मुलांनो, आपण राजा, कवी आणि कथा या कथामालेत अनेक राजांच्या आणि कवींच्या गोष्टी पहिल्या. जसे - याज्ञवाल्क्य आणि जनक राजा, अगस्ती आणि राम राजा, कृष्ण आणि अर्जुन, बाणभट आणि हर्षवर्धन इत्यादी. आज या कथामालेतील शेवटीची गोष्ट - शिवाजी महाराज, कवी भूषण आणि शिवभूषण.

1305 मध्ये तुर्की अल्लाउद्दिन खिलजीने महाराष्ट्रावर स्वारी केली. येथील यादव राज्य काबीज केले. त्यानंतर जवळजवळ 350 वर्ष महाराष्ट्रावर परकीय सत्ता होती. तुर्की, अफगाणी, अरब, मुघलांच्या राज्यात इथली जनता गांजून गेली होती. 1630मध्ये शिवनेरी किल्ल्यावर शिवबाचा जन्म झाला आणि एक नवीन पाहट उगवली. जेमतेम 16 वर्षांच्या शिवबाने मावळ्यांसह, रायरेश्वर येथील शिवालयत हिंदवी राज्य स्थापन करायची शपथ घेतली आणि त्यानंतर आयुष्याचा प्रत्येक क्षण स्वराज्यासाठी वाहिला. महाराजांनी एक एक करत अनेक गड-किल्ले जिंकले व अनेक नवीन गड बांधले. महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. शत्रूंचा नाश केला. रयतेला संरक्षण दिले. गुणीजनांचा सत्कार केला. रायगडावर महाराजांना भेटायला अनेक कलाकार येत असत. असेच एके दिवशी त्यांच्या दरबारात एक कवी आला, कवी भूषण!

कोण होता कवी भूषण? उत्तर प्रदेशात, यमुना नदीच्या तीरावर त्रिविक्रमपूर (तिकवाँपूर) नावाचे एक गाव होते. तिथे रत्नाकर नावाचा एक विद्वान राहत होता. याला चार मुले होती. चौघेही कवी होते. मोठे तिघे मुगलांच्या सेवेत होते. पण परकीयांची चाकरी काही धाकट्या भावाला पटत नव्हती. तो बाहेर पडला. काही काळ बुंदेलच्या छत्रसाल राजाकडे राजकवी म्हणून रुजू झाला. चित्रकूटचा राजा रुद्र प्रतापने या नवीन कवीचे वीररसपूर्ण काव्य ऐकले आणि नितांत खूश होऊन त्याला कवी भूषण हे नाव बहाल केले.

महाराज आग्र्याला असताना कवी भूषण एकदा महाराजांना भेटून आला होता. महाराजांची कीर्ती ऐकून तो काही वर्षांनी रायगडावर आला होता. त्याची विद्वत्ता आणि काव्य ऐकून महाराजांनी त्याला राजकवी म्हणून नेमेल. भूषणाने या काळात महाराजांचा राज्यकारभार, त्यांचा रणांगणावरील पराक्रम आणि त्यांचे तेजस्वी चारित्र्य जवळून पहिले. कविराजाची प्रतिभा उचंबळून आली आणि त्याने काव्यात्मक शिवचरित्र लिहिले - शिवभूषण! महाराजांच्या राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी हा काव्य-ग्रंथ भूषणाने पूर्ण करून महाराजांना दिला.

भूषणाने रायगडावर या काव्याची रचना केली. हा खरे तर काव्यशास्त्राचा ग्रंथ; पण अलंकारांचे उदाहरण देताना भूषणाने छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेले छंद दिले आहेत. या कवितांमधून महाराजांचे कार्य, त्यांच्या जीवनातील प्रसंग आणि त्यांची स्तुती येते. महाराजांच्या पराक्रमाचे, दातृत्वाचे, न्यायदानाचे, धाडसाचे वर्णन करणार्‍या कविता यामध्ये आल्या आहेत. वीररसाने भरलेले व प्रेरणा देणारे हे तेजस्वी काव्य आहे.

भूषणाचे काव्य उत्तर भारतातील ब्रज भाषेत आहे; तसेच त्या वेळेला प्रचलित असलेले अनेक फारसी शब्द त्यात आले आहेत. त्यामुळे ही भाषा समजणे अवघड जाते.

शिवभूषणची सुरुवात गणपतीला नमन करून होते. त्यानंतर महाराजांची कुलस्वामिनी आदिशक्ती भवानीमातेला वंदन केले आहे. राजवंशाचे कुलदैवत सूर्यनारायणाची स्तुती केली आहे. महाराजांची वंशावळी सांगितली आहे आणि त्यानंतर शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग व त्यांचे वर्णन आले आहे.

अनेक काव्यांमध्ये कवी भूषण शिवाजी महाराजांची तुलना श्रीराम, श्रीकृष्ण आणि इंद्राशी करतो. कवी भूषण म्हणतो -

इंद्र जिमि जंभ पर, बाड़व सुअंभ पर

रावन सदंभ पर रघुकुल राज हैं।

पौन वारिवाह पर, संभु रतिनाह पर

ज्यों सहस्रबाहु पर राम द्विजराज हैं।

दावा द्रुमदंड पर चीता मृगझुंड पर

भूषण वितुंड पर जैसे मृगराज हैं।

तेज तम अंस पर कान्ह जिम कंस पर

यौं मलेच्छ बंस पर सेर सिवराज हैं ॥50॥

इंद्र जसा जांभ असुराशी लढला किंवा वडवानल जसा समुद्रात पेटला किंवा उन्मत्त रावणापुढे जसा राम उभा ठाकला किंवा सहस्रार्जुनावर जसा परशुराम चालून गेला, किंवा हरणांच्या कळपावर जसा चित्ता झेपावला किंवा सूर्यप्रकाशाने  जसे अंधारावर चालून अंधार नाहीसा केला किंवा कृष्णाने जसा कंसाचा वध केला, तसा शिवराजाने तुर्क, अरब आणि मुघलांचा अंत केला!

आणखी एका ठिकाणी कवी भूषण म्हणतो -

कुंद कहा, पयवृंद कहा, अरुचंद कहा सरजा जस आगे।

भूषण भानु कृसानु कहा, खुमन प्रताप महीतल पागे।

राम कहा, द्विजाराम कहा, बलराम कहा रन मे अनुरागे।

बाज कहा, मृगराज कहा, अतिसाहस मे सिवराज के आगे ॥148॥

शुभ्रता पहिली असता, शिवरायांच्या यशापुढे - कुंद कळ्या, दूध आणि चंद्र फिके पडतात! तेजात शिवरायांच्या प्रतापच्या तेजासमोर सूर्याचे तेज फिके पडते! युद्धप्रियतेत राम, बलराम व परशुराम हे शिवरायांच्या मागे राहतात! आणि धाडसात बहिरी ससाणा आणि सिंहसुद्धा शिवरायांच्या साहसापुढे तुच्छ ठरतात!

तर, मित्र हो! या सदरातून बर्‍याच गोष्टींची ओळख करून घेतली आहे. आता तुम्हाला उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे, तर शाळेच्या वाचनालयातून मस्त मस्त पुस्तके निवडा. खूप खूप गोष्टी आणि छान छान कविता गा!