फुलवा घरची शेती

दिंनाक: 04 May 2019 18:27:15


 

कचऱ्यापासून खत

सध्या रोज निघणारा टनावारी कचरा कोठे, कसा टाकायचा, (डंपिंग) हा नगरपालिकेपुढे यक्षप्रश्न उभा ठाकलेला आहे. त्याची विल्हेवाट कशी लावायची ? तो कचरा वाहून नेण्यासाठी सध्या मनुष्यबळ (श्रम) व पैसा खूप लागत आहे. तरीही त्या प्रश्नाचे गांभीर्य कमी होतच नाही. त्यामुळे प्रत्येक घरी ओल्या कचऱ्यापासून खत करून, तेच आपल्या झाडांना घालून, ढासळत्या पर्यावरणाचा तोल सांभाळण्यात प्रत्येकाने खारीचा वाटा उचलायला हवा.

मी माझ्या झाडांना ओल्या कचऱ्यापासून घरच्या घरीच बनविलेल्या बिनखर्चाच्या खताचेच टॉनिक देते. अगदी भाज्यांनाही ते पुरेसे होते. जोमाने वाढलेली माझी हिरवाई तोऱ्याने उभी आहे.

असे करा खत तयार

आता खत तयार करायची साधी, सोपी पद्धत तुम्हाला सांगते. ना त्याला काही खास जागेची तयारी, ना काही खर्च १ अगदी घरातली भाजी, फळे, कचरा, निर्माल्य यांपासून आपण खत करणार आहोत (नवनिर्मिती). नको असलेली एक बादली / मोठा डबा / मोठी कुंडी घ्या. त्याच्या तळाला भोक पाडून त्या भोकावर खापरीचा / करवंटीचा तुकडा ठेवा, शिवाय नारळाच्या दोन शेंड्याही मोकळ्या करून ठेवा. चिपाडे नसतील तर गवतही घालू शकता. त्यावर थोडी माती घाला. मग पालापाचोळा, काट्याकुटक्या यांचा दुसरा थर घालून त्यावर विटांचा / कोळशाचा चुरा, थोडी (दोन मुठी) माती घाला. तसेच मटारची, शेंगांची (वाल इ.ची) सुकलेली सालेही चालतील. वर थोडी माती. आता भाजी+फळे, घरातला टाकाऊ कचरा+निर्माल्य यांचा एक सें.मी.चा थर घाला आणि त्यावर मातीचा थर टाकायला मात्र विसरायचं नाही हं ! ओला कचरा मातीने पूर्णपणे बंद करायचा, म्हणजे घाण वास, चिलटे अजिबात येत नाहीत. अगदी वर शेणमिश्रित पाणी शिंपडा. असा दररोज वरतीच भाजीचा रतीब घालत राहा. त्यावर लगेचच माती पसरा (खालचा थर वर काढायला नको.) ८/१० दिवसांनी पुन्हा थोडे पाणी शिंपडाल, तेव्हा खालचा एक थर वर काढा व वरचा एक थर खाली ढकला (हे काठीने करा.) असे केल्याने कचरा लवकर कुजतो. हळूहळू तो कचरा खाली जातो. असे करीत एक भांडे भरले की दुसरे. पहिले भरल्याची नोंद करावी. दोन महिन्यांनी काळेभोर सेंद्रिय खत – काळी माती तयार होते. कुंड्यांच्या आकाराप्रमाणे झाडाला ते खत घाला. मग वर ती पहिली माती पसरा. नाहीतर भसकन पाणी घालताना ते खत खाली पडून जाईल. कडेकडेने पाणी घालावे.

खतासाठी कांदा-लसणाची साले, अंड्याची टरफलेही घाला. सालपा (लाकूड तासलेला भाग), भाताचे तूस मिळाल्यास तेही तुम्ही घालू शकता. शिवाय रोजची भाजी जी केली जाते, तिच्या सालांचा कचरा+केळी, पपई, कलिंगड या फळांच्या साली जरा बारीक चिरून घाला, म्हणजे कुजायला वेळ लागत नाही. तसेच फ्लॉवर, कोबी जरा बारीक चिरून घाला, म्हणजे पहा, कोणतीही गोष्ट फुकट जात नाही. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होते. आपल्यालाच त्याचा फायदा मिळतो. निर्माल्याचेही खत तयार केले जाते. आंब्याच्या सालीचे तुकडे करून (कोय काढून) थर द्या. व त्यावर माती पसरा. हेही फार छान होते. तसेच हिरवे खत – माझ्या कुतूहलाचा विषय ठरलेले ! तेही झटपट करता येते. झाडांनाही लगेच ते शोषून घेता येते. त्याची कृती पाहा – आपण पालेभाजी निवडतो. वरचा अर्धा भाग घेतला जातो. बाकी फुकट गेलेला मुळांकडील भाग खतासाठी तुकडे करून टाकावा. तरी थोडा भाग वर राहतो. त्याचे दोनचार तुकडे करून घ्या. ते पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्या. गाळ, चोथा राहील तो खताच्या भागात टाका आणि गाळलेले हिरवे पाणी झाडांच्या आकारानुसार टॉनिकसारखे अर्धी वाटी घाला. दर सहा महिन्यांनी झाडांची माती बदला हं ! तुम्ही आई / ताईच्या मदतीने ही सर्व कृती सहज मजेत करू शकता. मग करणार ना सुरुवात कुंडीत नवीन झाड लावा. या वेळीही अशी चिपाडे वगैरे कृती करा आणि त्यात झाड / बी लावा. रोपटे झटकन वाढेल. भेंडी, गवार, वरवर फांदीच्या पेराजवळ लागतात, हे पाहिले. सेंद्रिय खताची प्रतिकारशक्ती चांगली असते. या खतात पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. या खतात वाढलेल्या भाज्या टवटवीत, चविष्ट असतात.

