अचानक दुपारी दोघेजणं एकमेकांच्या बाजूला आले. नेहमी, एक घरात गेला कि दुसरा बाहेर पडतो आणि दुसरा घरात गेला की पहिला बाहेर पडतो.

पण आज दुपारीच सिमरन घरी आली आणि तिची तब्येत बिघडली.

त्या घाईत हे दोघे तसेच राहिले घराबाहेर. टेबलावर उताणे पडलेले... एकमेकांच्या तंगड्यांना तंगड्या लावून.

 एकाने दुसर्‍याकडे स्वच्छं नजरेनं पाहिलं तर दुसर्‍याने पहिल्याकडे रंगीत घट्ट धुरकट नजरेनं पाहिलं.

“एकदा उन्हं वाढली की घराबाहेर पडू नयेसं वाटतं. सगळीकडे  भगभगीत उजेेड. प्रत्येक गुळगुळीत चकचकीत वस्तू आणखीनच चमकते. त्यातून चकाकणारे झगझगीत किरण डोळ्यांवर पडले तर सणकून त्रास होतो.”

“यापेक्षा सगळ्यात मस्त म्हणजे दिवसभर सावलीत राहावं आणि रात्री स्वच्छं काळोखात! व्वा!! काय मजा येईल?”

“सगळ्यांचं असंच व्हायला हवं. हा दिवसभर झळाळणारा तेजस्वी सूर्य कायमचा मस्त मंद व्हायला हवा. किंवा सूर्यच पार मावळून जायला हवा.”

हे ऐकल्यावर दुसर्‍याचं डोकंच फिरलं!

आपल्या रंगीत नाजूक तंगड्या झाडत तो म्हणाला, “काय बोलताय याची शुद्ध आहे का तुम्हाला? म्हणे सूर्य कायमचा मावळायला हवा! व्वा! उद्या सगळी माणसं मावळली पाहिजेत असंही म्हणाल?”

“अहो, सूर्य आहे म्हणून मी आहे आणि माणूस आहे म्हणून आपण दोघे आहोत... हे तरी कळतंय का तुम्हाला? तुमचे डोळे नेहमीच पांढरे, तुम्हाला काय सांगायचं?”

“त्या जळजळीत सूर्याचा आणि तुमचा काय संबंध? आणि तो मावळला तर तुम्हाला काय त्रास आहे? हे मला समजत नाही. आधीच तुमच्या डोळ्यांचा हा असला विचित्र रंग असल्याने तुमच्या मनात काय आहे, ते काही कळत नाही. शिवाय तुमचं हल्ली नाव ही बदललंय म्हणे? खरं का?”

“कमाल आहे तुमची! एकावेळी किती प्रश्‍न विचारता? उत्तरं देतादेता माझ्या डोळ्यांचा रंगच उडायचा!”

“अहो, त्या सूर्याची भगभग ज्या माणसांना सहन होत नाही ती माणसं आम्हाला वापरतात. उन्हात जाताना ती तुम्हाला बाजूला करतात आणि आम्हाला त्यांच्या नाकावर ठेवतात. मग त्यांच्या डोळ्यांना गारगार वाटतं. त्यांना भरदूपारी संध्याकाळ झाल्यासारखं वाटतं आणि गंमत म्हणजे एकदम सावलीत किंवा अंधारात आल्यावर त्यांना धडपडायला होतं. मग ते मला काढतात व तुला नाकावर ठेवतात.”

“उगाच मला थापा मारू नकोस! दुपारी डोक्यावर टळटळीत सूर्य असताना, त्या वेळेला  संध्याकाळ समजायला माणसं काही मूर्ख नाहीत व सावलीत धडपडायला माणसांनी काही डोळे मिटलेले नाहीत.”, हे असं बोलताना चष्मा चांगलाच तणतणला होता.

गॉगल हसत म्हणाला, “उगाच उन्हाची सावली करू नकोस. ‘दुपारी रंगीत जग पाहून एकवेळ डोळे फसतील पण माणूस नाही’, ही चीन म्हण नेहमी लक्षात ठेव.”

“अरे, माणसानेच काय तूसुद्धा दुपारी जरी माझ्यातून पाहिलंस तरी तुला संध्याकाळच वाटेल. कारण माझे डोळेच रंगीत आहेत ना! उन्हात माणसांच्या डोळ्यांना जरा गार वाटावं म्हणून वापरतात मला ते. आणि काळोखात माझ्यातून पाहिलं तर दिसेल का? तूच सांग?”

“तू एवढा अभ्यास करतोस, टी.व्ही. पाहतोस, पुस्तकं वाचतोस, काहीबाही लिहितोस व सगळ्या जगाकडे स्वच्छ दृष्टीने पाहतोस म्हणजे तू किती हुशार?”

“हॅ! हा तुझा गैरसमज आहे.”

“अरे पाहातो मी, वाचतो मी पण ते सारं डोक्यात शिरतं माणसांच्या! माणसाला अक्कल आली ती माझ्यामुळेच!” म्हणून तर आम्हाला ‘ज्ञानाची खिडकी’ म्हणतात ते काही उगीच नाही!”

“व्वा! क्या बात है! म्हणजे मग आम्ही ‘रंगीत खिडकी’हो ना?”

“आपली भेट फार क्वचित होते नाही का?”

“खरं आहे!”

“एकाच नाकावार कधी दोन चष्मे राहात नाहीत” असं आपल्यात म्हणतात ते काही उगीच नाही.”

चष्मा हसून पाय हलवत म्हणाला,“येस! पण तुझी ती नवीन नावं कुठली रे?”

“पूर्वी मला ‘गॉगल’ म्हणायचे. हल्ली मला कुणी ‘आय गियर’ म्हणतं; तर कुणी ‘कलर विंडोज’ म्हणतं. काहीजणं मला ‘सन ग्लासेस’ म्हणतात, तर काही मला लाडाने ‘सनी ग्ला’ म्हणतात. कुठल्याही नावाने हाक मारली तरी मला ओळखता येतं...”

“आँ! ते कसं काय?”

“अरे, कमालच आहे रे तुझी! मला हाक मारायच्या वेळी त्यांची वेळ ठरलेली असते आणि खरं सांगायचं तर त्या वेळी तुझी वेळ भरलेली असते.”

 राजीव तांबे