भूत भूत

दिंनाक: 04 May 2019 15:52:34


 

कोकणात माणसं कमी आणि भूत जास्त होती, तेव्हाची गोष्ट ! दूर डोंगरकडेला बसलेलं अडूर गाव अगदी एखाद्या काळ्याभिन्न अजगराप्रमाणे शांतपणे आळसावून पडलेलं होतं. संध्याकाळचे साडेसात वाजलेले. अगदी किर्रर्र तिन्हीसांजेची ती वेळ होती. सभोवार मिट्ट काळोख होता, कारण अडूरसारख्या खेड्यात त्या वेळी वीज पोहोचलीच नव्हती. ग्रामपंचायतीमार्फत चार-दोन कंदील लावले जायचे, तेही लावायला आज सुट्टीमुळे कुणी आलं नव्हतं.

अशा भयाण शांततेत आणि थंडगार काळोखात एसटी बसचा आवाज घुमू लागला. संध्याकाळी सहा वाजताच येणारी मुंबई-बोरीबंदर बस आज तब्बल दीड तास उशिरा येत होती. अडूर गावच्या सहाणेवर काही प्रवाशांना उतरवून पुढे बोरीबंदराकडे मुक्कामाला जाणार होती. इंजिनचा प्रचंड आवाज आणि दारांच्या पत्र्याचा थरथराट करीत बस अडूर गावच्या स्टँडवर म्हणजे सहाणेवर थांबली, आणि त्यातून एकमेव प्रवासी उतरला तो म्हणजे यमी. यमुना नार्वेकर.

धुराचा आणि धुळीचा वर्षाव करत एसटी बस पुढे निघून गेली, तेव्हा हातात समानसुमान घेऊन यमी एकटीच उभी होती. बहुदा वडिलांना तिचं पत्र पोहोचलं नसावं. तिला न्यायला कुणीच आलं नव्हतं. आता मिट्ट काळोखातून पायवाट शोधीत दूरवर असलेल्या भंडारवाडयाकडे तिला एकटीलाच जायचं होतं. रस्त्यापलीकडे असलेली शेतं ओलांडली की ओढयावरचा छोटा साकव (पूल) लागतो. त्यावरून पलीकडे जायचं. छोटी टेकडी ओलांडायची, की बस्स, आला भंडारवाडा ! पण तिथपर्यंत एकटीनं जायचं कसं ? तिकडे दूर त्या साकवापाशी थोडा उजेड दिसत होता. कुणी विजेरी पेटवली होती का ? की ???? विजेवरून यमीला आठवलं की आपल्याही सामानात एक टॉर्च आहे. त्याच्या उजेडात आपण भंडारवाडयाकडे जाऊ शकते. पण सोबतीला कोण घ्यावं ? मराठी शाळेजवळच्या शिंदेबाईंचेही आज सुट्टी असणार. त्या बहुदा गावाला गेल्या असतील. त्यापेक्षा एकटीनेच जावं झालं.

त्या काळी ना फोन, ना मोबाईल, ना दिव्यांचा लखलखाट. सायंकाळी अगदी सात वाजताच मध्यरात्र व्हावी तशी भीषण शांतता. यमीने सामानात हात खुपसून विजेरी शोधली आणि समान काखोटीस मारून ती विजेरी हातात धरून भंडारवाडयाकडे चालू लागली. झपाझप चालत तिने शेत पार केलं. ओढ्यावरच्या लाकडी साकवावर चढताच तो साकव कर्रSSकर्रSS असा वाजू लागला आणि यमू घाबरली. साकवावरून पलीकडे उतरताना तिचे पाय लटलट कपू लागले आणि गडबडीत तिच्या हातातली बॅटरी (टॉर्च) खाली पडली. यमीच्या काळजाचा ठोका चुकला. ‘राम राम’ म्हणत तिने पायानंच चाचपडायला सुरुवात केली आणि सुदैवाने बॅटरी सापडली. पण आता ती बिघडली होती. खूप प्रयत्न केल्यावर मधूनच पेटे आणि लगेच आपोआप बंद होई. यमीचे डोळे आता अंधाराला सरावले होते. हातात टॉर्च पकडून पेटवत ती पायवाटेवरून टेकडीकडे चालू लागली. आता समोरची छोटी टेकडी चढून गेलं की भंडारवाड्यातल्या घरांचे दिवे दिसू लागतील, याची तिला खात्री होती. पण का कुणाला ठाऊक, तिला अचानक भुताखेतांच्या गोष्टी आठवू लागल्या. एकदा खुद्द यमीच्या आईलाच भुत दिसलं होतं म्हणे. मध्यरात्रीनंतर आई जागी झाली आणि घरांच्या कुंपणाबाहेर फरफटल्याचा आवाज ऐकू येऊ लागला, म्हणून उठून पुढच्या दारापाशी आली. फटीतून बाहेर पाहते तर काय...पांढराशुभ्र गिऱ्ह्या (पुरुष भूत) पायात बहाणा, खांद्यावर घोंगडी आणि पांढर मुंडासं डोक्याला गुंडाळून उभा होता. शिवाय ताईलाही एकदा सुकाईच्या विहिरीच्या कठड्यावर सात वाजता आसरा बसलेल्या दिसल्या होत्या. ताई संध्याकाळी उशिरा पाणी भरायला विहिरीवर गेली आणि आसरांच्या तावडीत सापडली. कशीबशी वाचली होती.

