नातं त्याला विचारा जो आपल्या माणसाची आतुरतेने वाट बघत असतो. वाट बघणं संपलं आणि हवी हवी असलेली व्यक्ती समोर दिसली की, जे डोळ्यांत दिसतं ते खरं नातं, आपुलकीचं नातं.

पाऊस आणि मानवाचं देखील एक नातं असतं. वाळवंटात राहणार्‍या व्यक्तीला विचारून पाहा, पाऊस कसा वाटतो ते. काहींना तर पाऊस म्हणचे काय? ते देखील ठाऊक नसेल. शेतकर्‍याला विचारा पाऊस कसा वाटतो ते. पोटच्या लेकरावर देखील नसेल इतकं प्रेम त्याचं त्या पावसावर असतं. ढग भरून आले की, ह्याच्या आनंदाला पारावर उरत नाही. मोठ्या कष्टाने पेरलेलं ते बियाणं रोपट्याचं रूप धारण करू लागतं. तेव्हा त्याच्या कष्टाचं खरं चीज होतं. आता फक्त तो देवाकडे एकच मागणं मागत असतो की, “जोपर्यंत ह्या रोपट्याला धडधाकट जीव लाभत नाही, तोवर कृपादृष्टी असू द्यावी.” काहींची प्रार्थना फळास पावते, तर काही धूपून जातात.

पाऊस जितका दयाळू-मायाळू तितकाच, तो उग्र-संतापी देखील असतो. जून महिन्याच्या सुरुवातीलाच त्याच आगमन होतं, तेव्हा लहानथोर मंडळी त्याच्या स्वागताने हर्षून ओलीचिंब होऊन नाचून आनंदोत्सव साजरा करतात. त्या वेळेस ढगांचा कडकडाट देखील हवाहवासा वाटतो. निसर्गाचं एक वेगळचं सौदर्यं दृष्टीस पडत असतं. काळेकुट्ट ढग, थंडगार वारा आणि त्यातूनच पडणारे हलके तुषार. पहिल्या पावसाचं वर्णन करायचं असेल तर प्रत्यक्ष त्यात भिजावं लागतं. अंगावर ते थेंब पडू द्यावे लागतात. पण पावसाचे थेंब आणि जमीन ह्यांचा जेव्हा मिलाप होतो, तेव्हा महागडी अत्तर आणि फुलांचा सुगंध देखील त्यासमोर फिका ठरतो. तो विलक्षण अनुभव घेण्याकरता आपण मुळात मानव असणं गरजेचं आहे. वय कितीही असलं तरीदेखील त्या वयात आपण लहान असणं आवश्यक असतं. हवा तितका पाऊस पडावा आणि मग थांबावा हे जर मानवाच्या हातात असतं तर कुठेही ओला दुष्काळ दिसला नसता. पोटच्या पोराला जपतात तसं एखाद्या शेताला जपायचं आणि अचानक आलेल्या वादळी पावसाने ते सर्व वाहून न्यायचं. निसर्ग सुंदर बनवणं हे जरी आपल्या हातात असलं, तरी हवामानात योग्य तो बदल घडवून आणणं हे मानवाला आजही शक्य झालेलं नाही.

पावसाला कोणी आपला मित्र मानतो, तर कोणी कट्टर शत्रू. मित्र का? तर योग्य वेळी येऊन सर्वच सुंदर बनवतो. लाखमोलाची देणगी देऊन जातो. शत्रू का? तर ज्या वेळी त्याने अजिबात यायला नको, नेमका त्याच वेळी येतो आणि सर्वनाश करून जातो. पाऊस आणि मानवाचं नातं हे असचं परिस्थितीनुसार बदलत राहणार.

डोंगरदर्‍यांवर हिरवीगार शाल आणून ठेवणारा हा पाऊस ऐन उन्हाळ्यात कधी एकदाचा येतो आणि आम्हाला भिजवतोय असं होत असतं. ऑफिसला जाणार्‍या कर्मचारी वर्गाला घरातून निघताना आणि ऑफिसला पोहोचेपर्यंत पाऊस पडूच नये असं वाटतं. तर निसर्गप्रेमी लहानथोर व्यक्तींना तो भरपूर पडावा आणि डोंगरावरून पडणारे सर्वच्या सर्व धबधबे छानपैकी तुडुंब भरून वाहावेत आणि एखाद्या शनिवार-रविवारी, आपण त्याखाली मनसोक्त भिजायला जावे, असं वाटतं.

पाऊस कधी आणि कसा पडावा हे आपल्या हाती नक्कीच नाही. तरीसुद्धा मनात वेडी आशा लावून ठेवणारा मानव हा सदैव त्याचा ऋणी राहणार. जसं पाणी म्हणजे जीवन, तसचं पाऊस हा त्याचाचं जन्मदाता.

मानवाचं जीवन समृद्ध करण्यासाठी त्या पावसाचं आगमन ह्या पृथ्वीतलावर झालेलं आहे. तेव्हा मानवा सज्ज हो. निरागस मनाने आपल्या हाती ओंजळ त्यांच्या तुषारांनी भरून त्याचं स्वागत कर आणि भरभरून प्रेम कर. तो कधीच तुला काहीही कमी पडू देणार नाही.

- प्रिती प्रसाद विभुत(पालक)

एस. पी. एम. इंग्लिश मिडीयम स्कूल,परशुराम