मलाही क्रिकेट खेळायचं होतं. पण मी गप्प उभा होतो. मैदानावर, एका कडेला, चिंचेच्या झाडाखाली...

माझे वर्गमित्र मला खेळायला घेत नव्हते. कारण मी वर्गात ‘नवीन’ होतो. त्यांचा ग्रूप जुना होता. मला एकटं वाटत होतं. खूप वाईटही वाटत होतं.

माझी शाळा पाचवीत बदलली होती. मी या शाळेत आलो होतो. चांगली शाळा म्हणून मला या शाळेत घालण्यात आलं होतं. मी माझ्या जुन्या वर्गमित्रांना मिस करत होतो.

शाळा चांगली, मग शाळेतील मुलं का चांगली नव्हती? शाळा जुनी, दगडी, मोठ्ठं मैदान असलेली. जूनचा महिना, पण पाऊस नव्हता. शाळा सुरू होऊन दोनच दिवस झालेले. ढगाळ वातावरण, पण अशाच वेळी खेळायला मजा येते. नाही तर बॉल धरताना तोंडावर ऊन येतं. त्यामुळे कॅच सुटतो ना!

मी आपला उगा इकडे-तिकडे पाहत होतो. शाळेचं मैदान जिवंत झालं होतं. हा जिवंतपणा घंटेचा टोल होईपर्यंत. घंटा वाजली की मधली सुट्टी संपली.

माझी नजर एका मुलावर पडली. तोही माझ्यासारखाच उभा होता. तोही ‘नवीन’ असावा. तो माझ्याच वर्गात होता आणि नवीनही होता. मी त्याच्याशी बोलू लागल्यावर त्याला बरं वाटलं.

तेवढ्यात समोर आरडाओरडा झाला. काय झालं असावं? समोरच्या मुलांचा बॉल मैदानाच्या भिंतीवरून पलीकडच्या घराच्या अंगणात गेला होता. अन् तिथे राहणार्‍या आजी डेंजर होत्या. त्या मुलांना रागवायच्या. बॉल गायबच करून टाकायच्या आणि मुलं तिथं जायला घाबरायची.

एकाने मला विचारलं, ‘‘बॉल आणतोस?’’

मनात म्हटलं - ही आयडिया भारी! त्याला म्हणालो, ‘‘आणतो पण मला खेळायला घेणार का?’’ तो  ‘‘हो’’, म्हणाला.

मी पटकन भिंतीवर चढलो. बॉल घेऊन बाहेर आलो. त्याच वेळी घंटा वाजली. माझ्या लकचं बॅडलक!

दुसर्‍या दिवशी मला खेळायला मिळालं. मी चांगला बॉलर होतो. धडाधड विकेट्स काढल्या मी. माझं नाव राज आहे. पण त्यांनी मला ‘भुवनेश्वरकुमार’ नाव ठेवलं. आयपीएलचा बॉलर!

दुसर्‍या दिवशी आम्ही ‘पाचवी ब’शी मॅच घेतली. आमचा विकेटकीपर चांगला नव्हता. तो बॉल पकडत नसून कोंबड्या पकडत होता. आम्ही हरलो!

तो दुसरा नवीन मुलगा, त्याचं नाव होतं जय. तो म्हणाला, ‘‘मी चांगला विकेटकीपर आहे.’’ मी जरा संशयानेच पाहिलं. तोही नवीन होता ना! पण मी आमच्या कॅप्टनला सांगितलं, ‘‘याला घ्या. हा भारी विकेटकीपर आहे. धोनीच!’’ दिलं ठोकून.

आम्ही जयला घेतलं...आणि मग काय? धमाल!

माझी बॉलिंग, जयची विकेटकीपिंग. ‘पाचवी ब’ला आम्ही वाईट हरवलं. जय खरंच भारी विकेटकीपर होता. शाळा, अभ्यास चालू होतंच, पण रोज एका वर्गाशी मॅच चालू होती. आम्ही टॉप होतो. आम्ही सगळ्या तुकड्यांना हरवलं. एक सोडून ‘सातवी क’. ते भारी होते.

 पण एके दिवशी आम्ही त्यांनाही हरवलं. तेव्हा मुलांनी मला मिठीच मारली. मारणारच! धडाधड विकेट्स काढल्या होत्या ना. कॅप्टनने मला ‘पर्पलकॅप’ दिली. आयपीलसारखी. उत्कृष्ट बॉलर म्हणून.

मी ती न घालता गप्प उभा राहिलो. आमच्या जाडू अंपायरने, धवलने विचारलं, ‘‘का रे काय झालं?’’

‘‘नाही रे.’’

‘‘पण मी जेव्हा नवीन होतो. तुम्ही मला खेळायला घेत नव्हता. त्यादिवशी बॉल त्या आजींच्या बंगल्यात गेला नसता तर?... तुम्ही मला खेळायला घेतलं नसतं. हा जय हासुद्धा नवीन आहे. तो कसा खेळतो, मला नव्हतं माहीत, पण त्यालाही खेळायला मिळावं म्हणून खोटं बोललो चक्क, की हा धोनी आहे म्हणून.’’

‘‘आम्ही या शाळेत नवीन आहोत रे! आम्हाला तुमच्याबरोबर खेळावंसं वाटतं. बोलावंसं वाटतं. नवीन मुलांना मिसळायला अवघड वाटत असतं. एकटं एकटं वाटत असतं!’’

‘‘हो रे, मलाही असंच वाटलं होतं. मी पहिलीत असताना नवीन होतो. मला रडूच यायचं. घरी पळून जावंसं वाटायचं.’’, धवल म्हणाला.

‘‘हं! मग आता एखादा नवीन मुलगा आला तर, आपण त्याला आपल्यामध्ये घ्यायचं. त्याच्याशी बोलायचं. त्याला एकटं वाटायला द्यायचंच नाही. आहे कबूल?’’ मी म्हणालो.

सगळी मुलं एका स्वरात ‘हो’ म्हणून ओरडली. मग आम्ही रिंगण करून नाचलो. मधल्या सुट्टीत आम्ही क्रिकेट खेळत होतो आणि आमचा बॉल गेला आजींच्या अंगणामध्ये.

मी इकडेतिकडे पाहिलं. एक मुलगा दिसला. नवीन असावा. उशिरा प्रवेश घेतलेला. तो आमचा खेळ पाहत होता. मी त्याला विचारलं, ‘‘काय रे, बॉल आणतोस का? आणलास तर खेळायला घेऊ.’’

तोही लगेच भिंतींवर चढला, पण त्याने बॉल आणला नसता तरी मी त्याला खेळायला घेतलचं असतं.

मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं?... नवीन मुलांशी तुम्हीही मैत्रीने वागाल ना?

- ईशान पुणेकर