आपल्या देशाचा कारभार हा संविधानानुसार चालतो. या संविधानाचा एक भाग म्हणजे प्रशासन व्यवस्था. या व्यवस्थेनुसारच देशाची कायदा आणि सुव्यवस्था राखली जाते. प्रत्येक जिल्हा, तालुका, राज्य आणि देशाच्या पातळीवर ही प्रशासन यंत्रणा काम करत असते. देशातील प्रत्येक नागरिकाला योग्य सोई-सुविधा मिळाव्यात; म्हणून प्रत्येक क्षेत्रात प्रशासन यंत्रणा कार्यरत असते. प्रशासन व्यवस्थेचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी वर्ग एक, वर्ग दोन, वर्ग तीन याप्रमाणे सर्व क्षेत्रात अधिकारी वर्गांची नेमणूक केली जाते. नागरिकांसाठी विविध क्षेत्रातील योजनांची निर्मिती आणि अमंलबजावणी ही प्रशासकीय व्यवस्थेमार्फत होत असते. देश सेवा हीच खरी ईश्‍वरसेवा याप्रमाणे प्रशासकीय सेवा ही समाजासाठी पर्यायाने देशासाठी काम करणे समजले जाते. त्याबरोबरच प्रशाकीय सेवा म्हटलं की, अधिकार, मान-सन्मान मिळत असल्याने आजच्या तरुण वर्गाचा ओढा हा प्रशासकीय सेवेत करिअर करण्याकडे जास्त दिसतो.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे परीक्षा घेऊन प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांची निवड केली जाते. अनेक उमेदवारांमधून सर्वोत्तम उमेदवारांची निवड या स्पर्धा परीक्षेद्वारे होते. कोणत्याही शाखेतील पदवी घेतल्यानंतर विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देण्यास पात्र असतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग(एम.पी.एस.सी): राज्यशासनामार्फत ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेद्वारे वर्ग एक, दोन आणि तीन अधिकार्‍यांची निवड केली जाते. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, राज्यकर निरीक्षक, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, वित्तलेखा अधिकारी, तहसिलदार, गटविकास आधिकारी, नायब तहसिलदार तसेच पी.एस.आय., मंत्रालय साहाय्यक या पदांसाठी निवड केली जाते. या सर्व पदांसाठी एम.पी.एस.सी.तर्फे राज्यसेवा परीक्षा घेतली जाते. पूर्व म्हणजेच पात्रता परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे या परीक्षेचे स्वरूप असते.

परीक्षा स्वरूप : पूर्व परीक्षा वस्तूनिष्ठ स्वरूपातील (दोन पेपर) 400 गुण, मुख्य परीक्षा - वस्तूनिष्ठ स्वरूपातील मुख्य परीक्षा - 800 गुण, मुलाखत - 100 गुण.

शारीरिक पात्रता : पोलीस उपअधीक्षक (डी.वाय.एस.पी.), साहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपनिरीक्षक या पदांसाठी मुलांसाठी 165से.मी व मुलींसाठी 157से.मी उंची असणे आवश्यक आहे.

या परीक्षांसबंधी अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर पाहू शकता.

केंद्रीय लोकसेवा आयोग (यू.पी.एस.सी.) :

 आय.ए.एस., आय.एफ.एस., आय.पी.एस., आय.ए.ए.एस., आय.डी.ए.एस., यांसारख्या 24 पदांसाठी केंद्रशासनामार्फत संयुक्त परीक्षा घेतली जाते.

परीक्षेचे स्वरूप - पूर्व परीक्षा वस्तूनिष्ठ स्वरूपातील 400 गुण(2 पेपर),  सविस्तर लेखन स्वरूपातील मुख्य परीक्षा 1750गुण आणि 275 गुणांसाठी मुलाखत अशा एकूण 2025 गुणांसाठी संयुक्त परीक्षा.

या परीक्षांसबंधी अधिक माहिती www.upsc.gov.in या संकेतस्थळावर पाहू शकता.

शालेय स्तरापासून तयारी : एम.पी.एस.सी. व  यु.पी.एस.सी.चा अभ्यासक्रम पाहिला तर आपल्या लक्षात येईल की, महाराष्ट्र बोर्ड व एन.सी.ई.आर.टी.च्या इ.5वी ते इ.12वीपर्यंतच्या पाठ्यपुस्कतांचा अभ्यास करावा लागतो. या पाठ्यपुस्तकांतील मूळ संकल्पनांवर आधारित प्रश्‍न असतात. त्यामुळे या सर्वांची तयारी ही शालेय स्तरापासूनच करता येईल. पूर्व परीक्षांसाठी इ.5वी ते इ.10वी मराठी, इंग्रजी पाठ्यपुस्तकांतील व्याकरणाचा देखील समावेश असतो. आपल्या अभ्यासक्रमातील संकल्पना आपण आत्ताच नीट अभ्यासल्या तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे सोपे होईल. तसेच प्रज्ञाशोध परीक्षा, स्कॉलरशीप परीक्षा अशा परीक्षांमधून बौद्धिक क्षमतांमध्ये वाढ होते, त्यामुळे या परीक्षा आवर्जून द्याव्यात. रोज वर्तमानपत्र वाचले तर त्यातून चालू घडामोडीसंबधी ज्ञान मिळते. इंग्रजी व्याकरण सुधारण्याच्या दृष्टीने मराठीबरोबरच इंग्रजी वर्तमानपत्रही वाचावे.

यु.पी.एस.सी. परीक्षेकरिता एक वैकल्पिक (ऑपशनल) विषय असतो. बी.एस.सी., बी.ए., बी.कॉम, अभियांत्रिकी या शाखांमधून पदवी घेत असताना एका स्पेशल विषयाची निवड करावी लागते. तोच स्पेशल विषय यु.पी.एस.सी. देताना निवडता येतो. म्हणजेच या विषयाची तयारी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच करता येते.

प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी स्पर्धा परीक्षा एक उत्तम मार्ग असला, तरीही दिवसेंदिवस वाढणारी ‘स्पर्धा’ लक्षात घेऊन त्याकरिता तितकीच मेहनत घेणे आवश्यक आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर ऐन उमेदीची वर्षे तुम्हाला या परीक्षांच्या अभ्यासासाठी खर्च करावी लागतात. प्रत्येक विषयांचा सखोल अभ्यास आणि दिवसांतले 12 ते 14 तास संयमाने अभ्यास करण्याची तयारी असेल तरच करिअर म्हणून स्पर्धा परीक्षांचा विचार करा.

अनिल भोसकर