ऱ्हीदमिक योग

दिंनाक: 21 Jun 2019 15:17:34


व्यायामाच्या निरनिराळ्या संकल्पना जगासमोर आल्या, येत आहेत आणि पुढे येतीलही. परंतु सर्व व्यायामशास्त्रात श्रेष्ठत्व राखणारे एकमेव व्यायामशास्त्र म्हणजे योगशास्त्र. महर्षी पतंजली ॠषींनी शोधून काढलेली ही योगपद्धत मधल्या काही दशकात काळाआड गेली होती खरी, परंतु आज मात्र उत्तमोत्तम योगप्रशिक्षक आपल्या भारतात मानाचे स्थान मिळवून बसले आहेत ते आपल्या योगातील अथक परिश्रम व अभ्यासाने. प.पू. रामदेवबाबांनी तर आपल्यातील योगसाधनेचा संपूर्ण कस लावून योगाला जागतिक पातळीवर नेऊन ठेवले. तरी अजूनही योगाचा बर्‍याच प्रमाणात प्रसार होणे आवश्यक आहे. यासाठी बांदकर गुरुजींसारखे तरुण पिढीसमोर आदर्श असणारे व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर येते. गेली सतरा वर्षे ते योग क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत.

बालपणापासूनच व्यायामाची आवड असणार्‍या बांदकर सरांनी योगशास्त्राला सर्वसामान्यांसमोर आणताना आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने सर्वच तरुणांना प्रभावित केले. बांदकरांना मुळात संगीताची आवड. ते उत्तम गायक असून त्यांनी अनेक अभंग रचनांना स्वत: चालबद्ध केले आहे. प.पू. सद्गुरू वामनराव पै यांचे आध्यात्मिक संस्कार असणार्‍या बांदकरांनी पुढे या सर्वांची सांगड घालून योगाच्या विविध अभ्यासक्रमांची रचना केली. त्यात पारंपरिक योग, पॉवर योग याचबरोबर ‘र्‍हिदमिक योग’ची निर्मिती केली. हल्लीच्या मुलांमध्ये आवड निर्माण होण्याकरता त्यांनी ही संकल्पना लोकांपुढे आणली. हा ‘र्‍हिदमिक योग’ नक्की काय आहे त्याबद्दल बांदकर सांगतात, ‘‘र्‍हिदमिक योग’करता लवचीकतेत तितक्याच निष्णात मुलांची आवश्यकता असते. योगासने आणि संगीत यांचा सुरेख मेळ घालून केले जाणारे विविध शरीर पवित्रे म्हणजे र्‍हिदमिक योग.’’ योग म्हटले की स्थिरता, शांती, मंत्र उच्चारण हेच शब्द डोळ्यांसमोर येत असल्याने विद्यार्थी पटकन अशा मार्गावर जाणे कठीण आहे. ही नाळ ओळखून बांदकरांनी योगाला संगीतबद्ध करून एक मनोरंजनात्मक कार्यक्रम आपणापुढे आणला. हा प्रकार शिकण्यासाठी वयाची तशी अट नाही. पाच वर्षांपासून मुले मूलभूत योगासने करू शकतात. जसजशी शरीराची लवचीकता वाढते, तसतशी कठीण कठीण आसने जमत जातात. मात्र बांदकर आपल्या योग स्टुडियोत याचे काटेकोरपणे प्रशिक्षण देत असतात. यात फॉरवर्ड बेंडिंग, विपरीत स्थितीतील बॅकवर्ड बेंडिंग, कटीभागाला पीळ देऊन केलेली ट्विस्टिंग आसने व बॅलन्सिंग - यात दोन प्रकार मोडतात, एक हँड बॅलन्स आणि दुसरा लेग बॅलन्स. यातील बरीचशी आसने पारंपरिक आसने असतात. परंतु एक विशिष्ट सादरीकरणामधून त्या आसनाची अंतिम स्थिती दर्शवली जाते. आसनावरची पकड त्यातील जोखीम दाखवणे हे र्‍हिदमिक योगपटूचे कौशल्य असते. दोनपासून 10-20 मुलांचा चमू हा प्रकार करतात. विविध मानवी मनोरे, त्यात मुले-मुले, मुली-मुली, मुलगे-मुली अशा जोड्यांनी व कसरतीचे थरारक प्रकार वापरून विद्यार्थ्यांचा समूह एक विशिष्ट वाद्यसंगीताच्या आधारावर केलेली ही कठीण योगासने दाखवताना अगदी डोळ्यांचे पारणे फेडतात. 15 ते 20 मिनिटे कालावधी असणारा हा सांगीतिक कार्यक्रम पाहताना टाळ्या वाजवताना बघ्यांचे हात थांबले तरच नवल. विशेष म्हणजे र्‍हिदमिक - सांगीतिक कार्यक्रमात दिव्यांचे काही नेत्रदीपक प्रकारही मुले दाखवतात, तेव्हा पाहणार्‍यांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असते. काचेचे ग्लास, त्यात जळती मेणबत्ती ठेवून ते ग्लास कपाळावर ठेवून तोल सांभाळत ही मुले एक-दुसर्‍याच्या जागेचा अचूक अंदाज घेऊन अतिशय कठीण आसने दाखवतात, तेव्हा सभागृहामध्ये सर्वत्र शुकशुकाट पसरतो. तो ग्लास कपाळावर पडतो की काय असे वाटू लागते. कारण एका बाजूला कपाळावर घाम आणि त्या घामामुळे कपाळावरचे ग्लास कपाळावर नाचत असतात. त्यामुळे पूर्णपणे एकाग्रतेचा कस लावून करणार्‍या या मुलांची साधना किती असेल याचाच सर्वांना प्रश्‍न पडतो. शिवाय हा ‘दीपयोग’ प्रकार ग्रूपने केल्यामुळे आपण आणखी सुखावून जातो. शरीर आणि मन यांच्या खर्‍याखुर्‍या ऐक्याची आणि शरीराच्या दिव्यत्वाची प्रचिती येते. खर्‍या अर्थाने हा कार्यक्रम पाहताना जणू हा कार्यक्रम संपू नये व या मुलांची कर्तबगारी नुसती पाहत राहावी असे वाटते. असे प्रकार शिकून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एक वर्ष प्रामाणिकपणे सर्व मूलभूत आसने शिकून शरीराची सर्व बाजूंनी लवचीकता मिळवावी लागते. ही मुले रोज किमान दोन तास सराव करतात, तेव्हा र्‍हिदमिक योग सिद्धीस जातो. प्रवीण बांदकरांनी र्‍हिदमिक योगामध्ये आणखी एक नवीन प्रकार आणला, तो म्हणजे बर्फावरच्या लाद्यांवर काही कठीण प्रकार. आता बर्फाच्या लादीला पकडण्यासाठी कुठूनही ग्रिप नाही, हे एखादे लहान मूलसुद्धा सांगू शकते. आपण बर्फाचा छोटा तुकडा नुसता हातात पकडला तरी संपूर्ण हाताच्या नसांमध्ये कळा लागतात. अशा बर्फाच्या बारा लाद्यांवर ही मुले संगीताच्या तालावर योगासनांची प्रात्यक्षिके सादर करतात. खलश धसिर हा प्रवीण बांदकरांनी दाखवलेला प्रकार. फक्त भारतातच नाही, तर भारताबाहेरसुद्धा हा प्रकार पाहून प्रवीण यांचे कित्येकांकडून कौतुक करण्यात आले. गेल्या मोसमांत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलामांसमोर सादर केलेला खलश धसिर पाहून 20,000 विद्यार्थी थक्क झाले होते.

