पुढे चला

दिंनाक: 29 May 2019 11:38:26


 

साहित्य :

१ पत्त्यांचा जोड, २ कागद, २ पेन्सिली.

खेळाची तयारी :

हा खेळ दोन गटात किंवा कितीही जणात खेळता येतो. घरात खेळताना ‘आई’ आणि ‘बाबा’ असे दोन गट आहेत. आईच्या गटात अन्वय, रोह्न आणि आजी. बाबांच्या गटात सारा, प्रिया आणि आजोबा. प्रत्येक गटाने आपल्याकडे कागद पेन्सिल घ्यायची.
पत्त्यांमधील सर्व राजा, राणी आणि गुलाम काढून बाजूला ठेवायचे. उरलेले पत्ते पिसून टेबलावर ठेवायचे.

चला खेळूया :

दोन्ही गटांनी मिळून ० ते २० मधील एक संख्या घ्यायची. आता दोघांनी मिळून १५ ही संख्या घेतली आहे असे समजूया. प्रथम आई गट खेळेल. आई गटातील अन्वय टेबलावरील पत्त्यांतील कोणताही एक पत्ता घेईल. हा पत्ता पंजी म्हणजे ५ आहे.
आई गटाला १५ + ५ = २० गुण मिळाले.
आता बाबा गटातील सारा टेबलावरील पत्त्यातील कोणताही एक पत्ता घेईल. हा पत्ता अठ्ठी म्हणजे 8 आहे.
बाबा गटाला १५ + ८ = २३ गुण मिळाले.
याप्रमाणे प्रत्येक गटाने आळीपाळीने उचललेल्या पत्त्यांची बेरीज करत जायचं. लवकरात लवकर १०० व्हायला हवे.
नियम : एकदा उचललेला पत्ता पुन्हा वापरायचा नाही. तो बाजूला ठेवून द्यायचा. एकाचवेळी चुकून दोन पत्ते उचलल्यास त्यातील लहान संख्येचा पत्ता घ्यावा आणि दुसरा पत्ता बाद करावा. एकाचवेळी दोन पत्ते उचलणे असे दोनदा घडल्यास, तो गट बाद.
कोण जिंकेल - ज्यांचे सर्वांत आधी १०० होतील तो गट जिंकेल.


आणखी थोडी गंमत :


आता या खेळात तुमच्या बेरजा पक्क्या झाल्या आहेत. आता खेळाची गती वाढविण्यासाठी म्हणजेच गंमत डब्बल करण्यासाठी मार्क मोजण्याची पद्धत बदलूया आणि सुरुवातीची संख्या पण बदलूया. आता सुरुवातीची संख्या ५० घ्यायची. टेबलावरून घेतलेला पत्ता जर सम असेल तर त्याच्यात २ मिळवायचे आणि विषम असेल तर त्याच्यात ३ मिळवायचे.
उदा. दोन्ही गटांनी सुरुवातीला ५० संख्या घेतली आहे असे समजू या. आई गटातील अन्वय टेबलावरील पत्त्यांतील कोणताही एक पत्ता घेईल. हा पत्ता पंजी म्हणजे 5 आहे. 5 ही संख्या विषम आहे म्हणून ३ गुण अधिक. आई गटाला ५० + ५ + ३ = ५८ गुण मिळाले. आता बाबा गटातील सारा टेबलावरील पत्त्यातील कोणताही एक पत्ता घेईल. हा पत्ता अठ्ठी म्हणजे ८ आहे. ८ ही संख्या सम आहे म्हणून २ गुण अधिक. बाबा गटाला ५० + ८ + २ = ६० गुण मिळाले. ज्यांचे आधी ९९ गुण होतील ते जिंकले.. म्हणजेच झाला ना शंभर नंबरी धमाका.

- राजीव तांबे