“ फुलला बनी वसंतबहार ” नावाचं नाट्यगीत पूर्वी खूप ऐकू यायचं...

आजही वसंताचं म्हणजे वसंत ऋतूचं वर्णन करणारी अनेक गीतं आपल्याला ऐकायला मिळतात. चैत्र आणि वैशाखाचे महिने म्हणजे वसंत ऋतू म्हणजे ऐन उन्हाळ्याचे दिवस. इंग्रजीतले मार्च, एप्रिल, मे महिने म्हणजे भरपूर उन्हाचे महिने. या काळात अनेक झाडं-झुडपं फुलांनी बहरलेली असतात. फुलांना हवं असणारं भरपूर ऊन आणि हवेतील आर्द्रता यामुळे आपल्याला सर्वत्र फुलांचा बहर आलेला दिसतो. यालाच वसंतातला बहर म्हणतात. भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध असल्याने लाल, पांढरी, पिवळी अशा अनेक रंगांची फुलं या काळात भरपूर प्रमाणात फुलतात. विशेष म्हणजे अनेक सुवासिक फुलं या काळात फुलतात व आपल्या सुगंधाने माणसांनाच नव्हे, तर पक्ष्यांना व कीटकांनाही आकर्षित करतात. फुलांच्या देठापाशी असणारा मकरंद शोधून घेण्यासाठी “शिंजीर” सारखे लहान पक्षिगण किंवा फुलपाखरं, कीटक, मधमाशा त्यावर गर्दी करतात.

उन्हाळ्याचा प्रारंभ होतो तो पळस, पांगरा, शेवरी यासारख्या झाडांवर फुललेल्या लाल रंगाच्या फुलांनी. पळसाला बनाग्नी किंवा वनज्योत असं म्हणतात. पानं गळून गेलेलं पळसाचं झाड उन्हाळ्यात लाल-भगव्या रंगाच्या फुलांनी भरून जातं. भगव्या किंवा नारंगी रंगाची ही बिनवासाची फुलं फुलली कि अवघं झाड रंगीत होऊन जातं. दुरूनही ते चटकन ओळखता येतं. हिरव्यागर्द जंगलात एखादी ज्योत पेटवावी तसं भासतं. म्हणूनच त्याला “फ्ले ऑफ द फॉरेस्ट” असं म्हणतात.

पांगाऱ्याचं फूल कोंबड्याच्या डोक्यावरील तुऱ्याप्रमाणे दिसतं. त्याचा रंग पळसापेक्षा वेगळा थोडा गडद लाल असा (कुंकू कलर) असतो. पांगाऱ्याचं झाडही फुलांनी फुलून जातं, तेव्हा काटेरी असूनही ते आपल्याला सुंदर दिसतं.

शेवरीचं किंवा काटेसावरीचं झाडही मार्च महिन्याच्या प्रारंभी घंटेच्या आकाराच्या गडद गुलाबी रंगाच्या असंख्य फुलांनी भरून जातं, तेव्हा ते विलक्षण देखणं दिसतं. निष्पर्ण वृक्षावर जागोजागी मोहक गुलाबी रंगाच्या फुलांचे घोस लटकलेले असतात. फुलात मकरंद असल्याने भुंगे, मधमाशा आणि पक्षिगणही या झाडाकडे आकर्षित होतात. झाडाखालीही गुलाबी रंगाच्या फुलांचा सडा पडलेला असतो.

पळस, पांगरा आणि शेवर या जंगली झाडांमध्ये आणखीही काही जंगली झाडं लाल रंगाच्या फुलांची उधळण करीत उभी असतात.

याच काळात छोट्या झुडपांवरही फुलं फुलतात. त्यामध्ये आपल्याला आकर्षित करतं ते करवंदीच्या झुडपावरचं फूल. करवंदीची फुलं अतिशय नाजूक व सुंदर असतात. करवंदीचं झुडूप पांढऱ्या रंगाच्या फुलांनी भरून जातं, त्या वेळी ते खूपच सुंदर दिसतं. याच दरम्यान कुडा नावाच्या वनस्पतीलाही पांढरी फुलं येतात. करवंदापेक्षा थोडी मोठी असलेली ही फुलं फुलल्यावर त्यातला मकरंद चोखाण्यासाठी भुंगे, मधमाशा येतात. या फुलाच्या देठापाशी भरून मकरंद असतो.

वसंतात फुलणाऱ्या फुलांमध्ये बकुळीचं फूल आपल्या मंद सुगंधामुळे सगळ्यांना मोहित करतं. माणसांना तर हे विशेष प्रिय असतं. बकुळवृक्षावरून खाली पडणारी छोटी छोटी पांढरी बकुळफुलं वेचायला आबालवृद्ध धावतात, कारण ते फूल खूप सुवासिक असतं. व त्याचा सुगंध टिकतोही अधिक काळ.

खरं तर जंगलातल्या अनेक झाडाझुडपांना उन्हाळ्याचा प्रारंभी फुलं येतात व उन्हाळ्याचा अखेरीस झाडं फळांनी भरून जातात.

जाई-जुई, मोगरा ही आपल्या परसदारी फुलणारी फुलंही उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात मिळतात. मोगऱ्याला उन्हाळ्यात बहर येतो. मोगऱ्याची फुलं खूपच सुगंधी असतात.

दोन-चार फुलं पिण्याच्या पाण्यात माठात टाकली कि ते पाणी सुगंधी होतं. ते पाणी पिण्यातही वेगळी मजा आहे. अनंताचं पांढरं टपोरं फूलही तितकचं सुगंधी असत, तर चाफ्याचं काही विचारूच नका. विविध प्रकारच्या चाफ्याची फुलं वसंतात फुलतात. देवाच्या देवळापाशी असणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या (मध्ये पिवळसर) चाफ्याला याच दिवसात बहर येतो. पानं पूर्णपणे गळून गेलेली असली, तरी घंटेप्रमाणे दिसणारी चाफ्याची फुलं झाडावर जागोजागी गुच्छाच्या रुपात लटकलेली दिसतात. चाफ्याचं फूल सुगंधी असत. सोनचाफ्याचं तर विशेष सुगंधी. फुलांची राणी शोभावी असं ते सुंदर, सुगंधी फूल. सोनचाफा पिवळा, पांढरा, हिरवासुद्धा असतो.

फुलांचा राजा म्हणजे गुलाब. गुलाबाला बहर येतो तो उन्हाळ्यातच. गुलाबाच्या काटेरी झुडपाला उन्हाळ्यात असंख्य फुलं येतात. गुलाब हा मूळचा गुलाबी रंगाचा असला तरी आज लाल, पिवळे, केशरी अनेक रंगाचे गुलाब आपल्याला पहायला मिळतात. मित्रहो, एकूण काय, तर ऐन उन्हाळ्याचे दिवस म्हणजे फुलांचा बहाराचेही दिवस. कारण ही सगळी फुलं म्हणजे सूर्याची मुलंच नाहीत का ?

- प्रा. सुहास बारटक्के.