जाणता राजा

दिंनाक: 15 Jun 2019 14:59:39


अखंड स्थितीचा निर्धारू जाणता राजा, असे समर्थांनी ज्यांचे वर्णन केले ते छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी सतत तीस वर्षं अविश्रांत श्रमाने एक करोड होनांचे स्वतःचे राज्य निर्माण केले. ही एक जहागिरी नसून स्वतंत्र सार्वभौम राज्य आहे. हे हिंदुस्थानातील सर्व राज्यकर्त्याला कळावे आणि त्या राजाला हिंदू धर्माच्यावतीने इतरांना जाब विचारायचा व जरब बसवण्याचा अधिकार आहे हे समजण्यासाठी शिवरायांनी राज्याभिषेकाचा विधी यथासांग पार पाडावयाचे ठरवले.

राज्याभिषेकाचा मुहूर्त ५ जून रोजी उत्तररात्रीचा होता. रायगडावर राज्याभिषेकाची तयारी धुमधडाक्याने सुरू झाली. काशीचे महाविद्वान पंडित गागाभट्ट यांनी या सोहळ्याचे संपूर्ण कार्य यथासांग पार पाडले होते. सप्तमहानद्यांचे, सप्तसमुद्रांचे पवित्र जल, सुलक्षणी हत्ती, घोडा, व्याघ्र-मृग-चर्म, छत्र-चामरे, सुवर्ण कलश, सुवर्ण सिंहासन अशा उच्च दर्जाच्या साहित्यानिधी, गागाभट्टांच्या शुभहस्ते रायगडावर राज्याभिषेक सोहळा पार पाडला. पहाटेच्या वेळी नवीन वस्त्रे परिधान करून शिवराय राजसभेत सिंहासनावर विराजमान झाले. गागाभट्टांनी सोन्याचे छत्र त्यांच्या मस्तकी धरले व जयघोष केला. शिवाजी महाराज की जय! आणि शिवाजी महाराजांना राजा म्हणून इतरांची मान्यता मिळाली.

हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्‍या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस जिजाऊसाहेब पांढरीशुभ्र वस्त्रे परिधान करून सदरेवर बसल्या होत्या. जे स्वप्न आपण पाहिले तो क्षण साकार होताना गागाभट्टांनी वेदमंत्र म्हणायला सुरुवात केली, तेव्हा जिजाऊसाहेबांनी हात जोडले आणि मनातल्या मनात आई तुळजाभवानीला साकडे घातले. शिवबाचे राज्य निष्कलंक होवो. गागाभट्टांनी जेव्हा सिंहाचा मुखवटा असलेला राजदंड राजांच्या हाती दिला, तेव्हा राजांनी जिजाऊसाहेबांकडे पाहिले. जिजाऊसाहेबांनी आपला उजवा हात किंचित वर करून राजांना आशीर्वाद दिला. त्यानंतर तो राजदंड मस्तकी लावून हात जोडले. रत्नजडीत सिंहासनाकडे पाहिले. राजांचे डोळे भरून आले. या सिंहासनावर आपण आता राजा म्हणून बसणार, परंतु या क्षणासाठी आत्तापर्यंत किती शूरवीरांनी आपले जीव अर्पण केले. त्यांची आठवण राजांना झाली. त्यांचे मन सर्व आठवणींनी भरून आले. राजे सिंहासनापुढे नतमस्तक झाले आणि सिंहासनाला चरणस्पर्श न करता ते सिंहासनारूढ झाले. तेव्हा संपूर्ण राजदरबार आनंदाने महाराजांचा जयजयकार करू लागले. अचानक जिजाऊसाहेब सदरेवर उभ्या राहिल्या आणि या वृद्ध आईने राजांना वाकून कुर्निसात केला. तेव्हा महाराजही चपापले. आपली आई वाकून आपल्याला का सलामी देत आहे याचा उलगडा राजांना होईना. राजे गप्प झाले. जिजाऊसाहेबांनी नंतर आपल्या आनंदाश्रूंना मोकळेपणाने वाट करून दिली. दरबार संपला आणि राजे तडक जिजाऊसाहेबांच्या महालाशी आले. महाराज येत आहेत हे कळल्यावर जिजाऊसाहेब उठून बसल्या. वास्तविक वृद्धपणामुळे चटकन त्यांना उठता येत नव्हते. परंतु आपला लाडका लेक आता राजा म्हणून येतो आहे याची जाणीव त्यांना झाली. राजे आले आणि त्यांनी जिजाऊसाहेबांच्या पायावर लोळण घेतली. जिजाऊसाहेबांनी राजांना अलगद उठवले. राजे म्हणाले, “माँसाहेब, आम्ही आपल्या पदराखाली मोठे झालो. आपले आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. आज आम्ही खूप दानधर्म केला. परंतु माँसाहेब, पृथ्वीचे दान केले, तरी आपले मातृऋण फिटणार नाही.” राजांची ही नम्रता पाहून आईचा जीव भरून आला. जिजाऊसाहेबांनी राजांना जवळ ओढले आणि प्रेमाच्या मिठीत सामावून घेतले.

मुलांनो, वरील प्रसंगावरून आपणास लक्षात येते, ती शिवरायांची मातृभक्ती, मित्रप्रेम व जिजाऊंचे पुत्रप्रेम व राजाबद्दल असलेली स्वामीनिष्ठा एक ध्येयनिष्ठा राजा घडवण्याचे काम जिजाऊंनी केले. आजही शिवराय आपले आदर्श आहेत, म्हणून शिवरायांचे आठवावे रूप...

- मंदा बोराणे

मुख्याध्यापिका, जानकीबाई झंवर प्राथमिक शाळा, सातारा.