ज्याप्रमाणे मराठ्यांनी आपल्या तलवारीच्या बळावर महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार रोवला, त्याप्रमाणेच मराठी साहित्याची पताका ज्यांनी जगभर फडकावली मराठी साहित्याला नवी दिशा दिली, अशा महाराष्ट्रातील महान साहित्यीकांपैकी राम गणेश गडकरी, ग.दी.माडगूळकर आणि पु.ल.देशपांडे  हे तीन भाषाप्रभू होत. यांच्या आठवणीचा संगम होणारं हे वर्ष 2018-19 यावर्षी नाटककार राम गणेश गडकरी (म्हणजेच कवी गोविंदाग्रज आणि विनोदी लेखक बाळाकराम यांची स्मृतीशताब्दी तर महाकवी ग.दि. माडगूळकर आणि सिद्धहस्त लेखक पु.ल. देशपांडे यांची जन्मशताब्दी साजरी करताना त्यांच्या साहित्याची भुरळ आपल्यासारखी साहित्य रसिकांना पडणार नाही असे होणार नाही. 
 यातील आपले सर्वांचे आवडते विनोदी लेखक नाटककार, अष्टपैलू व्यक्तीमत्व पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्याच्याच साहित्याचे व विचारांचे पैलू आपल्याही मनपटलावर रुंजी घालतात. पु.ल. देशपांडे म्हटले की महाराष्ट्रातील तमाम साहित्य रसिकांचे मन अभिमानाने फुलून येते. या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे गारुड आजही मराठी माणसाच्या मनावर कायम आहे. त्यांच्या कथा, कादंबर्‍या नाटक यांची आठवण आल्यावाचून राहत नाही. मराठी साहित्यामध्ये विनोदाला एक वेगळे स्थान देण्यात पुलं यांचा मोठा वाट आहे. कोणत्याही विषयावर नेमका विनोद करण्यात पुलं यांचा हात कोणीच धरू शकत नव्हते आणि आजही धरू शकणार नाही. तरुण वर्गात पुलं यांचे किस्से एकले जातात असेच काही किस्से खास त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने........
  पुलंच्या ओळखीच्या एका मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पुलं म्हणाले, ‘बाकी काही म्हणा पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो.’ 
  एकदा पुलं प्रवासात असताना त्यांना कोणीतरी भेटला, तो त्यांचा चाहता होता. तो म्हणाला की, ‘माझी फक्त दोन व्यक्तींवर श्रद्धा आहे, एक ज्ञानेश्वर आणि दुसरे तुम्ही. माझ्या खोलीत मी ज्ञानेश्वरांच्या फोटोसमोर तुमचाही फोटो ठेवला आहे.’ तर पुलं म्हणाले, ‘अहो, असं काही करू नका नाहीतर लोक विचारातील, ज्ञानेश्वरांनी ज्यांच्याकडून वेद म्हणवून घेतले तो रेडा हाच का?’
 एकदा वसंतराव देशपांडे पुलंना म्हणाले, ‘ही मुलगी (सुनीताबाई) म्हणजे एक रत्न आहे. त्यावर पुलं लगेच म्हणाले, ‘म्हणूनच मी गळ्यात बांधून घेतलंय.’
  एकदा पुलंचे पाय सुजले होते. तेव्हा आपल्या सुजलेल्या पायांकडे बघत ते म्हणाले, ‘आता मला कळले, पायांना पाव का म्हणतात ते!’
 अशा किस्स्यांमुळे आपल्यासारख्या श्रोतृवर्गात शब्दांचे धुमारे उठवण्याचे कार्य पु.ल. देशपांडे यांनी केले. पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन ! 
 

- प्रा. श्री. विजय मराठे