बचत पाण्याची

दिंनाक: 11 Jun 2019 15:13:11


 

मुलांनो, आपल्याला पाण्याची बचत करावी लागणार आहे म्हणे, पण ती कशी करणार? आहे कल्पना? म्हणजे आपण पैशांची बचत करतो तशीच करायची बरोबर बघा हं... आपल्याला पावसाळ्यात पावसापासून किती पाणी मिळते? शास्त्रज्ञांनी सांगितल आहे की पासाळ्यात प्रत्यक्ष ४० दिवसच पाणी आपल्याला मिळते. आता हे पाणी आपल्याला मिळते. आता हे पाणी आपल्याला वर्षभर पुरवावे लागणार आहे. तो पाऊस तरी सर्व ठिकाणी सारखा पडतच नाही. काही ठिकाणी अल्प, काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकणी अतिवृष्टीही होते. आणि लोकसंख्या तर खूपच आहे. तुम्ही वर्तमानपत्रात व टी.व्ही.वर पाहिलही असेल लोकांना टँकरने पाणी पुरवतात. त्या तेथे ही रांगांनी पाणी मिळवण्यासाठी भांडण! गावाकडचे चित्र पाहिलेत तर बायका डोक्यावर हंडे घेऊन १/२ कि.मि. लांब चालत जातात आणि स्वयंपकासाठी आणि पिण्यासाठी पाणी घेऊन येतात. आता हे पाणी साठवायला हवे; जमिनीत मुरवायला हवे. नुसते सर्व वाहात जाऊन समुद्राला मिळता कामा नये. नाही का?

आता मी तुम्हाला एक प्रयोग सांगते हं- एका बाटलीत १०० मि.ली. पाणी घ्यायचे. समजा त्यापैकी ९७.६ हे खारट पाणी आहे. ते काढून टाकलं तर २.४ हे गोड पाणी राहिलं. ह्या गोड्या पाण्यापैकी ५०% पेक्षा जास्त पाणी जमिनीत खोलवर आहे ते आपल्याला काढता येत नाही. दुसरं उत्तर दक्षिणध्रुवावर हे पाणी बर्फ व वाफ स्वरूपात आहे. तेही आपल्याला मिळत नाही. म्हणजे ते नाला केले तर फक्त जवळजवळ १.१% पाणीच आपल्याला पिण्यायोग्य राहते. हे पाणीही नदी, नाले, तलाव यातून आपल्याला मिळते. हे शिल्लक पाणीतरी आपल्याला वाचवायला हवे ना? मग जशी कमी गरजा करून आपण पैशांची काटकसर करतो अगदी तसेच आवश्यक तेवढेच, तेव्हाच  थोडे थोडे पाणी वापरून आपण पाण्याची बचत करायला हवी, होय ना? अगदी नीट योजना करूनच.

माणसांप्रमाणे वनस्पती, वृक्षवेली, प्राणी, कीटक या सर्वांची जगण्यासाठी मूलभूत गरज पाणीच आहे. मग हे पाणी जगले तरच ही जीवसृष्टी जगेल ना! माणूसच फक्त पाणी बचत करू शकतो. म्हणून हे पिण्यायोग्य गोड पाणी वाचवायला हवे. त्या पाण्याचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. म्हणून आपण पाणी वाचवले म्हणजे ते संवर्धनच करणे आहे. मग करणार ना सुरुवात? उद्योगानाही पाण्याचाच आधार आहे. भात, ऊस यांना खूप पाणी लागते पण तेही बेताने, व्यवस्थित नियोजनपूर्वक वापरायला हवे. उदा., इस्त्राईल सारखे.

आता तुम्ही कशी पाणी बचत करू शकाल? तर १) घरातील सर्वांनीच जरूर लागेल, तेव्हाही कमीत कमी पाणी वापरायचे. २) सकाळी दात घासताना नळ चालू ठेवायचा नाही. ३) बादलीभर पाण्यातच अंघोळ उरकायची. ४) गळक्या नळाखाली बादली ठेवून जमलेले पाणी झाडांना वापरायचे. ५) झाडांना डाळ, तांदूळ धुतलेले पाणी घातल्याने पिण्याचे पाणी वाचेल. ६) काम करणार्‍या बाईंना कपडे, भांडी धुतांना बारीक नळ सोडण्यास सांगावे. ७) घरी आलेल्या पाहुण्यांना पाण्याचे तांब्याभांडे द्यावे ते हवे तेवढे पाणी घेतील. ८) तुमची सायकल, मोटार थोड्या पाण्याने पुसून काढाव्यात.

अशा काही गोष्टी कदाचित तुमच्या घरी करतही असतील. लहानपणापासून अशी पाणी बचत करण्याची सवय लागली की पुढच्या आयुष्यात तुम्हाला पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार नाही.

एक गंमत सांगते, इस्त्राईल, सिंगापूर येथे सांडपाण्यावर ४/५ वेळा प्रक्रीया करून ते पाणी पिण्यायोग्य केले जाते. कारखान्यांसाठीही वापरले जाते. हे थोडे खर्चिकच आहे. हे ऐकून नवल वाटले ना! पण हे असे पुढे प्रत्यक्ष कृतीने आपल्याही करावे लागणार आहे हं! तेव्हा आपण पुढील पाण्याचे संकट लक्षात घेऊन आताच पाण्याची बचत केली पाहिजे ना!

- मीनल पटवर्धन