परवा एका मैत्रिणीकडे आमचा पुस्तकट्टा जमला होता. दर आठवड्याला प्रत्येकीने वाचलेल्या एका पुस्तकावर चर्चा असते. चर्चा रंगात आली असतानाच, त्या मैत्रिणीचा सात-आठ वर्षांचा नातू सतत ‘आजी, मी बोअर झालोय गं’, असे पालुपद लावत होता. मला आश्‍चर्याचा धक्काच बसला. वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी हा मुलगा ‘बोअर’ होतो? खरे तर, कुतूहलाने जग पाहण्याचे हे वय. फुले, झाडे, पक्षी, रस्ता, माणसे, गाणी, गोष्टी; हे सारे पाहण्यात किती मौज असते. सायकल चालवत रस्त्यावरून जाण्यात, आकाशातल्या ढगांमध्ये विविध आकार शोधण्यात वेळ कसा पटकन निघून जातो नाही? तिकिटे, पिसे जमा करण्याचा; चित्र काढण्याचा जराही कंटाळा येत नाही. ही सारी मजा या मुलाने अनुभवलीच नाही का? मग कंटाळा दूर करण्यासाठी हा मुलगा कोणता मार्ग अवलंबेल? टि. व्ही., संगणक यांच्या अधीन होईल की, एखाद्या व्यसनाच्या आहारी जाईल? की आयुष्य अधिक ‘इंटरेस्टिंग’ करण्यासाठी भौतिक सुखांच्या मागे ऊर फुटेपर्यंत धावत राहील? चैन, चंगळवाद यात रमण्याऐवजी खर्‍याखुर्‍या व शाश्‍वत सुखाची ओळख करून देणे; ही शिक्षणसंस्थेची, कुटुंबसंस्थेची जबाबदारी नाही का?

शाळा आणि घर या दोघांनी मिळून या शतकाची आव्हाने पेलण्यासाठी, मुलामुलींना केवळ क्रमिक पाठ्यपुस्तके मुखोद्गत करणारे पोपट बनवून चालणार नाही; तर त्यांना सजग, समृद्ध होण्यासाठी विविध संधी, अनुभव दिले पाहिजेत. एकूणच अध्ययनात ‘प्रोसेस’ अधिक महत्त्वाची आहे, हे उमजले पाहिजे. आमच्या शाळेत पालकांना व शिक्षकांना एक प्रयोग करायला दिला. मुलांना ज्या गोष्टी प्राधान्याने शिकवल्याच पाहिजेत, अशा काही गोष्टींची यादी करायला सांगितली. त्यातल्या ठळक बाबी होत्या; इंग्रजी, गणित, तंत्रज्ञान, संस्कार, पाठांतर, स्पर्धा-परीक्षा कौशल्ये, आज्ञापालन, फाडफाड इंग्रजी बोलणे इत्यादी. ही यादी काय दर्शवते? आपली मुले पुढे आली पाहिजेत, म्हणून इंग्रजी स्मार्टपणे बोलता यायलाच हवे. स्पर्धा-परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळवून, मुलांनी लठ्ठ पगाराच्या नोकर्‍या मिळवल्या पाहिजेत. एकूणच, शिक्षणामुळे तथाकथित प्रतिष्ठा संपादन करता आली पाहिजे.

पाँडिचेरीच्या ‘श्री अरविंदो सोसायटी’ या संस्थेमार्फत प्रकाशित झालेल्या ‘How to bring up a child’ या पुस्तकात, मुलांना शाळेत कोणकोणत्या बाबी प्रामुख्याने शिकवल्या गेल्या पाहिजेत, याची सविस्तर चर्चा केली आहे. त्यामध्ये चिकाटी, साहस, आनंदीपणा, सत्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, सोशिकपणा, प्रगतीची इच्छा; अशा माणूस म्हणून मुलांना संपन्न करणार्‍या बाबी आहेत. त्यामध्ये विषयज्ञानाचा, परीक्षांचा उल्लेख आढळत नाही. शिकण्यातला आनंद बालकाला घेता आला पाहिजे, ही धारणा यामागे आहे.

