शाळांना सुट्ट्या पडल्या की, रामकाकांच्या सोबत कोणत्या ना कोणत्यातरी गडावर जायचे हा आमचा बरेच वर्षांचा ठरलेला कार्यक्रम. अगदी तिसरीत असल्यापासून आमचा 12-15 जणांचा ग्रूप कोकणातल्या एखाद्या जुन्या किल्ल्यावर चढाईला जायचा. तिथे एक रात्र मुक्कामही करायचा. सह्याद्रीतली मोकळी हवा खायची. भरपूर व्यायाम झाल्यानं जोरदार भूकही लागायची. मग रात्री रामकाका आणि त्यांच्या सहकार्‍यांनी तयार केलेल्या खिडचीभातावर तुटून पडायचं. जवळ एखादं मंदिर असेल तर त्याच्या आश्रयाला झोपायचं. सकाळी उठल्यावर स्वत:चं सगळं आटोपून गडभ्रमंतीला बाहेर पडायचं. रामकाका, विश्वासकाका आमचे गाईड. त्यांच्यासोबत मग साहसी शिबिराला सुरुवात होई. दुपारपर्यंत कडेकपारीमधून चढाई कशी करावी, किल्ला चढताना अगर उतरताना कोणती काळजी घ्यायची, जर एखादा अपघात झालाच तर जीव कसा वाचवायचा इथपासून ते प्रथमोपचार म्हणजे काय ते कसे करायचे, संघभावना किती महत्त्वाची असते, या सगळ्यांवर चर्चा आणि प्रात्यक्षिके अशी मस्त बौद्धिक व शारीरिक मेजवानी असायची. सोबत आणलेला टॉर्च, दोरी, चाकू, इत्यादी वस्तूंचा वापर कधी आणि कसा करावा याचेही शिक्षण मिळे. दोराचा फास करणे, त्यावरच्या गाठीवर लटकणे याचेही प्रात्यक्षिक होई.
दिवसभर हे शिबिर चाले. सायंकाळी प्रात्यक्षिक आणि मग अगदी सूर्यास्ताच्यावेळी थंड हवेत गड उतरायला सुरुवात होई. गडाच्या पायथ्याशी रामकाकांची गाडी तयारच असे. सोबत भरपूर खाणे-पिणेही असे. मग सुरू होई परतीचा घराकडला प्रवास. घरी गेल्यावर दोन दिवस अंग नुसते आंबून गेलेले असे. दोन दिवस आळसाने लोळत काढल्यावर बरे वाटे. पुन्हा गडावर जायची इच्छा होई. गडावरचे प्रसंग आठवत.
यावर्षीचा ‘तो’ प्रसंग तर सार्‍यांच्याच लक्षात राहील असा होता. एक नवं आश्‍चर्य शोधण्यामध्ये आमच्या ग्रुपमधला सुजय आणि मुकुलचा महत्त्चाचा वाटा होता. या वर्षीची सहल भैरवगडावर न्यायची ठरलं आणि आम्ही सगळे पटपटा तयार झालो. सामानांची बांधाबांध करून रामकाकांचा टेंपो गाठला. गर्दी करून हौदात बसलो. टेंपो हळूहळू घाटरस्त्यानं भैरवगडाकडे निघाला. भैरवगडाच्या पायय्थाशी टेंपोनं आम्हाला सोडलं. तेव्हा दुपार उलटून गेली होती. ऊन थोडं कमी झाल्यावर आम्ही गडाच्या दिशेनं चालायला सुरुवात केली. अर्ध्या वाटेवर खिंडीपर्यंत जाईस्तो आम्हा सगळ्यांनाच दरदरून घाम फुटला. पहिली चढाई-पहिल्या दोन टप्प्याची चढाई पूर्ण करून आम्ही खिंडीपाशी पोहोचलो. तेव्हा सारेजण घामानं थबथबले होते.
खिंडीपाशी दगडावर सारेजण विश्रांतीसाठी थांबले तर हवेत आश्‍चर्यकारक बदल झालेला होताच. खिंडीच्या पलीकडच्या बाजूनं थंडगार हवेचा झोत आमच्या अंगावर येऊन आदळत होता. घामानं भिजलेली आमची शरीरं क्षणात गारेगार झाली. वार्‍याचं सुख म्हणजे काय ते अनुभवलं मग दिवस मावळतीला निघालाय हे पाहून पटापट भैरवगड गाठला. रात्री चांदण्यात बसून गप्पा मारत तांदुळाची मस्त खिचडी, लोणचे, पापड यावर ताव मारला. रात्रीचं थोडं आकाशदर्शन केलं आणि थकल्यामुळे लवकर देवळात जाऊन पथारी पसरली. रात्री गाढ झोप लागली. जाग आली ती पहाटेसच. रानकोंबड्यांचे, पक्षांचे आवाज कानी येत होते. मस्त फ्रेश झालो. चहा, बिस्किटे खाऊन मंदिरासमोरचे पहाड निरखून पाहू लागले.
