डबल धमॉल

दिंनाक: 10 Jun 2019 15:06:48


 

‘हिरो..!’, जय आनंदाने ओरडला. ‘ए, राहू दे रे तुझा हिरो! आपण इथे खेळायला आलो आहोत ना?’, नरेन जोरात म्हणाला. पण ओळखीची खूण म्हणून हिरोने जयला शेपटी हलवून दाखवली होती. तो एक तेज डोक्याचा, करड्या रंगाचा कुत्रा होता. आज पतेतीची सुट्टी होती. जय, नरेन आणि विशाल कँपमध्ये असलेल्या ‘द मॉल’ नावाच्या एका मॉलमध्ये आले होते. मॉलमध्ये एक विभाग खास मुलांसाठी होता, वेगवेगळ्या धमाल खेळांचा. ते तिघेही खास खेळण्यासाठी म्हणून, घरच्यांची परवानगी घेऊन आले होते.

मॉलच्या आवारात वेगवेगळे लोक असले, तरी त्यामध्ये एक जोडपं मात्र उठून दिसत होतं. एक वयस्कर पारशी जोडपं, केरमन आणि शिरीन. नवीन वर्ष म्हणून खरेदी करायला, साजरं करायला आलेलं. केरमनबाबांनी डोक्यावर मरून रंगाची खास टोपी चढवलेली होती, तर शिरीनबाईंनी तुकतुकीत गोर्‍यापान कपाळावर विशिष्ट पद्धतीने रुमाल बांधलेला होता. त्यांच्या हातामध्ये साखळी होती अन् साखळीला एक जर्मन शेफर्ड कुत्र्याचं पिल्लू. पिल्लू असलं, तरी ते मोठं आणि दणकट होतं. केरमनबाबांचा त्याच्यावर (डिकरोवर) खूप जीव होता. लाडाने ते त्याला ‘डिकरा’ म्हणत असत.

जय एक चळवळ्या, पण गोड मुलगा होता. त्याला प्राण्यांचं भलतंच आकर्षण होतं; त्यामुळे तो त्याच्या एका चुलत भावाकडे नेहमी जायचा. अर्जुन त्याचं नाव. तो ‘डॉग ट्रेनर’ होता.

जयने हिरोला त्याच्याकडे अगोदर पाहिलं होतं. हिरो हा रागीट होता, पण तितकाच शार्पदेखील. अर्जुनने सांगितलं होतं, हे जर्मन शेफर्ड खूप हुशार आणि अ‍ॅक्टिव्ह असतात, पण ते तितकेच आक्रमक असतात. यांना नीट ट्रेन करावं लागतं, तसं केलं; तर ते अगदी आज्ञाधारक होतात, पण याला सरळ करायला जास्त दिवस लागतील.

जयला हिरो खूप आवडला होता. अर्जुनमुळे त्याची हिरोशी दोस्तीदेखील झाली होती. त्याला वाटायचं, आपल्याकडे अगदी अस्साच कुत्रा पाहिजे, पण आई-बाबा...?

त्याच वेळी ‘हिरो..!’ म्हणून शिरीनबाई जोरात किंचाळल्या. त्याचं झालं होतं असं, कुठून तरी एक काळ्या रंगाचं मांजर तिथे उगवलं होतं. हिरोनं ते पाहिलं मात्र; तो गुरगुरला. बहुतेक तो त्याच्या भाषेत ‘आता माझी सटकली’ म्हणत असावा. त्याने साखळीला हिसडा दिल्याबरोबर तो मोकळा झाला व त्या काळूच्या मागे पळाला.

हे सगळं एकाच वेळी घडत होतं. दारामध्ये असलेल्या दोन आडदांड सिक्युरिटी गार्ड्सकडे पाहत नरेन व विशाल आत शिरत होते. जय मागे वळून हिरोकडे पाहत होता.

या इतक्या सगळ्या माणसांच्या मधून काळं मांजर व हिरोदेखील आत शिरले, चक्क मॉलमध्ये. विशाल घाबरून किंचाळला. काळूची आणि हिरोची शर्यत सुरू झाली; पण त्या शर्यतीत मागे जयदेखील होता, हिरोला धरायला.

जय ओरडत होता, ‘ए हिरो, हिरो..!’; पण हिरो थोडंच त्याचं ऐकायला. अजून ट्रेनिंग संपलं नव्हतं ना...!

आत शिरल्यावर समोर एक घड्याळांचं व त्या शेजारी एक कॉस्मेटिक्सचं काऊंटर होतं. घड्याळाचे ठोके वाजत नसले, तरी काळूच्या काळजाचा मात्र ठोका केव्हाच चुकला होता.

