फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. एका जंगलात एक मोऽऽठ्ठं झाड होतं. ‘हॉस्पिटल झाड’. ते झाड म्हणजे जंगलातल्या सर्व पक्षी-प्राण्यांच्या बाळांचा दवाखाना होता. तुम्ही जाता की नाही बाळं बघायला दवाखान्यात? अगदी तस्सच बरं का!

त्या झाडाच्या फांद्यावर पक्ष्यांनी वेगवेगळी घरटी बांधून आपली अंडी घातली होती. बुलबुल, चिऊचं पिटूकलं घरटं, कावळ्याचं काटक्याचं, शिंपिणीचं पानं शिवलेलं तर सुगरणीचं झोपाळ्यासारखं झुलणारं. झाडाच्या खालीसुद्धा हरीण, ससा, हत्तीण इत्यादींनी आपली पिल्लं घातली होती  तिथे त्यांच्यासाठी भरपूर गवत, फळं, कोवळी पानं होती ना! फक्त त्या झाडांच्या एका छोट्या फांदीवर कोपर्‍यातल्या पानावर काळं, मण्यासारखं एक अंडं चिकटलेलं होतं. कोणाचं होतं कोण जाणे?

सगळे प्राणी आपापसात म्हणायचेसुद्धा, “कोणाचं अंडं आहे हे? कोण बघणार त्या पिल्लाकडे?”

“अशी कशी आई सोडून केली याची?”

काही दिवसांनी सर्व पक्ष्यांच्या अंड्यांतून छोटी-छोटी पिल्लं बाहेर आली. पक्षी आई-बाबांची त्यांना खाणं आणून द्यायला एकच गडबड सुरू झाली. पण त्या मण्यासारख्या काळ्या अंड्याकडे बघायला मात्र कोणीच नव्हतं.

एक दिवस ते काळं अंडपण फुटलं आणि त्यातून बारीक अळीसारखा एक किडा बाहेर आला. सरपटत चालू लागला. त्याला पाहून सगळे खो-खो हसायला लागले. त्याला नावं ठेवायला लागले.

“आई नाही, बाबा नाही, माहीत नाही कोणी,

नाव नाही, गाव नाही, कोण हा प्राणी?”

किड्याला फार वाईट वाटले. तो विचार करू लागला. ‘खरंच कोण आहे मी? माझी आई कोण आहे?”

आणि खरोखरच किडा जो एका फांदीवर बसला तो उठेचना जागचा!

तोपर्यंत सर्व पक्ष्यांनापण ही हकीकत समजली.

आपापल्या पिल्लांना रागावून तेपण किड्याची समजूत घालायला आले. पण किडा काही उठेचना. उलट त्याने खाणं-पिणं पण बंद करून टाकलं.

पिल्लांनापण आपली चूक आता समजली होती. ते सुद्धा किड्याची माफी मागू लागले.

पण किडा काही हालचाल करेना. अगदी तपश्‍चर्येलाच बसला तो. आपल्या लाळेचा धागा करून त्याने अंगाभोवती गुंडाळायला सुरुवात केली.

त्या कोषात त्याने स्वत:ला बंदिस्त करून टाकलं आणि तोंडाने बाप्पाचा जप! असे बरेच दिवस तो बसला. त्याची चिकाटी पाहून शेवटी खरंच देवबाप्पा त्याच्यावर प्रसन्न झाले आणि म्हणाले, “वेड्या असा काय बसलायस? तू कोण आहेस माहित्येय का तुला? तू किती सुंदर आहेस .” किडा रुसून म्हणाला, “देवा तू पण माझी चेष्टाच करतोस?”

“नाही रे,” देव म्हणाला. “तू या कोषातून बाहेर पडून बघ तर खरा स्वत:कडे.”

देवाने असे म्हटल्यावर किड्याने आपल्या भोवतीचा कोष फाडायला सुरुवात केली. आजूबाजूला सगळे पक्षी प्राणी होतेच बघायला. आता किडा बाहेर येणार म्हणून त्यांना बरे वाटले. पण काय गंमत झाली...

कोषातून किड्यांऐवजी परीसारखे सोनेरी पंख असलेला त्यावर निळे, लाल ठिपके झगमगत असलेला एक सुंदर प्राणी बाहेर आला आणि भिरभिरू लागला. सर्वजण त्याच्या रंगीबेरंगी सुंदर रूपाकडे बघत बसले. कोण होता तो प्राणी? बरोबर...  फुलपाखरू.

फुलपाखराकडे कौतुकाने बघत बाप्पा म्हणाले, “तुझ्या या चिकाटीचं, तपश्‍चर्येचं फळ म्हणून मी तुला या पंखाबरोबरच एक छोटीशी सोंड देणार आहे. तुझ्या हत्तीदादासारखीच पण एकदम पिटुकली. त्यामुळे आता तुला पानं खावी नाही लागणार, तर तू आता फक्त फुलांतला गोडगोड मधच पिऊन राहाशील.

यावर फुलपाखरांसकट सर्वांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. पक्षी किलबिलाट करू लागले.

‘फुलाफुलांवर उडत जाई, गोड मध चाखून खाई,

रंगबीरंगी ह्याचे अंग, परीचे नाजूक सोनेरी पंख

नका ह्याला हातात धरू, छान आमुचे फुलपाखरू’

आणि तेव्हापासून अंड, अळी, कोष अशा बालपणीच्या अवस्था पार करून फुलपाखरे रंगीबेरंगी पंख लावून मध खात फुलांवर उडू लागली.

शिवानी जोशी 

(सहशिक्षिका, शि.प्र.मं.मुलींची शिशुशाळा, पुणे)