माणसाने तीन छंद जोपासावेत. एक जो तुमचा उदरनिर्वाह चालवेल, दुसरा जो तुम्हाला तंदुरुस्त ठेवील आणि तिसरा जो तुम्हाला सर्जनशील बनवेल. म्हणजे बघितलना आपले उपजीविकेचे साधन आपल्याला आवडणारे असावे. ते फक्त काम नाही तर आपला छंद असले पाहिजे म्हणजेच ते करून मनाला छान वाटते. 
डॉ. राजन बडवे हे टाटा मेमोरियल सेन्टरचे संचालक आणि कॅन्सरचे प्रसिद्ध सर्जन आहेत. ते एका मुलाखतीत म्हणाले होते शाळेत मी दप्तर पाठीवर अडकवून जायचो आणि मजा करून परत यायचो. आता हॉस्पिटलमध्ये बॅग हातात घेऊन जातो आणि मजा करून परत येतो. म्हणजेच काय की, अभ्यास आणि काम आपल्याला मजा वाटले पाहिजे मगच आपण ते मनापासून करू आणि त्यात यशस्वी होऊ. 
दहावीनंतर दिशा काय?, कोणती साइड घ्यायची?, आई-बाबा म्हणतात ती? का आपल्या मित्राने/ मैत्रिणीने घेतली ती? करियर कसे निवडायचे? जास्त पैसे मिळवून देणारे करियर? का मनापासून आवडणारे करियर? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडायला लागले असतील. घरामध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा व्हायला सुरुवात झाली असेल. फार गांगरून जायचे नाहीये आणि खूप निवांत पण राहायचे नाहीये. बघू, किती टक्के पडतात त्यावर ठरवू हा दृष्टिकोन निरोगी नाही आणि झोप उडून जाण्याइतका करिअरचा विचार करणेही घातकच. पण जाणतेपणाने, निवांत असतानाच खाली दिलेल्या टप्प्यांनी पुढे गेलो तर करिअरची वाट सहज सापडते.

 • आपल्या स्वभावातील शक्तिस्थाने, दुर्बल स्थाने यांचा विचार करून (strength and weakness)
 • आपल्याकडे कोणती कौशल्ये आहेत आणि कोणती कौशल्ये आत्मसात करता येतील यांचा अभ्यास करून, (Incuild and acquired skills)
 • आपल्या अवतीभोवती उपलब्ध संधींची माहिती गोळा करणे (Courses, Colleges and universities, लागणारा वेळ व येणारा खर्च), आपल्याला उत्सुकता वाटणार्‍या करिअरमधल्या यशस्वी व्यक्तीशी चर्चा करणे आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष कामकाज बघणे. (Industry exposure)
  नैसर्गिक क्षमता (Aptitude), व्यक्तिमत्त्व (Personality)  आणि बुद्धिमत्ता (Intelligence)
  या तिन्ही संकल्पना आपले पुढचे शिक्षण ठरवताना खूप महत्त्वाच्या आहेत.
  नैसर्गिक क्षमता (Aptitude) म्हणजे आपल्यामध्ये उपजतच असणार्‍या क्षमता आपण कधी लवकर ओळखतो कधी उशिरा. गाता येणे, चांगले चित्र काढता येणे, नृत्य, गणितातली गोडी, स्वयंपाकात गती असणे या आणि अशा काही क्षमता आपण जन्मजात घेऊन आलेलो असतो, काही आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणामुळे निर्माण होतात. या क्षमतांवर काम करून, अधिक शिक्षण मिळवून, तावून-सुलाखून, घासून-पुसून आपण त्यांना कौशल्यांमध्ये (talent) परावर्तित करू शकतो. उदाहणार्थ, चांगले चित्र काढता येणे या गुणाला जर योग्य प्रशिक्षण दिले, तर डिझाईन, आर्किटेक्चर, इंटिरिअर डेकोरेशन अशा कित्येक व्यवसायांचा विचार करता येतो आणि स्वयंपाकात असणार्‍या गतीला जर प्रशिक्षणाची जोड दिली तर खाद्य जगतामध्ये किती तरी संधी मिळवता येतात.
  व्यक्तिमत्त्व (Personality) म्हणजे आपल्या स्वभाव गुणधर्मांमुळे, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपण कसे वागतो आणि जगासमोर कोणती प्रतिमा घेऊन वावरतो. या जगात काहीतरी काम करताना आणि स्वत:चे स्थान निर्माण करताना आपण स्वतः ला ओळखलेले असणे खूप उपयोगी पडते. अर्थात हे इतके सोपे नाही पण तसा प्रयत्न नक्की करत राहायला पाहिजे. 
  मी अंतर्मुखी (introvert) आहे म्हणजे गोंगाटापेक्षा एकांत पसंत करणारा की बहिर्मुखी (extrovert) म्हणजे लोकांमध्ये रमणारा? मी नवीन संकल्पनेला जन्म देणारा आहे (Visionary) की, एखादी संकल्पना मला दिली की ती उत्तमरित्या, समूहात काम करून प्रत्यक्षात उतरवणारा (Missionary)? मला सतत नाविन्याचा ध्यास असतो का मी रुटीनमध्ये राहून ओळखीचे काम करणे पसंत करतो? 
  या आणि अशा प्रश्नांची उत्तरे शोधणे चालू ठेवले पाहिजे. हेही लक्षात असू द्या की व्यक्तिमत्त्व हे सतत घडतच असते. आपल्याला येणारे अनुभव, मिळणारे वातावरण आपल्या व्यक्तिमत्वाला कंगोरे पाडत राहतात. ‘स्व’चा शोध घेतल्याने हे व्यक्तिमत्त्व घडणं अधिक जागरूकपणे आणि सकारात्मक होते. 
  बुद्धिमत्तेबद्दल अनेक वेगवेगळे सिद्धांत मांडले गेले. त्यामधील गार्डनरने दिलेला बहुबुद्धी सिद्धांत (Multiple Intelligence) म्हणतो की नुसते असाधारण बुद्धिमत्ता (above average Intelligence), साधारण बुद्धिमत्ता (average intelligence) आणि अतिसाधारण बुद्धिमत्ता (Below average intelligence) असे बद्धिमत्तेचे तीन गट न पडता, माणसाकडे बहुबुद्धी (Multiple Intelligence) आहे, एका बुद्धिमत्तेचे प्रमाण दुसर्‍यापेक्षा अधिक आहे.