कॉस्मेटिक्स्च्या काऊंटरसमोर दोन-तीन कन्यका चिवचिवत उभ्या होत्या. तिथली सेल्सगर्ल त्यांना लालभडक रंगाची लिपस्टिक उघडून दाखवत तिचं गुणगान करत होती. उंचावर जाण्यासाठी काळूने काऊंटरवर उडी मारली. ती सेल्सगर्ल दचकली आणि तिचा एक हात हवेतच जोरात फिरला. तिच्या शेजारी बसलेल्या मुलीच्या पांढर्‍या टी-शर्टवर लाल रंगाची ‘बरोबर’ची खूण उमटली-टिक! त्या टी-शर्टवर ‘यही है राइट चॉइस बेबी’, असं लिहिलेलं होतं, अगदी त्या खालीच. पण काळूचा चॉइस काही राइट नव्हता. हिरो त्याच्या मागेच होता. काळूला आता तरी निसटायला काही चान्स नव्हता. तो घाईने पुढे पळाला.

जय आपला ‘हिरो, हिरो’ करत पळत होता. कुत्र्याला मॉलमध्ये आणणार्‍या मुलाकडे पाहून लोक रागाने, आश्‍चर्याने पाहत होते.

पलीकडे मुलांचा खेळाचा विभाग होता. तिथे एक गुंडोबा मुलगा, मिनी बॉस्केटबॉल खेळत होता. त्याच्या समोर असलेल्या टेबलवर काळूने उडी मारली व पाय ठेवून ते पलीकडे उतरलंसुद्धा. त्याच्यामागे असलेल्या हिरोनेही उडी मारली व तो क्षणभर थांबला. हे सगळं क्षणार्धात घडत होतं. गुंडोबाने टेबलवरचा नवीन बॉल उचलण्यासाठी खाली हात घातला, तर त्याच्या हातामध्ये हिरोचं डोकंच आलं.

‘मॉमी’, करून तो गुंडोबा एवढ्या जोरात किंचाळला, की हिरोने दचकून खालीच उडी टाकली. गुंडोबाची नजर आता ‘मी लास्ट’ अशी झाली होती.

काळू पलीकडे असलेल्या फर्निशिंग्ज्च्या विभागात शिरला. तिथल्या सेल्समनने बरेच पडदे आणि बेडशीट्स उघडले होते; पण त्याचं गिर्‍हाईक असलेल्या त्या जाडुल्या बाईला काही ते आवडले नसावेत, पसंत नसावेत. काळूला मात्र तो ढीग पसंत पडला. त्याने त्या ढिगात उडी मारली अन् तो पलीकडून बाहेर निघू लागला.

ते पाहून हिरो जोरात भुंकला. त्यामुळे त्या जाडुल्या बाई घाबरून किंचाळल्या. त्यांच्या हातातला एक पडदा उडाला व सेल्समनच्या तोंडावरच पडला. तोही दचकला व ढिगार्‍यात पडला. पडताना त्याचा पाय बाईंना लागला व त्याही ढिगार्‍यात पडल्या. दोघेही पडद्याच्या ढिगार्‍यात गायब झाले. हिरोसुद्धा ते पाहून आश्‍चर्यचकीत झाला असावा, पण तो त्या दोघांच्या चक्क अंगावर पाय देऊन पुढे पळता झाला.

बाई लगबगीने उठल्या व किंचाळत पळाल्या, तर भीतीमुळे सेल्समनची पाचावर धारण बसलेली होती. ‘पर्देमें रहने दो। पर्दा ना उठाओ॥’, अशी त्याची अवस्था झाली होती.

आता मात्र मॉलच्या खालच्या मजल्यावर एकच गोंधळ माजला होता. पुढे मांजर, मागे हिरो आणि त्यांच्यामागे जय. एकच शर्यत!

लोक ओरडत होते, ‘अरे, पकडो वो कुत्तों को।’ ज्यांना प्राणी आवडतच नाहीत, अशा लोकांना तर खूपच राग आला होता. त्यांनी मॅनेजरकडे तक्रार नोंदवायचे ठरवले होते. एव्हाना त्या शर्यतीत सिक्युरिटीदेखील सामील झाली होती. मांजर जीवाच्या आकांताने पळत होतं. त्याला निसटायला, लपायला, उंचावर जायला अजूनही जागा मिळत नव्हती. हिरो काही त्याचा पिच्छा सोडत नव्हता.

एव्हाना केरमनबाबा आणि शिरीनबाई दोघंही आत आले होते. विशाल आणि नरेनची नजर जयला शोधत होती. त्यांना पळापळ करण्यात काही रस नव्हता.

