आधी उभ्या, आडव्या, तिरक्या आणि नागमोडी रेषा पेन्सिलने रेखाटण्याचा सराव करा. एकदा ते जमलं की लहान-मोठी वर्तुळं (गोलाकार आकृती) रेखाटून पाहा. मात्र पट्टी किवां कंपास यांची मदत घ्यायची नाही. रेषा चुकली तरी हरकत नाही. व्यंगचित्रातील महत्वाचा भाग असतो चेहरा. पण दोन व्यक्तीचे चेहरे कधीच सारखे नसतात.


 

हसरा चेहरा रेखाटण्यापूर्वी तुम्ही तुमचे मित्र, पालक, शेजारी, शिक्षक, आसपासच्या व्यक्ती यांचे चेहरे बारकाईने पाहा. हसताना डोळे, ओठ यांच्या हालचाली कशा होतात ते पाहा. चेहरा गोल आहे, चौकोनी आहे की उभा आहे, याचं छान अवलोकन करा व त्यानंतर आकृती ‘अ’ मध्ये दाखविल्याप्रमाणे पाच चेहरे स्वतः रेखाटा. चेहऱ्यावरचे हावभाव अनेक प्रकारचे असतात.


 

आनंद, दुखः, राग, चीड, आक्रोश, निद्रा, थकवा, दाखविणारे  भाव तुम्हीही रेखाटायला शिका. त्यासाठी आकृती ‘ब’ पाहा. हास्यचित्रात चेहरा नेहमीच समोरून दाखवायला हवा असा काही नियम नसतो. म्हणून उजवीकडून किंवा डावीकडून चेहरे कसे दिसतात, याचाही तुम्ही अभ्यास करायला हवा.


 

आकृती ‘क’ मध्ये असे चेहरे तुम्ही पाहू शकता. हात, पाय, पायातील बूट/चपला, डोक्यावरील टोपी, शरीराची ठेवण, उभं राहण्याची किंवा बसण्याची स्थिती हेही हास्यचित्र प्रभावी होण्यासाठी आवश्यक असतं.


 

आकृती ‘ड’ मध्ये अशी काही हास्यचित्र रेखाटली आहेत. त्यांचाही सराव करा. एक १०० पानी कोरी वही घ्या. रोज ३० मिनिटे सराव करा. तुम्हाला उत्तम हास्यचित्रे जमतायेत असं वाटू लागले की काळ्या शाईच्या फाऊंटन पेनाने, स्केचपेनाने किंवा नाजूक ब्रशने पेन्सिलच्या रेषा ठळक करण्याचा सराव करा. त्यानंतर गंमतीदार वाक्यं पात्रांच्या सोबत लिहा. हा सराव करत असतानाच सद्यःस्थितीचं ज्ञान होण्यासाठी स्थानिक वर्तमानपत्रं व साप्ताहिकंही वाचायला हवीत. काही काळानंतर तुम्हाला उत्तम कल्पना सुचतील, त्या डायरीत लिहून ठेवा. त्यावर आधारित हास्यचित्रं सुबकपणे रेखाटा. एकलव्याप्रमाणे घराच्या घरी हा अभ्यास करा. उद्वेली बुक्स, ठाणे या प्रकाशन संस्थेने अनेक व्यंगचित्रकारांच्या हास्यचित्रांचे संग्रह मराठीत प्रसिद्ध केले आहेत. त्यांचा संदर्भासाठी वापर करा. तसचं दैनिकात, दिवाळी अंकात प्रसिद्ध होणारी व्यंगचित्र कापून चिकटवून ठेवा. त्यांचा संग्रह अवश्य करा. वेळोवेळी त्यातील पात्रं, प्रसंग बदलून तुम्हाला काही वेगळी हास्यचित्रं रेखाटता येतील. आवड असेल तर तुम्हाला हे नक्कीच जमेल. मानसिक आनंद, पैसा व प्रसिद्धी  देणारं हे क्षेत्र तुम्हाला नक्कीच आवडेल. काही अडलं तर मला ई-मेल पाठवा [email protected]  या पत्त्यावर!

ऑल दि बेस्ट!!   

- विवेक मेहेत्रे

( विवेक मेहेत्रे गेली ३३ वर्षे भारतभरातील अनेक नियतकालिकांमध्ये हास्यचित्रे, राजकीय व्यंगचित्रे व कार्टून्स रेखाटतात. त्यांच्या व्यंगचित्रेकलेच्या मार्गदर्शनपर शिबिरातून व कार्यशाळेतून अनेक व्यक्तींनी या आगळ्या कलेचे ज्ञान मिळवलेले आहे. )