‘‘रामकाका ते काय आहे?’’ समोर त्या कड्याच्या मधोमध दगडात गोल खड्डा कसला दिसतोय? रामकाकांनी दुर्बीण लावली. परंतु कड्याच्या पोटात अगदी मध्यभागी असलेला तो खड्डा कसला ते कळेना. वरच्या बाजूला घनदाट झाडी तर खाली खोल दरी. मधला कपारीत तो गुहेसारखा गोड खड्डा. अगदी काताळात  कोरल्यासारखा ती छोटी नैसर्गिक गुहा असवी. पण तिथपर्यंत कुणीही पोहोचू शकत नाही. आपण आज जाणार आहोत त्या वरच्या बाजूच्या जंगलात.’’ रामकाकांनी सांगितलेलं आणि आमचा उत्साह वाढला.
सकाळी पोटभर नाश्ता करून आम्ही तिकडे त्या वरच्या बाजूच्या जंगलाकडे गेलो. घनदाट झाडीतली वाट, जंगली तुपाच्या झाडाचा घमघमाट, करवंदांचा आस्वाद घेत घेत आम्ही त्या कड्याच्या वरच्या बाजूला पोहोचलो. दरीत डोकावून पाहाणे शक्य नव्हतेच; कारण झाडांनी आणि मोठमोठ्या वेलींनी संपूर्ण परिसर झाकलेला होता. एवढ्यात कुणीतरी आडव्या वाढत गेलेला जाडजूड वेलींवर चढून झोके घ्यायची कल्पना मांडली. सगळीच मुलं सुजय, मुकुल आणि इतरही सारेजण झोके घ्यायला धावले.
‘जरा जपून पलीकडे दरी आहे.’ रामकाकांनी सावध केलं; पण उत्साहाच्या भरात व्हायचं ते झालंच. सुजय आणि मुकुल अगदी पलीकडे दरीच्या काठावर असलेला वेलीवर चढले. झोके घेऊ लागले आणि क्षणार्धात वेल ज्या झाडावर चढली होती त्या झाडाखालचा पालापाचोळा मातीच्या ढेकळांसहीत खाली दरीत कोसळला. सुजय आणि मुकुल हातातल्या वेलींसहीत खाली दरीत दिसेनासे झाले.
‘‘घाबरू नका, तुम्ही मागे व्हा सगळे, सुरक्षित उभे राहा.’’ रामकाकांनी आदेश दिला. ते आणि विश्‍वास इरतही तीन-चार जण दोरखंड घेऊन दरीच्या काठावरच्या त्या झाडाकडे धावले. ‘‘सुजय मुकुल तुम्ही सुरक्षित आहात का?’’ ‘‘होय, आम्ही वेलाला पकडलंय, दगडाच्या कपारीत पाय घुसवलेत. परंतु वर येता येत नाहीये.’’ ‘‘ठीक आहे. आम्ही दोराची शिडी सोडतोय ती पकडा.’’
झाडाला दोरखंड घट्ट बांधून दोरखंडाची लांब शिडी रामकाकांनी दरीत सोडली. ती नेमकी सुजयच्या हाती लागली. त्यानं शिडीच्या बाजूच्या दोराला स्वत:ला नीट अडकवलं मग मुकुलच्या दिशेनं शिडी वळवली. दोघेही आता सुरक्षित शिडीवर आले आहेत. आता बोटाच्या अंगठ्यात शिडी पकडून सहज वर चढता येणार होते.
‘‘सुजय, ते बघ काय ते?’’ मुकुल ओरडला. सुजय आणि मुकुल नेमके त्या गुहेसारख्या भागाच्या जवळ आले होते. कपारीतल्या त्या गुहेत काहीतरी खोदकाम केलेलं दिसत होतं.
भैरवगडावरचं

साहस
 ‘‘रामकाका आम्ही ठीक आहोत. वर चढत येतो. पण इथे गुहेत काहीतरी कोरीवकाम दिसतंय? रामकाकांनी दोराला बांधून मोबाईल खाली पाठवला. मुकुलने पटापट फोटो-व्हिडियो काढले आणि मग दोघेही शिडीवरून चढत हळूहळू वर आले. 
रामकाकांनी त्यांना घट्ट पोटाशी धरलं. ‘‘मुलांनो, पायाखालचा पालापाचोळा फसवा असतो बरं. यापुढे काळजी घेत जा आणि दोरावरून दरीत लोंबकाळताना तुम्ही घाबरला नाहीत याबद्दल तुमचं अभिनंदन!
शूर आहात.’’
- प्रा. सुहास द. बारटक्के