मुलांनो, मी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली.

बातमी होती शासनाने प्लास्टिकच्या पिशवी (कॅरीबॅग)वर बंदी घातली आहे. तसेच एका खाजगी कंपनीने पाणी पिऊन टाकून दिलेल्या प्लास्टिकच्या बाटलीचा पुनर्वापर करून नवीन वस्तू बनवण्यास सुरुवात केली आहे.

या बातम्या वाचल्यावर जुन्या आठवणी डोळ्यांसमोर आल्या. 30 ते 40 वर्षांपूर्वी कापड, प्लास्टिक, रबर या वस्तू मर्यादित स्वरूपात उपलब्ध असल्याने पुनर्वापर हा शब्द माहीत नसतानाही आम्ही तो जगलो.

वर्षभर वापरून जुन्या झालेल्या कपड्यांची आजीने हाताने शिवलेली गोधडी, शिंप्याकडून नवीन कपड्यांच्या रंगीत तुकड्यापासून बनवलेल्या पिशव्या, तुटलेली प्लास्टिकच्या बादलीची व गळक्या माठाच्या कुंड्या, रिकाम्या पावडरच्या डब्यात ठेवलेले दंतमंजन, दुधाच्या पिशव्या स्वच्छ धुवून त्यात रेशनकार्ड, पैसे, तिकिटे किंवा महत्त्वाचे कागद असायचे. वाणसामानाचा कागद वस्तू ठेवण्यासाठी जपला जायचा. त्याचा दोरा गुंडाळून त्याचा गोधडी शिवताना, फुलांचे हार बनवताना, क्रोशाच्या सुईने रूमाल विणताना उपयोग व्हायचा. लोखंडाच्या वस्तू अनेक दिवस अडगळीत साठवून त्या भंगारात विकायचे. पुढे त्याचा कारखान्यांना उपयोग होतो व पैसेही मिळतात. आम्ही रद्दीचे पेपर भिजवून लगदा बनवून, टोपल्या, फ्लॉवर पॉट यांसारख्या वस्तू बनवून रंगवून शाळेत सर्वांना दाखवायचो. मजा यायची. शिवाय मार्कही मिळायचे. या वस्तूंना घरात विशेष जागा असायची. पाहुणे, शेजारीपाजारी यांना दाखवून त्याचे कौतुक करायचे. खूप आनंद मिळायचा वस्तू बनवण्याची जणू चुरसच असायची.

घरात आईच्या हातची फोडणीची पोळी, आंबट ताकातली उकड, कुरडई कांदा, परतलेला भात हेही शिल्लक पदार्थ आवडीने खाल्ले जायचे.

मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का आपल्या भोवतालचा निसर्गही नकळत पुनर्वापर करण्यास सांगतो.

फळे खाऊन टाकून दिलेली बी पुन्हा मातीत रूजून त्यापासून नवीन रोप व नंतर झाड तयार होते.

पावसाचे पृथ्वीवर पडणारे पाणी सर्वांना तृप्त करते. झाडे, पशुपक्षी, नदी-नाले, विहिरी, तलाव, धरती सर्व चिंब भिजवून उरलेले पाणी समुद्रात मिसळते व त्याची सूर्यामुळे वाफ होऊन पुन्हा आपल्याला जीवन मिळते.

झाड सजीव असताना ते सावली देते. फळे, पाने, फुले देते. मुळांद्वारे जमिनीची धूप थांबवली जाते. मानवाने विविध लाकडी वस्तू बनवून वर्षानुवर्षे त्याचा पुनर्वापर केला. वस्तू तुटल्यावर त्याचा इंधन म्हणून उपयोग केला. लाकडापासून मिळणार्‍या कोळशांचाही वापर इंधन म्हणून होऊ लागला. कोळशांची राख होते, ती भांडी घासणे तसेच खतात मिसळून शेतात टाकतात. अशा या नैसर्गिक वृक्षांचा पुनर्वापर होऊन ते पुन्हा निसर्गातच एकजीव होतात. म्हणूनच वृक्षाला परोपकारी म्हणतात.

मुलांनो, निसर्गानंतर आपली सृष्टी पुनर्वापरानेच स्वच्छ व सुंदर ठेवली आहे.

विचार करा जर समुद्राच्या पाण्याची वाफ झालीच नसती तर? लाकडासारख्या नैसर्गिक वस्तूंचा पुनर्वापर करताच आला नसता तर? या पृथ्वीवर सांडपाणी व नैसर्गिक वस्तूंचा किती कचरा झाला असता? त्याचे आपण काय केले असते?

सध्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीने मानवी जीवनात उपयोगी पडणार्‍या रक्तदान, नेत्रदान, देहदान ही उदाहरणे पण पुनर्वापराचीच आहेत.

मुलांनो, आपण सर्व जण मानवाने बनवलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येईल का याचा विचार करू या!

कदाचित तुम्हा मुलांमध्येच अशा शास्त्रज्ञ लपलेला असेल जो मानवनिर्मित वस्तूंचा, कचर्‍याचा पुनर्वापर करण्याची पद्धत शोधून काढेल व ती बातमी वर्तमानपत्रामध्ये वाचण्यास आम्हाला नक्कीच आवडेल. तोपर्यंत एवढे तर नक्कीच करू यात -

1) बाजारात जाताना कापडी पिशवी घेऊन जा.

2) जेवणासाठी धातूची ताट-वाटी-पेला वापरा.

3) use & throw च्या वस्तू वापरणे टाळूयात.

धन्यवाद!

छाया आबनावे