गुलबक्षी

दिंनाक: 08 May 2019 15:41:55


 

गुलबक्षी या फुलाला संस्कृतमध्ये चंद्रकली म्हणतात. हि औषधी वनस्पती एक मी. उंच वाढते. ती शोभिवंत तर आहेच पण ती अनेक वर्षे जगणारी असून ती मुळची मेक्सिको व पेरू देशातील आहे. त्यावरून त्याला इंग्रजीत ‘मार्व्हल ऑफ पेरू’ असे म्हटले जाते. तसेच दिवेलागणीलाच ती फुलतात. म्हणून सांजपूजेला हमखास हजेरी गुलबक्षीचीच. हिचे शास्त्रीय नाव ‘मिराबिलिस जलाया’ आणि कुल निक्टॅजिनेसी.

भारतात सर्वत्र, बागेत व क्वचित जंगली अवस्थेत आढळते. गुलबक्षीचे रोपटे सदाफुलीसारखे कुठेही उगवते. हिचे खोड मांसल. ते नरम व जाड असते. मूळ ग्रंथील, पिंगट. पाने तळाशी हृदयाकृती, अंडाकृती व समोरासमोर असतात. फुले झुबक्यांनी येतात. ती पांढरी, लाल, पिवळी, गुलाबी किंवा मिश्ररंगी (शिंतोडे मारल्याप्रमाणे) असून प्रत्येकास तळाशी हिरवे छदमंडल व नरसाळे (नाळके) सारखे मंद सुवासिक वासाचे फुल असते. लाल डंख झालेली पिवळी, पांढरी फुलही असतात. लवचिक देठ दोरा न वापरता एकात एक गुंतवून छानदार वेणी करता येते त्यांची. त्यांचे आयुष्य मात्र अल्प. त्या विविध रंगी फुलात गुलबक्षी व बैगणी रंगही असतो. फुलपाखराद्वारे परागीकरण होते.

फळ शुष्क, काळे, सुरकुतलेले असून त्यावर परिदलाच्या तळाचे वेष्टन व आत एकच बी असते.

लागवड – बियांपासून किंवा ग्रंथील मुळांपासून करतात. हे रोपटे कुंडीत ताटव्यांच्या मागे वा कडेला लावतात. बागेतील कोणत्याही जमिनीत ते वाढते. बी सरळ कायमजागी लावून ३०-४० सें.मी. अंतराने रोपे विरळ करतात. पेरणी जानेवारी, फेब्रुवारी, मे-जुलै आणि सप्टेंबर-ऑक्टोबर आणि डोंगराळ भागात मार्च-एप्रिलमध्ये करतात.

पाने चुरगळून त्याचे गरम पोटीस सांध्यातील गाठीवर, गळावांवर बांधल्यास ती लवकर पुवाळतात. जखमा व खरचटणे यावर पानांचा रस गुणकारी असतो. मूळ उल्लसित करणारे, मुत्रवर्धक व रेचकही आहे. चीनमध्ये पाने व खोडाचे तुकडे मांसाबरोबर शिजवून खातात. जलदोरात याचा उपचार केला जातो. याची बी विषारी असते.

-    मीनल पटवर्धन