जयमुळे सगळा गोंधळ झालाय, खेळणं बाजूला राहिलंय; असं नरेनला वाटत होतं, तर विशालला खूप राग आला होता. त्याला मुळात प्राण्यांचा तिटकारा होेता. कुत्र्यांना तर तो भयंकर घाबरायचा. मग ते कुठलंही असो, छोटं किंवा मोठं.

शेवटी एकदाचा काळू मांजराला जिना सापडला. काळू वरच्या मजल्यावर पळाला.

वरती कॅफेटेरिया होता. तिथं टेबल-खुर्च्या नीट मांडून ठेवलेल्या होत्या. तिथल्या हवेत कॉफी आणि इतर खाद्यपदार्थांचा, भूक खवळून टाकणारा वास पसरलेला होता. सगळी टेबल्स रिकामी होती, एक सोडता. काळूने समोरच्या टेबलवर उडी मारली व तो एकेका उडीत एकेक टेबल मागे टाकू लागला. शेवटच्या टेबलवर एक मुलगा आणि एक मुलगी बसलेले होते, सँडविच आणि कॉफी घेऊन. काळूने जी उडी मारली, ती त्या मुलीच्या डिशमध्येच. टोमॅटो सॉसचा एक लपका उडाला, तो त्या मुलीच्या नाकावरच. तिचं नाक एखाद्या विदूषकासारखं लालबुंद झालं. ती किंचाळली. त्यामुळे तिच्या समोरचा मुलगा उठून उभा राहिला, पण त्याला काय माहीत मागचा प्रकार! त्याच्या पाठीवर हिरोची उडी पडली. तो खाली वाकला गेला आणि उरलेल्या सॉसमध्ये त्याचं तोंड बरबटून निघालं. मागे असलेल्या जयला हसू आलं, पण आत्ता हसायलाही वेळ नव्हता.

त्याच वेळी तिथं एक वेगळंच नाट्य घडत होतं. जयच्या मागे झिपर्‍या वाढलेला एक तरुण पळत होता, जिवाच्या आकांताने. कारण त्याच्यामागे एक खुरटी दाढी वाढवलेला, राकट भासणारा माणूस पळत होता. अन् एवढंच नाही, तर त्याच्या हातामध्ये एक पिस्तूल होतं.

एव्हाना काळू पूर्ण कॉरिडॉर पळून दुसर्‍या टोकाला पोहोचला होता. पलीकडे सरकता जिना होता, खाली जाणारा. काळू त्याच्यावर.

झिपर्‍या खूप फास्ट होता. तो मोठमोठ्या ढांगा टाकत त्या जिन्यावर पोहोचला. तो उभा नव्हता तर, त्यावरही पळण्याचा प्रयत्न करत होता. जिना पुष्कळ मोठा होता. काळू बावरला होता. त्याच्यामागे आलेला हिरो सरकत्या जिन्यामुळे अस्वस्थ होता. ते दोघेही त्या जिन्यावर पडले. हिरो भुंकला ऽऽऽ.

जय कठड्याच्या आधाराने त्या जिन्यावर उभा राहून सगळं पाहत, खाली सरकत होता. त्याच्या बाजूने खुरट्याही पुढे गेला. जिना संपत आला. झिपर्‍याने चपळपणे जमिनीवर उडी मारली व तो पळत सुटला. काळू त्याच्या मागे. खुरट्या व हिरो एकाच वेळी खाली पोहोचले. हिरोला याचा धोका जाणवला. अस्सल जातिवंत जर्मन शेफर्ड होता तो! त्याने खुरट्याकडे पाहून दात विचकले व तो दणक्या आवाजात भुंकला. एवढंच नाही, तर त्याने आक्रमक पवित्रा घेतला. खुरट्याचं डोकं फिरलं होतं. एक तर झिपर्‍या निसटला होता आणि वर हा हिरोचा पवित्रा. त्याने हातातलं पिस्तूल हिरोवर रोखलं. ते जयने पाहिलं, मात्र त्याला त्याच्या लाडक्या हिरोची काळजी वाटली. त्याला पुढची गोष्ट कळली. एका क्षणात त्याने विचारही न करता खुरट्याच्या पाठीवर उडी मारली. जिना संपला होता. खुरट्या सपशेल लोटांगण घालून पडला. त्याच्या शेजारी हिरो व आडवा झालेला जय होता. खुरट्याच्या हातातलं पिस्तूल उडालं व घसरत जाऊन विशालजवळ गेलं. ते त्याने उचललं. वर एका लाकडी फ्रेमला फुगे टांगलेले होतेे. निळे, लाल, फिकट जांभळे, अपारदर्शक गोलगोल फुगे. जणू फुग्यांचं झुंबरच म्हणा ना.