अनेक शिक्षण संस्थांमधून विद्यार्थी शिक्षण घेत असतात. ते शिक्षित होतातही, पण विद्यार्थ्याने आपल्या अंत:प्रेरणेतून शिकले पाहिजे; असे वातावरण शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये आपण निर्माण करतो का? बहुसंख्य शिक्षकांना आदर्श विद्यार्थी हवे असतात. म्हणजे कसे? तर, शिक्षकांच्या प्रश्‍नांना अपेक्षित उत्तरे देणारे, गृहपाठ करून आणणारे, आज्ञापालन करणारे, शिक्षकांना शंका न विचारणारे, वर्गात शांत बसणारे; असे विद्यार्थी ‘चांगले विद्यार्थी’ म्हणून ओळखले जातात. अर्थातच, यामुळे काय होते; तर पाठ्यपुस्तके, शिक्षकांनी दिलेली टिपणे, गाईड्स या सार्‍यात मूळ शिकण्याची प्रक्रियाच होत नाही. शिक्षकांना जसे ‘विद्यार्थी पोपट’ हवे असतात, तसेच पालकांनाही अभ्यासू, भंडावून न सोडणारी, पालकांचा वेळ न मागणारी, प्रश्‍न न विचारणारी, पालकांच्या इच्छेप्रमाणे वागणारी मुले हवी असतात. मुलांना शाळेत घातले; क्लास लावला; वह्या-पुस्तके, गाईड्स व साहित्य उपलब्ध करून दिले; की मुलाने आपले आपण शिकावे व शाळेने त्याला शिकवावे असेच वाटते. आपल्या मुलातून एक चांगला माणूस तयार करण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची, नाजूक व म्हणूनच चॅलेजिंग असते; त्यामुळे त्याच्या या विकसनात आपण सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, असे फारच थोड्या पालकांना वाटत असते.

मुलांना वाढवणे म्हणजे शरीराने वाढवणे नव्हे; तर त्यांच्या आंतरिक, आत्मिक शक्तींचा विकास होण्यासाठी अनुकूल वातावरण घरात निर्माण करणे, हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे. To be able to educate, one must educate हे तत्त्व शिक्षक आणि पालक दोघांनीही आत्मसात करायला हवे. स्वत: सतत अध्ययनशील राहणार्‍या पालकांना, मुलांना सतत कोणत्यातरी रेडिमेड ज्ञान-साधनांवर अवलंबून राहावे लागत नाही. अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष जॉन केनडी यांनी आपल्या मातापित्यांनी दररोज आपल्याला त्यांचा सहवास ठरावीक वेळ आवर्जून दिल्याचे सांगितले आहे. भारतीय पालकांना त्यात काही विशेष वाटणार नाही हे खरे, पण मुलांना आपण आपला जो सहवास रोज देतो तो प्रेरक ठरावा; यासाठी स्वत:ला educate मात्र जाणीपूर्वक करायला हवे, हेही येथे लक्षात घेणे गरजेचे आहे.

शाळेत येण्याआधी दिवसातील अधिक वेळ मुले आईबाबांच्या सहवासात असतात. आजी, आजोबा, भावंडे यांच्याकडून होणार्‍या अनौपचारिक संस्कारांतून नकळत सतत शिकत असतात. ‘मला केवळ माझ्या कुटुंबाचाच नाही, तर मी ज्या समाजात राहतो त्याचा व देशाचाही विचार करायचा आहे.’, हे भान मुलांमध्ये कसे निर्माण करता येईल? अशी विविध आव्हाने पेलण्याची क्षमता पालकांनी स्वत:मध्ये विकसित करायला हवी. उत्तम पालक होणे, ही साधना आहे; उत्तम शिक्षक होणे, हे व्रत आहे; हे पालक आणि शिक्षक यांनी समजून घ्यायला हवे.

शिकताना आणि खेळताना पालकांनी मुलांबरोबर असायला हवे. मुलांचे शिकणे; हा शिक्षक आणि पालक यांच्या अभ्यासाचा विषय व्हायला हवा. थोडक्यात काय, पालकांनी शिक्षक व्हायला हवे आणि शिक्षकांनी पालक. गुरुकुल आणि घरकुल जेव्हा आपल्या भूमिका परस्परपूरक पद्धतीने निभावतील, तेव्हा मुलांच्या ‘मूल’पणाचा खर्‍या अर्थाने गौरव होईल.

