मित्र-मैत्रिणींनो, प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीनाकाही विशेष कौशल्य, आवड असते. पण जेव्हा हीच आवड जोपासतो, तेव्हा याचं छंदात रुपांतर होतं. छंद म्हणजे काय ? तर मोकळ्या वेळात, कधी खास वेळ काढून, खूप मन लावून आपण जी कृती करतो, तो छंद. प्रत्येकाचा छंद वेगवेगळा असतो – नाणी, चित्रं, दुर्मीळ वस्तू, खेळणी, पक्ष्यांची पिसं, पोस्टाची तिकिटं, रंगीबेरंगी, वेगवेगळ्या आकारांचे दगडगोटे, विशिष्ट विषयाशी संबंधित पुस्तकं, गोष्टी, गाणी इत्यादी. गाणं म्हणणं, वादन, नृत्य, अभिनय करणं, जादू करणं, पोहणं अशा कला काहींच्या अंगी असतात. छंद म्हणून ते या कला जोपासतात. शिल्पकला, चित्रकला, छायाचित्रण, लेखन, वाचन, इ. नवनवीन कला शिकणं हाही छंदच. तर काही जण ट्रेकिंग, भटकंती यांसारखे घराबाहेर जोपासता येतील असे छंद बाळगतात. निरीक्षण हादेखील एक प्रकारचा छंदच. पक्षीनिरीक्षण, आकाशनिरीक्षण असे छंद असणारे लोकही आपण पाहतो.

छंद एक प्रकारचा ध्यास, वेड (आजकालच्या पिढीच्या भाषेत पॅशन) असतं. छंदामुळेच व्यक्तीच्या जडणघडणीला वेगळं वळण मिळतं. या विरंगुळ्याला पुरेसा वेळ दिला तर अभ्यासाचा ताणही कमी होतो. आणि काहींना या छंदातूनच आपल्या भविष्याचा मार्गही सापडतो. त्या दृष्टीने वाटचालही आपोआप सुरु होते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली.

आज मी तुम्हाला अशाच एका मित्राची ओळख करून देणार आहे. कौस्तुभ साळी हा भावे हायस्कूलच्या नववीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी. लहानपणी विरंगुळा म्हणून कागदाच्या कपट्यांपासून वस्तू बनवायचा. हळूहळू कागदाशी त्याची मैत्री झाली आणि गेली नऊ वर्ष त्याला छंद आहे ओरिगामीचा.

कौस्तुभचे मामा जीडी आटिर्स्ट होते. त्यांनी त्याला ओरिगामीची अधिक माहिती दिली. मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे त्यामध्ये अधिकच रस निर्माण झाला. सुरवातीला आई-बाबा जे सांगतील त्याप्रमाणे, स्वतः पुस्तक वाचून तो ही कला विकसित करीत होता, आणि मग पाचवीपासून तो इंटरनेटचा वापर करू लागला.

कौस्तुभला ओरीगामीचे दोन प्रकार येतात. एक म्हणजे प्लेन ओरिगामी आणि दुसरा म्हणजे थ्री-डी ओरिगामी. मित्रमैत्रिणींनो, ओरीगामीमध्ये कातरी किंवा डिंक यांचा वापर केला जात नाही. केवळ हाताच्या साहाय्याने कागदाच्या घड्या करून ते एकमेकांमध्ये अडकवून विविध वस्तू तयार केल्या जातात. यासाठी चौरस किंवा त्रिकोणी आकाराचेच कागद वापरले जातात. घोटीव पेपर, टिंटेड पेपर आणि क्राफ्ट वापरले जातात.

थ्री-डी ओरीगामीचा स्वान (हंस) पक्षी तयार करायला साधारणत: ३६० फोल्ड्स तयार करावे लागतात. दोन ते तीन तास वेळ दिला तर तीन-चार दिवसांच्या परिश्रमानंतर हा पक्षी तयार होतो. थ्री-डी ओरिगामीचा मोर तयार करण्यासाठी त्याला १२६० बारीक फोल्ड करावे लागले आपण त्यापासून मोर तयार करायला त्याला एक महिना कष्ट करावे लागले होते.

अभ्यास करून छंद जोपासायचा, म्हणजे नियोजन खूप महत्त्वाचं आहे. शालेय विद्यार्थ्यांचा बराचसा वेळ अभ्यासात जातो. पण यातही कौस्तुभ छंद जोपासतो, ते केवळ वेळेच्या नियोजनामुळे. कौस्तुभ सांगतो, “ माझ्या बाबांनी माझं वेळापत्रक तयार केलं आहे. झोपण्यापूर्वी मी छंदाला वेळ देतो. तसंच सुट्टीचा रविवार मी फक्त छंद जोपासतो. अभ्यासाचा ‘अ’सुद्धा मी या दिवशी उच्चारत नाही. ”

कौस्तुभ इंटरनेटचा, पुस्तकाचा वापर तर करतोच, पण स्वतःच्या सर्जनशीलतेलाही महत्त्व देतो. तो नवनवीन वस्तू बनविण्याकडे लक्ष देतो. त्याचा शोध घेतो, चित्र काढतो. आपण मग त्यानुसार फोल्ड तयार करून ते एकमेकांमध्ये अडकवून नवीन वस्तू तयार करतो. चुकलं तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो. चिकाटीने काम करतो. इतकंच नाही, तर त्यासंबंधित लोकांना भेटतो, प्रदर्शन पाहतो, पडलेले प्रश्न विचारतो, नवीन शोधण्याचा प्रयत्न करतो. कौस्तुभच्या या छंदाला अधिक बळ मिळत ते आईवडिलांच्या प्रोत्साहनामुळे आणि मित्र, शाळा, शिक्षक यांच्या कौतुकाच्या शब्दांमुळे. आठवीत असताना चित्रकला, हस्तकला यासारख्या प्रदर्शनात त्याने ओरिगामीच्या वस्तू मांडल्या होत्या. अशा प्रकारे शाळेतूनही वेळोवेळी त्याला प्रोत्साहन मिळतं. आतापर्यंत त्याने प्लेन ओरिगामीत टीशर्ट, किटली, क्रेन, वटवाघूळ, बेडूक, पुस्तक अशा छान छान गोष्टी तर थ्री-डी ओरिगामीत मोर आणि स्वान (हंस) तयार केला आहे.  

ओरिगामी छंदामध्ये त्याला पुढे करिअर करण्याची इच्छा आहे. तो म्हणतो, “ मला चित्रकलेमध्ये करिअर करायला आवडेल. ” तो स्वतः इतकं सगळं करतो, पण ओरिगामीच्या स्पर्धा नाहीत. मुळात या कलाप्रकाराची माहितीही नाही, याची खंतही तो व्यक्त करतो. ती अधिकाधिक लोकांना माहित व्हावी, या दृष्टीने मी भविष्यात प्रयत्न करणार आहे, असंही तो सांगतो. इतक्या लहान वयात त्याच्या मनात असलेल्या जागरूकतेचं कौतुक वाटतं. भावे हायस्कूलच्या या चिमुरड्या मुलाची स्वप्न भरारी घेणारी आहेत.

विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हालाही असाच एखादा छंद असेल. त्याचा शोध घ्या आणि त्याविषयी आम्हाला कळवा. आम्ही स्वतः तुमच्या घरी येऊ तुमच्या छंदाबद्दल जाणून घ्यायला.

- सायली नागदिवे