मने मोकळी, हास्य मोकळे, उत्सव प्रसन्नतेचा!

मनामनांच्या नभात दाटो सुगंध संवादाचा ॥

गुरुशिष्यांच्या संवादातुन

स्नेह पाझरे पहा चिरंतन

सहज मिळतसे ज्ञान तयातुन

‘या हृदयातुन त्या हृदयी’ तो प्रवाह सद्भावांचा

मनामनांच्या नभात दाटो सुगंध संवादाचा ॥

आईच्या मंगल शब्दांतुन

वात्सल्याचा वर्षतसे घन

स्पर्श जणू हृदयाचे स्पंदन

मातेचा संवाद मूर्तिमान गौरव संस्कारांचा।

मनामनांच्या नभात दाटो सुगंध संवादाचा ॥

सशब्द कधि वा शब्दांवाचुनी

कधि नजरेच्या विभ्रमांतुनी

मायेच्या वत्सल स्पर्धातुनी

मौनातुनही मुखरित होतो उत्सव शब्दांचा।

मनामनांच्या नभात दाटो सुगंध संवादाचा ॥

व्देष, वासना, हिंसा, मत्सर

अहंकार अन् क्रोध अनावर

- संवादातिल हटवू अडसर

सारे मिळुनि चला धरू तर पंथ विवेकाचा।

मनामनांच्या नभात दाटो सुगंध संवादाचा ॥

मने जुळवु या - संवादातुन!

साधु समन्वय - संवादातुन!

संघर्ष टाळु या - संवादातुन!

प्रकाशयात्री सारे आपण, निःपात करू काळोखाचा।

मनामनांच्या नभात दाटो सुगंध संवादाचा ॥

- श्री.वा.कुलकर्णी