शाळेत मुलांचे औपचारिक शिक्षण होत असते, त्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्तीही केलेली असते. शाळेतील शिक्षकांचा शिक्षक हा केवळ पेशा न राहता शिक्षकी वृत्ती असायला हवी. नोकरी यापेक्षा या पेशाकडे काही ‘अधिक’ म्हणून पहिले; तर आतूनच काही उमलून येईल, हे नक्की. शिक्षणविश्‍वात पडलेल्या प्रश्‍नांचा त्यांनी वेध घ्यायला हवा. हे सारे करत असताना शिक्षकांच्या मनात मुलांबद्दल अपार वात्सल्य असायला हवे. वर्गातल्या विद्यार्थ्यांविषयी शिक्षकांना सात्त्विक प्रेम वाटले, तर मुले व शिक्षक असा परस्पर संवादाचा मार्ग खुला होईल. शिक्षकांच्या कल्पनेतून अभिनव उपक्रम स्फुरतील व मुलांच्या प्रतिभेला आपोआपच पंख लाभतील.

शिक्षणशास्त्राच्या अभ्यासक लेडी प्लाउडन यांच्या मते, शाळेत काय चालले आहे हे पालकांना माहिती तर असलेच पाहिजे, पण ते त्यांना समजलेही पाहिजे. खरे तर, आजच्या पालकांनी याच्याही पुढे जाण्याची आवश्यकता आहे. वर्गातील वाढलेली विद्यार्थी संख्या लक्षात घेता, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणे, शिक्षकांना फारसे शक्य होत नाही. एखादा विद्यार्थी चुणचुणीत, दंगा करणारा किंवा मंद असला; तरच तो शिक्षकांच्या लक्षात राहू शकतो. केवळ औपचारिकता म्हणून पालक-शिक्षक संघाचे सदस्य होण्याऐवजी शाळेतील क्षेत्रभेटी, प्रकल्प, क्रीडाशिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम, छंदवर्गाचे आयोजन व अभ्यासात कमकुवत मुलांना मदत; अशा अनेक शालेय व सहशालेय उपक्रमांमध्ये पालक हे शिक्षकांचे ‘सक्रिय सहयोगी’ बनू शकतात. जे पालकांना माहीत आहे, समजले आहे; ती कौशल्ये ते इतरांना शिकवू शकतात व पुरेसा वेळही देऊ शकतात. त्यांनी शिक्षकांच्या बरोबर अध्यापनात सहभाग घ्यायला काय हरकत आहे? मुख्याध्यापकांच्या समवेत चर्चा करून, असे नियोजन करता येऊ शकेल. प्रयोगशील शाळांनी हा प्रयोग जरूर करून पाहावा.

विविध विषयांच्या अध्यापनात पालक, शिक्षक यांची संयुक्त टीम तयार झाली; तर शाळा व पालक यांच्यामधील संबंध सुधारतील. पालक, शिक्षक यांना परस्परांच्या क्षेत्रातील अडचणी समजतील. पालक शाळेत येतात, हे पाहून मुलांनाही पालकांना आपल्यात रस आहे, असे वाटेल. घर हे पालकांच्या मुलांवरील स्वामित्वाचे क्षेत्र व शाळा हे शिक्षकांच्या, हे चित्र बदलता आले; तर मुलांच्या विकासातील सांदिफटी भरल्या जातीलच, शिवाय मोठ्या गॅप्सही भरून काढता येतील.

शिक्षणतज्ज्ञ लिलाताई पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे, शिक्षण प्रक्रियेत पालकांनी ‘अॅकि्टव्ह पार्टनर’ व्हावे आणि शाळांनी पालकांना शिक्षणात ‘इक्वल पार्टनर’ करून घ्यावे. पालक-शिक्षक संघाच्या सभेत तक्रारी, आरोप, प्रत्यारोप होण्याऐवजी; पालक-शिक्षक संघाच्या सभांना पालक-शिक्षक यांच्या मेळाव्याचे स्वरूप देता आले, तर मुलांच्या क्षमता विकसनासाठी उत्तम शैक्षणिक पर्यावरण आपण तयार करू शकू, हे नक्की!

 - मानसी वैशंपायन

मुख्याध्यापिका

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय.