उभी मैत्री

दिंनाक: 13 Jun 2019 15:29:55


 

कालपासून बाजूच्या घरात ठाकठोक, ठकाठक असे आवाज येत होते. त्याने एक दोनदा बाजूच्या घरात डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला. पण नीटसं काही समजलं नाही. चाललं असेल नेहमीचं रिपेअरींग... कळेल नंतर. असं समजून त्यानं लक्ष दिलं नाही.

आणि आज सकाळी पाहतो तर काय? त्याचा जुना शेजारी जाऊन तिथे एक नवीन टकाटक शेजारी आलेला.

या नवीन शेजार्‍याचं दिसणं, त्याचे पॉश कपडे, त्याचा लूक.. सगळंच डिफरंट! एकदम हटके!! जुना शेजारी मात्र साध्याच कपड्यात.

हा नवीन शेजारी पाहून जुन्याला आपले जुन्या मैत्रीचे उभे दिवस आठवले. दिवसभर उभ्यानेच गप्पा मारायच्या. एकमेकांच्या घरातली उणीदुणी काढत कधी भांडायचं... पण थोड्याच वेळात पुन्हा मैत्री. वारा जोरात सुटला की, दिवसातून तीन-चार वेळा तरी ते भिंतीवर आपटायचे. सांधे दुखायचे... झिणझिणायचे! रात्रभर आवाज न करता गप्प उभं राहायचं. सकाळपासून पुन्हा आतबाहेर सुरू.

पावसाळा जवळ आला की सांधे कुरकुरायचे. घासून घासून लाल व्हायचे. आशा वेळी शेजारच्या घरातले आजोबा, मोठ्या प्रेमाने त्यांच्या सांध्यात तेल घालायचे.

बिजागरीत तेलाचे थेंब सोडताना आजोबा म्हणायचे, ‘कुणीही प्रेमाने घरात यावं म्हणून तर आपण दार उघडतो. आशा वेळी दरवाजा करकर करू लागला तर बरं नाही वाटत. दरवाजा कसा... कुरकुर न करता भर्रकन उघडला पाहिजे.

आता शेजार बदलला.

शेजार्‍यांचा दरवाजा पण बदलला.

आता या पावसाळ्यात आपल्याला सांधेदुखीशी सामना करावा लागणार. करकरत कुरकुरत दिवस रेटावे लागणार.

इतक्यात जोरात वारा सुटला.

जुना बंदच होता. त्याला वाटलं आता हा नवीन दरवाजा धाडकन आपटेल व आपल्या बाजूला येईल. त्याच्याशी जरा बोलता तर येईल.

पण इतका जोरात वारा असूनही तो नवीन दरवाजा जागचा हलला सुद्धा नाही. एकाच जागी तो ढिम्म उभा होता.

जुन्याला कळेना असं कसं काय बुवा?

जुन्याने नीट निरखून पहिलं... नव्याच्या पायाजवळ छोटसं गळू आलं होतं.

जुन्याकडे पाहात नवा खरबरीत आवाजात म्हणाला, ‘‘याला स्टॉपर म्हणतात.’’

जुना दरवाजा फक्त हसला.

नवीन दरवाज्यावर कुठल्यातरी वेगळ्याच डिझाइनचं चित्र होतं. पॉलीश केलेल्या चकचकीत दुरंगी कड्या आणि तो ‘स्टॅापर!’ जुना दरवाजा हे सारं हरखून पाहात होता.

जुन्याने भीतभीत विचारलं, ‘‘तुला माझ्याशी मैत्री करायला आवडेल का रे?’’

नवीन दरवाज्याने कडी हलवून, ‘‘हो होऽऽ’’ म्हंटलं.

हळूच त्याचा स्टॉपर वर झाला आणि नवीन दरवाजा जुन्याच्या जवळ आला.

‘‘अरे, हे दोघे आता कॉलेजात जातात. पण लहानपणी लपाछपी खेळताना माझ्याच मागे लपायचे. शाळेतून आल्यावर माझ्याच कडीला वॉटरबॅग लटकवायचे.’’ जुना दरवाजा सांगत होता.

नवीन दरवाजा काही बोलेचना.

‘‘एकदा तर गंमतच झाली. शाळेची वेळ झाली तरी आमच्या घरात राहणार्‍या मोहनला त्याच्या चपला काही केल्या मिळेनात. सगळं घर शोधलं. पण छे! शाळेला उशीर होत होता. पण चपला न घालता शाळेत कसं जाणार? आई मोहनला ओरडू लागली. मोहनची पळापळ सुरू झाली. आईचा पारा चढला. आता मोहनला धपाटा बसणार इतक्यात...’’

त्याला थांबवत नवीन दरवाजा आपल्या खरबरीत आवाजात म्हणाला, ‘‘इतक्यात बाजूचा दरवाजा आपोआप बंद झाला.. आणि त्याच्यापाठी असलेल्या चपला मोहनला दिसल्या. काल त्याने चुकून बाजूच्याच घरी चपल्या काढल्या होत्या.’’

‘‘त्या दरवाज्याला थोपटत, मोहन सुसाट पळाला. हो ना?’’

‘‘हे ऐकताच जुन्या दरवाज्याची कडी लोंबू लागली.’’

जुना दरवाज्याने भीत भीत विचारलं, ‘‘पण हे तुला कसं माहीत?’’

‘‘अरे, मी तोच आहे! इतक्या वर्षांची आपली उभी मैत्री तू विसरलास..? त्या माणसांनी हे कुठलेसे झॅकपॅक कपडे चिकटवले मला.. म्हणून तू मला ओळखलं नाहीस..!’’

त्याच्याकडे अविश्वासाने पाहात जुन्याने विचारलं, ‘‘तुझा हा आवाज असा खरबरीत का झालाय?’’

हसत हसत, कडी वाजवत तो म्हणाला, ‘‘अरे, त्यांनी माझं अंग खसाखसा तासलं. त्यावर कुठलातरी चिकट चिवट गोंद फासला आणि त्यावर हे काहीतरी चिकटवलं. अरे, तो घाणेरडा चिकट गोंद घशात गेल्यावर आवाज शिल्लक राहिला हे काय कमी आहे? आता आयुष्यभर अशाच भसाड्या खरबरीत आवाजात बोलायचं का मी?’’

‘‘काहीतरीच काय? चार दिवसात तू ओके होशील. अरे जसजसा हा गोंद सुकतो तसतसा आपला आवाज पण सुटतो. खरंच..’’ कडी हलवत जुना म्हणाला.

‘‘कशावरून? तुला काय माहीत? उगाच टेपा लावू नकोस.’’

आरामात झुलत जुना दरवाजा म्हणाला, ‘‘अरे तुझ्या तोंडाला लावलाय नवीन सनमायका, म्हणून तुझा जरा घसा बसलाय.’’

‘‘तुला माहीत आहे का.. माझी पाठ तासून, त्यावर गोंद फासून त्यांनी लावलाय नवा कोरा सनमायका. माझा घसा बसला नाही, पण चार दिवस माझ्या पाठीत उसण भरली होती! पण चार दिवसात ओके! आता तर विषय निघाला म्हणून आठवलं.’’

नवीन दरवाजा म्हणाला, ‘‘वॉव!’’ म्हणजे तुला घर उभ्या, माझा सनमायका पाहायला मिळतोय. पण तुझा सनमायका पाहण्यासाठी मात्र मला तुझ्या घरीच यावं लागेल...’’

‘‘कधी येऊ?’’

 हे ऐकताच..

दोन्ही दरवाजे जोरजोरात कड्या वाजवत हसू लागले...

खटखट खटाखट हसू लागले...

दोन्ही घरातली माणसं धावतच आली. त्यांनी पटकन दरवाजे उघडले.

बाहेर डोकावून पाहिलं. बाहेर कुणीच नाही पाहिल्यावर

त्यांनी एकमेकांकडे पाहिलं.

पण दारांच्या कड्या आपोआप कशा वाजल्या.

हे काही त्यांना कळलंच नाही.

- राजीव तांबे