खुरट्या चपळाईने उठला, तो हिरो त्याच्यावर पुन्हा जोरात भुंकला. इतक्या जोरात की, लोड असलेल्या त्या पिस्तुलाचा खटका विशालच्या हातून अचानकपणे दाबलाच गेेला. तो कुत्र्यांना भयंकर घाबरायचा. त्यात एवढं जोरात भॉऽऽऽ! नशीब की त्याची गोळी वर हवेेत उडाली. नुसती उडाली नाही, तर वर टांगलेल्या त्या झुंबराच्या दोरीलाच बसली. दोरी तुटली व ती फ्रेम खुरट्याच्या अंगावर पडली, अलगद हार घातल्यासारखी. खुरट्या फुग्यांच्या हाराने सजला. पुन्हा खाली पडला. गोळीच्या आवाजाने सगळेच दचकले, घाबरले. हिरोसुद्धा चांगलाच दचकला. मग मात्र तो खुरट्याच्या अंगावर भुंकतच राहिला. खुरट्या इकडेतिकडे वळल्याने त्याच्या अंगाखाली फुगे फुटत राहिले. त्या आवाजाने घाबरलेले लोक पुन्हापुन्हा दचकत राहिले. हिरो भुंकतच राहिला.

आडदांड सिक्युरिटी एव्हाना तिथे पोहचली होती. त्यांनी खुरट्या दाढीवाल्याला धरलं. त्याने खूप धडपड केली; पण त्याचं काहीएक चाललं नाही. सगळ्या लोकांनी अगोदरचा प्रकार पाहिलाच होता. काळू मांजर आणि झिपर्‍या दोघेही गायब होण्यात यशस्वी झाले होते. शिरीनबाई खाली बसल्या होत्या व त्यांनी हिरोला जवळ घेतलं होतं. जय त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होता. हिरोला ते अतिशय आवडत असावं, यात शंकाच नव्हती.

पोलिसांना बोलवण्यात आलं. तो खुरट्या एक खतरनाक गँगस्टर होता. खूप दिवसांपासून हवा असलेला, वाँटेड! तो दुसर्‍या एका गुंडाला मारण्यासाठीच आला होता, त्या पळालेल्या झिपर्‍याला; पण आता तो स्वत:च अलगद पोलिसांच्या तावडीत सापडला होता.

शिरिनबाईंनी जयची ती उडी पाहिली होती. हिरोसाठी केलेलं ते जिवावरचं धाडस पाहिलं होतं. त्याच्या मागची कारणं त्यांना यशावकाश समजली.

त्यांनी जयला सांगितलं, तुला हवं तेव्हा आमच्या घरी ये; हिरोशी खेळायला. तो आता त्यांचा एकदम ‘डिकरा’ झाला होता.

एवढंच नाही, तर त्यांनी जयला एक जर्मन शेफर्डचं पिल्लू गिफ्ट म्हणून द्यायचं ठरवलंय. त्याच्या आईबाबांचं मन वळवायचं काम त्यांनी केरमनला सांगितलंय. केरमनबाबा ते ऐकणारच आहेत, कारण शिरीनबाईंच्या पुढे त्यांचं काही चालतच नाही.

‘द मॉल’च्या मालकाने ठरवलंय की, शूर मुलांसाठी मॉलतर्फे एक ट्रॉफी द्यायची. अर्थातच, या उपक्रमाचा पहिला हिरो जय होता, हे वेगळं सांगायला नको.

सगळ्यांनी जयचं कौतुक केलं होतं, करत होते. तो कौतुक वर्षाव पाहून नरेन आणि विशालपण हरखले होते. त्यांना आपल्या मित्राचा भलताच अभिमान वाटू लागला होता आणि तो त्यांच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहत होता. अर्जुनने खास जयसाठी, त्याच्या भेट मिळणार असलेल्या पिल्लाला ‘खास शिकवणी’ द्यायचं कबूल केलंय. जयलासुद्धा डॉग ट्रेनरचं प्रशिक्षण द्यायचं ठरवलंय.

आईबाबांची आता काही हरकत नाहीये. त्या दिवशी, नंतर ते तिघे तिथे भरपूर खेळले. त्यांनी खूप धम्माल केली. खाऊ खाल्ला. एक पैसासुद्धा न देता. मॉलची प्रसिद्धी झाल्यामुळे, मॉलतर्फे त्यांचा लगेच करण्यात आलेला तो छोटा सन्मानच होता. जय मात्र सगळं पाहून गप्प होता. आनंदामुळे तो फारसं बोलतच नव्हता. त्याच्या डोळ्यांपुढे होती - ट्रॉफी आणि एक गोड पिल्लू! जयसाठी ‘द मॉल’ ठरला होता- डबल धमॉल! हो ना?

- ईशान पुणेकर