(शंतनू उन्हाळी सुट्टीत शिबिराला गेला होता. सह्याद्रीच्या कुशीत, कोकणात, तिथल्या सदाहरित जंगलात सफर केल्याने त्याचे मन ताजेतवाने झाले. तेथील निसर्ग सौंदर्य, स्वच्छ परिसर त्याला जास्त आवडला. नकळतच त्याच्या मनाने आपल्या शहरातील परिसराची आणि शिबिराच्या ठिकाणच्या स्वच्छ परिसराची तुलना केली. विचार करताकरता त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. घरी परतल्यावर ती कल्पना सत्यात उतरवण्याचा ध्यासच त्याने घेतला. आपल्या मित्रमैत्रिणींच्या मदतीने त्याने आपली कल्पना सत्यात उतरवण्याचे ठरवून  कामाला सुरुवात केली...)

पल्लवी : अजून कसा आला नाही हा शंतनू?

मिलिंद : येईल, जरा वाट बघू या.

सुरज : का? आपल्याला बोलावून स्वत: का गायब आहे? कधी येणार काही कळत नाही?

पल्लवी : काहीही म्हण हां, पण त्याच्या डोक्यात गेले काही दिवस काही तरी चालू आहे, हे नक्की.

सुरज : काय चालू आहे? मला तर काही बोलला नाही.

प्राजक्ता : तुझं लक्ष असतं का कुठे? तो आजकाल शाळेत जाताना मागे मागेच असतो. आधी सारखा सणसणत जात नाही सायकल हाणत.

पल्लवी : हो, मी पण बघितलंय, आता म्हणालीस म्हणून आठवलं. कधी मागे बघितलं ना, तर हा आपला सायकलवरून उतरून काही करत असायचा.

मिलिंद : हो, खाली वाकून काही तरी चालू असायचं त्याचं, ते मीही बघितलंय. मला वाटलं सायकलचं काही तरी बिनसलं असेल; म्हणून कधी लक्ष दिलं नाही या आधी.

सुरज : बिघडली नसेल कशावरून? तुमचं आपलं उगाच काही तरी.

पल्लवी : तसं असेल कदाचित; पण गेल्या दोन्ही शनिवारी तो खेळायला न येता काही तरी लिहीत बसला होता, त्याचं रे काय?

प्राजक्ता : हो मलाही विचित्रच वाटलं ते. शंतनू तर कधीच असा घरी बसत नाही.

मिलिंद : मला म्हणाला तो, कसला तरी हिशोब लिहीत होता म्हणे.

सुरज: आता त्याला घरी हिशोब पण द्यायला लागतो की काय आज काल? हा, पण हे आठवतंय बाकी!!

प्राजक्ता : पण कोणी विचारलं का त्याला काय चाललंय म्हणून?

पल्लवी : आता आला ना, की विचारू आपण.

मिलिंद : पण आता त्याने बोलावलं आहे तर सांगेलच की तो. तसंही म्हणलाय ना, एक कल्पना सांगायची आहे म्हणून.

प्राजक्ता :  तुम्हाला सगळ्यांना ते आठवतंय? गोळेवाल्या काकांशी कधी नव्हे ते गप्पा मारायला गेला होता ते?

सुरज : हो, अगदी सगळ्यांचे ग्लास घेऊन गेला होता. थँक्यू म्हटलं आपण त्याला. तसाही काय करणार होता काय माहीत? त्या काकांकडे ग्लास टाकायला कुठे जागाच नाही?

पल्लवी : काही काय, जागा आहे त्यांच्याकडे बरं का! मी स्वत: टाकला परवा कचराकुंडीत. अग, त्याच दिवशी शंतनूने दिलेल्या चॉकलेटचा कागद मी खाली टाकला, तर त्याने तो उचलला. मला आपलं उगाच कससंच वाटायला लागलं. गोळा खाताना पण तो होताच ना? मग...!

मिलिंद : असेल, कारण पहिल्यावेळी मी पण नव्हती बघितली तिथे कचराकुंडी. त्यांनी आताच ठेवली असेल.

प्राजक्ता : आता त्या कचर्‍याचं काय ते त्यालाच विचारू... हा बघा, आलाच तो.

पल्लवी : सांग बाबा शंतनू, भुंगा लागलाय बघ दुपारपासून. काय सांगणार आहेस?

शंतनू : मी गेले दोन शनिवार जो हिशोब लिहीत होतो ना, तो दाखवायचा आहे!