मी चार भागात झाडे लावली – १) औषधी वनस्पती – गवती चहा, तुळस, सुगंधी गवला कचरी (उटण्यात, शिकेकाईत घालतात) आले, पुदिना, ब्राम्ही, माका, ओवा, कडुलिंब, दुर्वा, कोरफड, खायचे मघई पान, शतावरी.

२) पालेभाज्या – मेथी, पालक, अळू, कांदा, लसून, अंबाडी, हळद.

३) भाज्या – मालकोल, कोबी, बीट, वांगे, बटाटा, टोमॅटो, रताळी, भेंडी, गवार, कोनफळ (कंद), फरसबी, दोन तऱ्हेच्या वालाच्या शेंगा, कारली, शेंगदाणे, तोंडली, मिरची, कुळीथ, मोहरी, शिराळे, हरभरा, मटार, पापडी, उस, मका, कापूस.

४) फुलझाडे – गुलाबी, लाल, पिवळी, केशरी जास्वंद, पिवळी बटणशेवंती, डबल तगर, पिवळी, गुलाबी छोटी लिली व एका वेळेला समोरासमोर ३/४ फुले येणारी लाल लिली, झेंडू, ब्रम्हकमळ, सोनटक्का, अबोली, मोगरा, नेवाळी, कर्दळ, दुर्मिळ अशी जर्बेरा व गणडिओला फुले. या फुलांनी व भाज्यांनी मला प्रशस्तीपत्रही मिळवून दिले आहे.

झाडातील गांडुळे काढून टाकू नका. ती एक प्रकारची नांगरटच करीत असतात. त्यामुळे कस वाढतो. ही झाडे लावल्याने मला खूप शिकायला मिळाले. उदा. – मोहरी, भेंडी, कारले, शेंगदाणे यांना पिवळी फुले येतात. दाण्याची फुले आली की तीच जमिनीत खोचावी लागतात. त्यालाच पुढे जमिनीत शेंगा लागतात. वांग्याची जांभळी फुले तर राताळ्याचीही जांभळीच फुले. हळदीच्या पानात पदार्थही (पातोळे) केला.

ती बिट्टीच्या फुलासारखी दिसतात. ती दुपारी तीननंतर मावळायला ;लागतात. कापसाचे पिवळसर फुल, त्याचे बोंड कसे फुलते, हे पाहायला मिळाले. तीन कुंड्यांतील कापूस मला वर्षभर पुरला. हिरव्या मिरच्या झाडावरच कशा रंग बदलतात...जांभळ्या फुलाच्या मिरच्या काळपट दिसतात. मक्याचा तुरा प्रथम छोटा येतो. मह हळूहळू त्या कणसात दाणे भरू लागतात. तसेच उसाचे तुरे पाहायला मिळतात. खूपच आनंद झाला. ही झाडे माझ्या कुटुंबाचाच एक भाग आहे. औषधी (जास्वंद, माका, ब्राम्ही, कोरफड) झाडांपासून मी केसांचे तेलही करते.

चहाच्या चोथ्यामध्ये पाणी घालून मग मी ते गुलाबाला घालते. त्याने खूप फुले येतात. थोडे शेणही घालते. सर्वच झाडांना डाळ-तांदळाचे धुवण घालते. कडुलिंबाचे झाड दोन फुटी झाल्यावर त्यात पांढऱ्या फुलांचे चार-पाच गुच्छ आले होते. कडुलिंबाचे छोटे झाड सहा इंच उंच झाल्यावर मी ते सोसायटीत लावले आहे. छान वाढते आहे. हे झाड पर्यावरणाचा तोल छान सांभाळते. त्याचे फार काही करावे लागत नाही. कोरफडीलाही एक-दोन दिवसांनी पाणी घातले तरी चालते. रताळे तर एकदा साडेतीनशे ग्रॅम इतके मोठे मिळाले, आणि दोन वेळा एक एक किलो. रताळी रसरशीत गुलाबी रंगांची असून पिवळसर अशी मिळाली. झाडांची निगराणी करताना वेळ खूप मजेत जातो. अशी झाडे न्याहाळणे तुम्हाला पुढच्या आयुष्यात उपयोगी ठरेल.

हिरवाईचे हे व्रत धरतीच्या सर्जनशीलतेचे आहे. तुम्ही हे व्रत घ्या आणि काही अडले तर मला नक्की विचारा...

- मीनल पटवर्धन