प्रवीण बांदकर सरांनी आपल्या सुहासिनी ब्युटी हेल्थ योगा सेंटरमध्ये अशा प्रकारचा सराव निरंतर चालू ठेवला आहे. डोंबिवलीत राजाजी रोड, त्यानंतर एम.आय.डी.सी., पांडुरंगवाडी, लोढा हेरिटेज अशा विविध ठिकाणी त्यांचे वर्ग सुरू आहेत. सर्वसामान्यांसाठी योग-वेट लॉस असे विशेष वर्ग चालतात. यामध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे. शिवाय योग प्रशिक्षक अभ्यासक्रमसुद्धा आहे, जेणेकरून जास्तीत जास्त प्रशिक्षक तयार होतील व योगाचा प्रसार व प्रचार होईल. गेल्या सतरा वर्षांत प्रवीण बांदकर यांनी पंधरा हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण दिले असून त्यात शालेय विद्यार्थ्यांचा भरणा जास्त आहे. अनेक शाळांमधून विनामूल्य प्रशिक्षण, तसेच अंध-अपंग शाळा, महिलादिन, उन्हाळी शिबिरे असे विविध विनामूल्य उपक्रमही ते राबवीत असतात. अशा योगगुरू प्रवीण बांदकरांवर व्यायामातल्या व योगातल्या अनेक पुरस्कारांनी वर्षाव केला असून त्यांना भेटण्यासाठी व त्यांच्या मार्गदर्शनासाठी तसेच विद्यार्थ्यांची योगाची तालीम पाहण्यासाठी अनेक जण आवर्जून येत असतात.

(संपर्क - प्रवीण बांदेकर : 9819348365)

 

- प्रतिनिधी