अचानक यमीला आठवलं की पांडवाच्या सुनेने याच सकवाजवळच्या डोहात उडी मारून आत्महत्या केली होती. तिचं भूतही याच वाटेवर दिसायचं म्हणे. यमीच्या मनात त्या भुताने प्रवेश केला आणि ती भीतीने चिंब भिजली. भराभरा टेकडी चढू लागली. कुणी सोबतीला दिसतंय का, म्हणून मागे पुढे पाहू लागली, तर दूरवर काळोखात कुणी काळी आकृती पायवाटेवरून चालताना तिला दिसली. हातातल्या बॅटरीला झटके देत यमी भराभर त्या दिशेने चालू लागली. हातातली बॅटरी मधूनच पेटे, त्यात रस्ता दिसे, मग यमी भराभर पुढे चाले. पुढे चालणारी स्त्रीची आकृती आता अगदी जवळ येऊ लागली. “शुक शुक” अशी हाक मारीत यमीने त्या बाईला थांबवलं.

“भंडारवाडीकडे चाललात ?” यमीने अंधूक प्रकाशात तिच्याकडे पाहत विचारलं.

“होय..” त्या बाईने घोगऱ्या आवाजात उत्तर दिलं.

“चला. बरी सोबत झाली. मला खूप भीती वाटते.” यमी म्हणाली.

“मला नाही भीती वाटत...कसली भीती ? कुणाची ?” त्या बाईने विचारलं.

“अहो, त्या पलीकडच्या डोहात पांडबाच्या सुनेनं जीव दिला ना, तिचं भूत दिसतं म्हणे” यमीने घाबरत सांगितलं...

“ती काय करते ?”

“डोहाकडे ओढून नेते.”

“असं ? कशी दिसते ती पांडबाची सून ?”

त्या बाईने विचारलं. “हिरवी साडी, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा, कपाळावर लाल कुंकवाचा मळवट आणि मोठे डोळे” यमीनं वर्णन केलं. “अस्स होय...अशी दिसते का ती ?” त्या बाईने मागे वळून यमीकडे पाहात विचारलं आणि काय आश्चर्य ! यमीने हातातल्या बॅटरीला झटका दिल्यावर ती लख्खपणे पेटली तिच्या झगझगीत उजेडात यमीन पाहिलं-

तोच मळवट...हिरवी साडी, भयाण चेहरा, केस पिंजारलेले...यमी जागच्या जागी गोठल्याप्रमाणे उभी राहिली. जवळ येत त्या स्त्रीने यमीला म्हटलं- “अग, तिचं गं मी...”

क्षणार्धात जोरदार किंकाळी फोडून यमी खाली कोसळली आणि बेशुद्ध झाली. हातातलं समान, टॉर्च सगळं खाली पडलं. थंडगार काळोख पसरला.

...यमी शुद्धीवर आली, तेव्हा “चहा हवाय का ?” म्हणून तिचे बाबा तिला विचारत होते. आई शेजारी उभी होती. शेजारचे काका, अशोकदादा, सगळे भोवती उभे होते.

“यमे, अग, तू येणार होतीस तर पत्र नाही का पाठवायचं ? मुंबईहून एवढं एकटीनं यायचं म्हणजे ? मामाकडे शिकायला गेल्यापासून पहिल्यांदाच आलीस आणि तीही न कळवता ?”

“...पण मी कुठे आहे ?” यमीने घाबरत विचारलं. “कुठे म्हणजे आपल्या घरीच. आम्ही अंगणात गप्पा मारीत बसलो होतो. तेवढ्यात कुणाची तरी किंकाळी ऐकू आली. आम्ही सगळे कंदील घेऊन तिकडे धावलो तर तूच पडलेली दिसलीस.”

“आणि ती कुठाय ?”

“कोण ती ?”

“पांडबाच्या सुनेचं भूत..”

“कुठलं भूत ?”

“ते हिरवी साडी...कपाळी मळवट...हातात बांगडया...आणि घोगरा आवाज, दात विचकलेले, बरोबर ना ?” बाबांनी हसून विचारलं.

“होय” यमी उत्तरली.

“ ते भूत होय...ते बघ दाराबाहेर उभं आहे.”

बाबांनी दाराकडे बोट दाखवलं.

होय...दाराबाहेर तीच स्त्री उभी होती. लांबूनच भयाण हसत होती. यमी घाबरून पुन्हा ओरडणार तोच बाबा म्हणाले, “यमे, अग, ही पांडबाची सून नव्हे काही...ही तुकारामाची गंगी. तिचं लग्न झालंच नाही. डोक्यावर परीणाम झाला. रत्नागिरीला वेड्यांच्या इस्पितळात ठेवली होती. पळून आली. सध्या दिवसभर गावच्या सहाणेवर बसून असते. रात्री जेवायला परत येते. तीच भेटली तुला. आता काढून टाक ती डोक्यातली पांडबाची सून.”

- सुहास बारटक्के