एक झाड लावू मित्रा

दिंनाक: 06 May 2019 15:27:48


 

अनादी काळापासून अन्न, वस्त्र आणि निवारा या प्रत्येक गोष्टीसाठी मानव जंगलावर अवलंबून राहत आला आहे. जंगलावर म्हणजे वनस्पतींवर, पोटाची भूक असो कि घालायला कपडे, एवढंच काय, जगण्यासाठी आवश्यक असणारा प्राणवायूदेखील आपल्याला वनस्पतींपासूनच मिळतो आणि तोदेखील मोफत...अशा पद्धतीने वनस्पतींचे आपल्यावर अनंत उपकार आहेत.

आपले पूर्वज निसर्गपूजक होते आणि आपण त्या निसर्गपूजक संस्कृतीचे पाईक. माणूस नेहमी निसर्गाच्या सहवासात राहावा, निसर्गाशी त्याची नाळ नेहमी जोडलेली असावी म्हणून आपल्या पूर्वजांनी प्रत्येक सणाला जोड दिली ती निसर्गाची, वनस्पतींची, पशु-पक्षी यांची. एवढचं काय, आपण ज्या देवता पूजनीय मानतो, त्यांच्या सहवासातदेखील कुठले ना कुठले पशुपक्षी किंवा वनस्पती दाखवल्या जातात, जेणेकरून तो सण साजरा करता यावा आणि त्यासाठी ती वनस्पती मिळावी म्हणून तरी माणूस त्या वनस्पतींची लागवड व संवर्धन करेल, अशी त्यांची कल्पना होती. पण सणांमागील हा मुख्य उद्देश लक्षात न घेता आपण सरसकट झाडांच्या मागे लागतो. आता तर एखादा सण आला तर त्याच्याशी संबंधित झाडावर एकदम संक्रांतच येते. श्रद्धेच्या नावाखाली आपण झाडच्या झाड नष्ट करतो, पण हे अजूनही आपल्या लक्षात येत नाही, हेच मोठं दुर्भाग्य.

आपल्या भारतात हवामानात इतकी विविधता आढळते की त्यामुळे देशाच्या प्रत्येक भागामध्ये असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती सापडतात. पशुपक्षी आणि वनस्पती यांचं नातंदेखील अतूट आहे. पक्ष्यांना तर जैवविविधतेचं निर्देशक (Indicator) म्हटलं जातं. आजकाल जागतिकीकरणामुळे शहरात लोकसंख्येचा पूर आलाय. शहरात जिथे माणसांना राहायला जागा नाही, तिथे झाडं कुठे लावणार ? आणि समजा थोडीफार जागा मिळालीच, तर तिथे शोभेची ‘बाहेरच्या देशातून आणलेली झाडं’ (Exotic Plants) मोठ्या हौसेने लावली जातात. त्यामुळे त्या भागातील देशी वनस्पतींचं प्रमाण कमी होतं आणि त्यावर अवलंबून असणारे स्थानिक पक्षी त्या झाडाअभावी पोरके होतात. मग अशा निर्वासित पक्ष्यांचे थवे शहरांपासून दूर जातात ते झाडांच्या शोधात. दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर चालू असणाऱ्या जंगलतोडीमुळे त्यांना तिथेही आसरा मिळत नाही. म्हणजे पुन्हा इथेदेखील माणूसच कारणीभूत ठरला जैवविविधतेची साखळी बिघडवायला. त्यामुळे आज गरज आहे ती देशी वनस्पतींच्या (Indigenous Plantच्या) मोठ्या प्रमाणावर लागवडीची व संवर्धनाची. परदेशी वृक्ष घटक आहेत असं मला इथे म्हणायचे नाही, पण ते त्यांच्या देशात (Native Placeमध्ये) चांगले असले तरी ते आपल्या इथे प्लॅस्टिकसारखे वागतात. पशुपक्ष्यांना त्या झाडावर खायलाच काही मिळत नसल्यामुळे ते सहजी त्या झाडांचा स्वीकार करत नाहीत. आणि मग शहरातून पक्षी हद्दपार होतात.

हे सगळं थांबवायचं असेल तर आधी माहिती करून घ्यायला हवी ती देशी वनस्पतींची, त्यांच्या कार्याची आणि मह इथवरच न थांबता सुरुवात करायला हवी त्यांच्या लागवडीची आणि संवर्धनाची. आज कितीतरी सामाजिक संस्था अशा पद्धतीचे उपक्रम राबवत आहेत. पण ते अजूनही तुटपुंजे आहेत. गरज आहे अधिक लोकांनी यात सहभागी होण्याची. मोठमोठ्या मंदिर समित्यांनी धार्मिक संदर्भ असलेले नक्षत्रवन, गणेशपत्री बाग, अष्टदिशा वृक्ष वन, माटोळी वृक्ष वन अशा पद्धतीचे प्रकल्प सुरु करायला हवेत, जेणेकरून कित्येक दुर्मिळ आणि बहुमोल वनस्पती टिकतील. आज कितीतरी शाळा आपल्या शाळेची वैशिष्ट्ये सांगताना कितीतरी गोष्टींचा पाढा वाचतात. मग त्यात औषधी वनस्पतींच्या संग्रहाचा किंवा बागेचा समावेश का करत नाहीत ? प्रत्येक मुलाला किंवा एका वर्गाला दहा या पद्धतीने शाळा ही झाडे दत्तक देऊ शकतो आणि मुलांना त्यांची माहिती मिळू शकेल. शाळांनी अशा पद्धतीचा प्रयोग करायला काहीच हरकत नाही. मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये ग्रंथालय, खेळाचे मैदान, तरणतलाव, क्लब अशा अनेक गोष्टी असतात. मग त्यांच्याकडे अशा पद्धतीचे औषधी वनस्पतींचे उद्यान का असू नये ? याचा त्यांनीदेखील विचार करायला हरकत नाही. मी तर म्हणतो, प्रत्येक कुटुंबाने एकएक झाड जरी दत्तक घेतले तरी प्रत्येक सोसायटीत पन्नासपेक्षा जास्त वनस्पतींचा संग्रह होईल. नवीन पिढीला या वृक्षांची माहिती होईल.

मी वर म्हटलेली एकही गोष्ट कठीण नाही किंवा अशक्य तर अजिबातच नाही. गरज आहे ती थोड्या प्रयत्नांची व विचारांना कृतीची जोड देण्याची. मग चला तर, येत्या वसुंधरा दिनी संकल्प करूया एका तरी देशी वनस्पतीचं रोप लावण्याचा आणि त्याच्या संवर्धनाचा. प्रत्येकाने असं एकएक रोप लावलं तर ही परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही आणि हाच खऱ्या अर्थाने भूमातेच्या ऋणातून उतराई होण्याचा एकमेव मार्ग ठरेल.

मग काय, लावणार ना एका तरी देशी वनस्पतीचं रोप आपल्या अंगणात ?

- भरत गोडांबे