सुरज : आता, त्याच्यावर पण आमची सही हवी की काय तुला?

शंतनू : नाही, ऐका. एका दिवसात माझे पकडून आपण ५ कागद अगदी सहज रस्त्यावर, बागेत टाकतो. म्हणजे १५० कागद अगदी असेच महिन्याचे गेले. त्याचप्रमाणे इतर ठिकाणी टाकले गेलेले ग्लास, टोपण आणि अजून वेगवेगळा कचरा मिळून साधारणपणे ३०० कचर्‍याचे बोळे आपण टाकत असतो. आता आपल्या ५ जणांचे इतके तर आपल्या अख्या वर्गाचे किती होतील?

सुरज : गणित छान आहे; पण त्याचं करायचं काय? का सुटत नाही म्हणून आम्हाला सांगतो आहेस?

मिलिंद : त्या कचर्‍याचं प्रमाण सांगायचा प्रयत्न करतोय रे तो. हा झाला हिशेब तो फक्त एका महिन्याचा. आख्या शाळेचा किती होईल मला सांगा? फक्त कल्पना करा!!

पल्लवी : अरे हो रे मिलिंद! हा विचार कधी मनात आलाच नाही. किती कचरा होईल नुसत्या शाळेचा! शंतनू, तुझ्या डोक्यात कुठून आलं हे सगळं? आणि म्हणून आता तू काय सगळ्यांचा कचरा गोळा करत बसणार काय?

शंतनू : मी उन्हाळी शिबिराला गेलो होतो ना, तिथली स्वच्छता फारच डोळ्यात भरली माझ्या. तिथेच विचार आला की, असं आपल्याकडे का दिसत नाही? रस्त्यातून जाताना कुठे तरी कचर्‍याचा ढिग दिसतोच, कचराकुंडीतून वाहत जाणारा तर सोडाच, पण नुसता रस्त्यावरसुद्धा इतका कचरा असतोे की, तो रोजच पाहून आपल्याला त्याविषयी काहीच वाटत नाही. हा कचरा माझ्या डोळ्यांना त्रास देऊ लागला.

सुरज : बरं, म्हणून मग आता काय संत गाडगेबाबा अभियान सुरू करायचं म्हणता! कुठून सुरू करायचं?  सोसायटीतून?

प्राजक्ता : तसं नाही अगदी; पण खरंच किती कचरा उचलणार आपण?

शंतनू : आपण कोणाचाही कचरा उचलायचा नाही, फक्त आपला उचलायचा. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना उचलायला सांगायचा. महिन्याअखेरीस रोज किमान एकाचा कचरा आपण थांबवला न तरी रस्त्यावरचे १०० कागद कमी केल्याचे समाधान मिळेल.

पल्लवी: हो रे! ही कल्पना फारच छान आहे. पण मोठ्या माणसांना हे कसं सांगायचं?

शंतनू : पल्लवी, तू एवढ्यात कशाला मोठ्यांचा विचार करतेस? आधी आपण ही सवय आपल्या अंगी भिनवू, मग बघू बाकीच्यांना कसं सांगायचे ते.

प्राजक्ता : कल्पना तर भन्नाट आहे, पण मग गेले दोन आठवडे आम्हाला का नाही सांगितलंस हे?

पल्लवी : हो ना...! आम्ही पण नसता टाकला रस्त्यावर कचरा. केवढा कचरा वाचला असता!

शंतनू : कारण तुम्हीही हे काम अगदी मनापासून करावं, अशी माझी इच्छा आहे; पण जोपर्यंत त्याची तीव्रता तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत मला ते तुम्हाला सांगण्यात रस नव्हता. तुम्ही स्वत: हून, उत्स्फूर्तपणे ते करावं असं मला वाटत होतं. म्हणून आधी नाही सांगितलं आणि आधी सांगितलं असतं, तर तुम्ही कचरा केला नसतात. तो कचरा नाही, म्हणजे कचर्‍याचं गणित नाही, गणित नाही म्हणजे त्या स्वत:पुरत्या केलेल्या छोट्या कामाचा फरक लक्षात आला नसता.

सुरज : हो रे शंतनू! बरोबर आहे तुझं.

शंतनू : काय मग आजपासून लागायचं ना कामाला...!

पल्लवी :  हो...!!  

सुरज :  हो...!!            

प्राजक्ता :  हो...!!  

मिलिंद :  हो...!!  

 - गौरव बांदिवडेकर