मुलांनो, आपल्यावर एखादे संकट आले की आपण कधीकधी घाबरतो किंवा निराश होऊन प्रयत्नही सोडून देतो. परंतु साक्षात मृत्युच्या छायेत वावरत असतानाही, दुर्दम्य इच्छाशक्तीने जगासाठी झटणाऱ्या टेरी फॉक्सची ही कहाणी आहे.

कॅनडा या देशातील विनिपेग नावाच्या नगरात, २८ जुलै १९५८ या दिवशी टेरी फॉक्सचा जन्म झालं. लहानपणापासून त्याला निरनिराळ्या खेळांची आवड होती. विशेषतः क्रॉस कंट्री रेससारखे एकट्याने खेळायचे खेळ त्याला अधिक आवडत. एक महान खेळाडू बनण्याचे त्याचे स्वप्न दुर्दैवाने वयाच्या फक्त १८ व्या वर्षी भंग पावले. त्याला बोन कॅन्सरने गाठले आणि त्याचा उजवा पाय गुडघ्यापासून १६ सें.मी. वर कापून टाकावा लागून तो कायमचा अपंग झाला !

हा धक्का पचवत असताना हॉस्पिटलमध्ये त्याने अनेक प्रकारच्या कॅन्सरने यातनाग्रस्त झालेले रुग्ण बघितले आणि मनाशी निर्धार केला. टेरीने कापलेल्या एका पायाच्या जागी कृत्रिम पाय बसवून, आपल्या देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ८५०० किलोमीटर पळत दौड मारून, नागरिकांकडून दरडोई एक डॉलर याप्रमाणे संपूर्ण लोकसंख्येइतका निधी गोळा करून, त्याचा विनियोग देशातील कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी करण्याचा निर्धार केला !

१२ एप्रिल १९८० या दिवशी त्याने कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यापासून सुरुवात केली. या महादौडीला त्याने ‘मॅरेथोन ऑफ होप’ असे नाव दिले. या दौडीबद्दल टेरी म्हणे – ‘मला इतकेच सांगायचे आहे की प्रयत्न केले तर जगात अशक्य असे काही नाही. प्रयत्नांनीच स्वप्ने एक दिवस साकार होतात.’

पळत असताना आपल्या कार्याची लोकांना माहिती देणे आणि निशी गोळा करणे प्रथम खूपच जड गेले. करण, एक पाय कृत्रिम असलेला माणूस असे धाडस करतोय यावर लोकांचा विश्वास बसत नसे. काही मंडळींनी त्याला परावृत्त करण्याचाही प्रयत्न केला. पण टेरी थांबला नाही. लहानपणचा तासंतास एकाच गोष्टीस चिकटून राहण्याचा गुण त्याला यावेळी उपयोगी पडला. तो पळतच राहिला. त्याचा निर्धार बघून मग कॅनडाच्या जनतेने त्याला न भूतो न भविष्याती असी साथ दिली. रोज तो साधारणपणे ४२ किलोमीटरची मजल मारे. त्यावेळी काही नागरिक त्याच्यासोबत पळत तर काही निधी संकलनात त्याला मदत करत. दोनही पाय धड असलेलेसुद्धा त्याच्या झपाट्यापुढे मागे पडत.

१४३ दिवसात ५,३७३ कि.मी.ची मजल मारल्यावर टेरीला अस्वस्थ वाटल्याने हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले. तपासणीत कॅन्सरने आता त्याच्या फुफ्फुसांवर हल्ला चढवल्याचे आढळून आले. टेरीला नाईलाजास्तव थांबावे लागले. पण एव्हाना त्याचा उपक्रम माहिती झाल्याने, कॅनडाच्या नागरिकांनी त्याचा वसा आपल्या खांद्यावर घेतला. १ फेब्रुवारी १९८१ रोजी कॅनडाच्या नागरिकांनी दरडोई एक डॉलर याप्रमाणे, २४.१७ दशलक्ष डॉलर्सच्या रकमेचा डोंगर उभा केला अन् टेरीचे स्वप्न पुरे केले. टेरी ‘मॅरेथोन ऑफ होप’ जिंकला. पण २८ जून १९८१ रोजी कॅन्सरने त्याच्यावर शेवटचा हल्ला करून वयाच्या फक्त बाविसाव्या वर्षी टेरीची दौड कायमची थांबवली.

पण त्यातून स्फूर्ती घेऊन संपूर्ण जगात अनेक दौडी आणि उपक्रम सुरु झाले. त्याच्या मृत्युनंतर काही दिवसातच १३ सप्टेंबर १९८१ ला कॅनडात टेरी फॉक्सला जणू काही श्रद्धांजली वाहण्यासाठी एकाच दिवशी ८८० ठिकाणी दौडी आयोजित केल्या गेल्या. यात कॅन्सरपीडीतांसाठी आणखी ३.५ दशलक्ष डॉलर्सचा निधी गोळा झाला. कॅनडातील प्रतिवार्षिक मॅरेथॉन रेसचे ‘टेरी फॉक्स मॅरेथॉन रेस’ म्हणून नामांकन झाले. त्याच्या नावाची पोस्टाची तिकिटे निघाली, ट्रस्ट स्थापन झाला, शाळा निघाल्या, स्पर्धा सुरु झाल्या.

बोन कॅन्सरमुळे एक पाय कापला गेल्याने टेरी निराश झालाही असता. पण त्याच्यातल्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे त्याने पुन्हा उभारी घेतली. त्याच्या उभारीला जगानेही साथ देऊन त्याचे स्वप्न पुरे केले आणि त्याचे नाव दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या माणसांच्या यादीत सुवर्णाक्षरांनी लिहिले !

तात्पर्य –

  • दुर्दम्य इच्छाशक्तीचा माणूस, कितीही मोठे संकट आले तरी हार मानत नाही.
  • प्रयत्न करणाऱ्याला जगात अशक्य असे काहीही नसते.
  • आपले ध्येय उदात्त आणि प्रयत्न सच्चे असले तर संपूर्ण जग आपल्या पाठीशी उभे राहते.     

- अविनाश हळबे