आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. भविष्यातील शासकीय नोकरीच्या संधी या विविध स्पर्धा परीक्षांमार्फत मिळणार आहेत. भविष्यातील अशा स्पर्धा परीक्षांची तयारी ही शालेय जीवनातील विविध टप्प्यांवर होत राहिल्यास भविष्यातील यशाची खात्री वाढते. आज नव्याने जे उच्च पदस्थ अधिकारी निर्माण होत आहेत. त्यांची पार्श्‍वभूमी पाहिली असता; शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेेल्यांची संख्या ही अधिक असल्याची जाणवेल. उदा, जवाहर नवोदय विद्यालय, शासकीय विद्या निकेतन, सैनिक स्कूल यांसारख्या स्पर्धा परीक्षांद्वारे प्रवेश मिळालेल्या विद्यालयातील विद्यार्थी एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी. परीक्षेत मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे आढळतात. यावरूनच शालेय स्पर्धा परीक्षांचे महत्त्व लक्षात येते. शालेय स्पर्धा परीक्षा मुलांची भविष्यातील स्पर्धा परीक्षाविषयक दाहकता कमी करते म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
‘शांततेच्या काळात घाम घाळल्यास, युद्धाच्यावेळी कमी रक्त सांडावे लागत,’ या विधानाचा अर्थ शालेय स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत पुढीलप्रमाणे जोडता येईल. जो शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी शालेय जीवनात चांगली करेल, त्याची भविष्यातील स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याची शक्यता इतरांच्या मानाने कैक पटीने वाढते.
शालेय स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना काय देतात? या प्रश्‍नाचे उत्तर एका वाक्यात सांगणे कठीण आहे. या परीक्षांचे अनेकविध फायदे आपणास सांगता येतील.
शालेय स्पर्धा परीक्षांचे महत्त्व
१) घोकंपट्टीतून सुटका होऊन समजपूर्वक पाठांतर व आकलन वाढते.
२) भविष्यातील स्पर्धा परीक्षांची पायाभरणी होते.
३) दैनंदिन अभ्यासातील संपादणुकीत लक्षणीय वाढ होते.
४) फक्त उत्तरे सांगणारे नाही; तर प्रश्‍न निर्माण करणारे व समस्या निराकरण करणे, विद्यार्थी तयार होतात.
५) बुद्धिमत्तेचा पर्यायाने व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यास मदत होते.
६) आपले विचार थोडक्यात, नेमकेपणाने व स्वत:च्या भाषेत विचार मांडण्याची कला अवगत होते.
७) मिळालेल्या ज्ञानाचे उपयोजन केले जाते. परिणामी ज्ञानाचे दृढीकरण होते.
८) तर्कसंगत विचार करण्याची वृत्ती विकसित होते.
शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेत असताना मुलांना संयमी बनवण्याचे आव्हानही आज संबंध शिक्षकांपुढे आहे. एखाद्या परीक्षेत यश आले म्हणून निराश न होता पुढील परीक्षेच्या तयारीसाठी घेतलेली ही मेहनत कामी येणारच आहे. हा विचार विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. मुळात स्पर्धा म्हणजे दुसर्‍यांपेक्षा आपण पुढे जाणे नसून स्वत:मध्ये सातत्याने सकारात्मक बदल किंवा गुणवत्तावृद्धी करणे असा आहे, हा वेगळा विचार शालेय जीवनातच मुलांमध्ये रुजणे महत्त्वाचे आहे.
आज विविध शालेय स्पर्धात्मक परीक्षा विविध इयत्तेच्या टप्प्यावर घेतल्या जातात. त्यापैकी काहीच परीक्षांची माहिती पालकवर्ग व विद्यार्थ्यांना असते.या स्पर्धापरीक्षांविषयी माहिती देण्याचा या लेखाच्या माध्यमातून केलेला हा छोटासा प्रयत्न.

- महेश शिंदे