेल्या गरमगरम आमटीभातावर तुटून पडली. पोटभर जेवून घरोघरी गेली.

हे असंच पंधरवडाभर सुरू राहिलं. आज एकाकडे; तर उद्या दुसर्‍याकडे, असा लावणीचा कार्यक्रम सुरूच राहिला. एकमेकांची शेती लावणं चालूच होतं. पावसाचा जोर वाढतच होता. अवघं कोकण आता हिरवंगार होऊन गेलं होतं. नदी, नाले तुडुंब होऊन वाहत होते. पाखरंही पावसानं गारठली होती. त्यांच्यासाठी दत्तूच्या आईनं घराच्या वळचणीला छोट्या मडक्यात भाताच्या लोंब्या घालून ठेवल्या होत्या. सकाळीच येऊन पाखरं भात खाऊ लागली की दत्तूला मजा वाटे.

आता महिनाभर शेतीच्या कामातून थोडी विश्रांती मिळाल्यानं दत्तूच्या घरी श्रावणमासानिमित्त काही भजनाचे कार्यक्रमही झाले. त्याआधी आषाढ अमावास्येला दत्तूच्या बाबांनी शेतावर जाऊन नारळ दिला. ‘हा कुणासाठी?’, असा प्रश्‍न दत्तूनं विचारताच ते म्हणाले, ‘शेताच्या राखणदारासाठी!’ दत्तूला तिथे राखणदार दिसेना. तेव्हा बाबा म्हणाले, ‘पाऊस कमी झाला की दिसेेल. सर्पाच्या रूपात आहे तो.’

पाऊस उणावला. उन्हाच्या तापी पडू लागल्या. शेतातल्या भाताची रोपं आता 3-4 फूट उंच वाढली. त्यांची पोटं टम्म फुगली आणि एकेका रोपातून हळूच भाताची हिरवी लोंब बाहेर डोकावू लागली. प्रत्येक लोंबीमध्ये दुधाचे दाणे तयार झाले. पोसवलेलं भात पाहताना दत्तूचे डोळे विस्मयानंं विस्फारले. निसर्गाचं हे अक्रीत त्याला खूप आवडलं.

गणपतीचा सण संपला आणि भातं पिवळी पडू लागली. लोंब्या कडक झाल्या आणि त्याच वेळी शेतात उंदरांची पिल्लावळ धुडगूस घालू लागली. दत्तूच्या बाबांनी राखणदाराला पुन्हा आवतण दिलं आणि एक दिवस दत्तूला तो दिसलाच.

पिवळाधम्मक सहा-साडेसहा फुटाचा धामण जातीचा तो सर्प दत्तूच्या शेताच्या बांधावर आश्रयाला आला होता. तो तिथंच राहत होता. शेतातल्या बेडकांची आणि पीक फस्त करणार्‍या उंदरांची मस्त मेेजवानी त्याला मिळत होती. एकदा दुपारच्या उन्हात बांधावर सळसळत जाणार्‍या धामण सापाकडे बोट दाखवत दत्तूचे बाबा म्हणाले, ‘तो बघ आपला राखणदार! तो नसता तर उंदरांनी निम्मंअधिक पीक खाऊन टाकलं असतं. भाताच्या पिकावरचे किडे, कीटक खायला बेडूक येतात. बेडूक खायला साप येतात. साप उंदरांनाही खातात. म्हणून सापाला मारायचं नसतं. तोच आपला खरा राखणदार आहे.’

‘मग तुम्ही नारळ दिलात तो कुणाला?’ ‘तो एक उपचार म्हणून. नारळ नाही दिला तरी चालेल; पण साप जगले पाहिजेत.’

नवरात्र झाली, दसरा आला, दिवळी जवळ आली. दत्तूच्या बाबांनी शेतातल्या भाताची कापणी केली. भाताच्या लोंब्या पेंढ्यासह कापून घराकडे नेऊन त्याचा ढीग तयार केला (त्यालाच उडवी म्हणतात.). कापणी करून आणलेलं भात उन्हात सुकलं की, त्याची झोडणी करून भाताचे अख्खे दाणे मिळणार होते. पडवीतली कणगी पुन्हा भाताने भरून जाणार होती.

आता शेतं पुन्हा उघडी झाली होती. शेतात पडलेले दाणे वेचायला पक्षी-पाखरं येत होतीच; परंतु अजून उंदीरही खूप होते. बांधावरच्या बिळात लोंब्या घेऊन जात होते; पण आता सापाशी थेट सामना होता. मध्ये अडथळा नव्हताच. दत्तू दुपारी शेतात जाऊन मुद्दाम पाहत बसायचा. उन्हात चमकणारा पिवळाजर्द साप पाहून कुणी काठी घेऊन मारायला धावला की दत्तू ओरडायचा, ‘ए, खबरदार तो आमचा राखणदार आहे. त्याला मारायचं नाही.’ आता दत्तू बनला होता राखणदाराचा राखणदार.

- प्रा. सुहास बारटक्के