खोल, दोतारा

दिंनाक: 25 Jun 2019 16:08:20


 

खोल :
खोल हे वाद्य आसाम-बंगाल प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे. पूर्व भारतातील वैष्णव भजन खोल शिवाय होईल अशी कल्पनाही करता येत नाही. त्याला इतके पवित्र वाद्य मानतात की त्याचा उल्लेख नेहमी आदरपूर्वक श्री खोल’ असा करतात. श्रीचैतन्यस्वामींनी (इ.स. 1485-1533) खोल हे वाद्य बंगालात लोकप्रिय केले असे म्हणतात. सामुदायिक भजन-कीर्तनाची प्रथा त्यांनीच सुरु केली व त्यात खोलाला प्रमुख स्थान दिले. तसेच आसाममध्ये संत श्रीशंकरदेवांनी (इ.स. 1449-1598) वैष्णव मठात संकीर्तनाची प्रथा पाडली व त्यात खोलाची साथ घेतली. खोलाचे खोड फणसाच्या किंवा आंब्याच्या झाडाच्या लाकडाचे असते. मातीच्या खोलाला मृदंगच म्हणतात. खोलाची लांबी सुमारे 75 सें. असते. फुगारा एका बाजूला व उतार विषम असल्यामुळे उजवे तोंड 15 सें. व्यासाचे व डावे तोंड 25 सें. व्यासाचे असते. पुडांची रचना तबला-पखवाजाप्रमाणे गजरा व दोन चामड्यांच्या पापुद्र्यांची असते व दोन्ही पुडे वादीने ताणलेली असतात. पण त्याला गठ्ठे नसतात. वाद्य बनवतानाच पुडी सुरात वाजेल इतकी वादी ताणून बांधतात. गजर्‍यावर हातोडीने ठोकण्याचा प्रघात नाही. 

 
 
दोतारा :
दोताता हे लोकसंगीतात वापरण्यात येणारे वाद्य आहे. साधारणपणे याला दोन तारा असतात. क्वचित चार किंवा सहा तारा असतात. हे वाद्य भवैया’ गाण्यांच्या साथीसाठी वापरतात. त्यामुळे यांना दोतारा गाणे असेही म्हणतात. एका लाकडी चौकटीवर कातडे ताणून हे वाद्य बनवितात. तांब्याच्या तारांचा वापर करुन, त्या वाद्याच्या खालच्या बाजूकडून वरच्या खुंट्यापर्यंत ताणून बसवितात. या तारा कटी’ (प्लेकट्रम)ने  छेडल्या जातात. कटी हे प्राण्यांचे शिंग, हाड किंवा लाकडापासून बनवितात. हे वाद्य बसून वाजविल्यास याचा खालचा भाग पायावर राहतो, तर उभे राहून वाजविल्यास, वाद्य गळ्यात अडकविले जाते.
 
- यशोधन जठार