१) भाषिक बुद्धिमत्ता

    (Linguistic Intelligence )

 • ज्यांचा लेखी आणि बोली भाषेतील शब्दसंग्रह प्रचंड आहे.
 • ज्यांना योग्य भाषेचा वापर करून कल्पना आणि माहिती नीट समजावता येते.
 • ज्यांना चांगला संवाद साधता येतो.

व्यवसायाच्या संधी

कॉपीराइटर-एडिटर, इतिहासतज्ज्ञ, पत्रकार, वकील, परकीय भाषा जाणकार- भाषांतर तज्ज्ञ, लेखक - कवी -ब्लॉग लिहिणारा, शिक्षक-प्रोफेसर-YouTuber, टी.व्ही.- रेडिओ निवेदक.

 

२) तार्किक-गणिती बुद्धिमत्ता

   (Logical-Mathematical Intelligence) 

 • समस्यांचे विश्लेषण करता येणे.
 • पॅटर्न शोधता येणे.
 • गणितातील समस्या सोडवता येणे.
 • वैज्ञानिक तर्क आणि कपात.
 • कारण आणि परिणाम यांच्यातील परस्पर संबंध समजणे.

व्यवसायाच्या संधी
विश्लेषक (analysts), बँकर - इन्शुरन्स - ब्रोकर, अकाउंटंट, अर्थतज्ज्ञ, कॉम्प्युटर प्रोग्रामर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, संशोधक.

 

३) स्थानिक बुद्धिमत्ता

   (Special-visual Intelligence)  

 चित्र निर्मिती व व्याख्या करता येणे. चित्रमाध्यमातील कल्पनाशक्ती आणि त्याचे वर्णन करता येणे. चित्रांमधला परस्परसंबंध आणि त्यांचे अर्थ लागणे. 
व्यवसायाच्या संधी : 
आर्किटेक्ट, चित्रकार, व्यंगचित्रकार, अ‍ॅनिमेशन, सिव्हिल इंजिनीअर, इंटिरियर डिझायनर, ग्राफिक डिझायनर, लँडस्केप डिझायनर, छायाचित्रकार (फोटोग्राफर), शिल्पकार.

 

४) सांगीतिक बुद्धिमता

    (Musical Intelligence)

 • आवाजाची (ध्वनी) जाणीव, कदर आणि वापर करण्याची क्षमता.
 • ध्वनींच्या लयी आणि ताल ओळखण्याची क्षमता
 • ध्वनी आणि भावना यांचा परस्परसंबंध समजणे.  

व्यवसायाच्या संधी :
ध्वनिक अभियंता (acoustic engineer), गायक - संगीतकार, डीजे, पर्यावरण आणि आवाज विश्लेषक, संगीत वाद्यतज्ज्ञ, आवाज तज्ज्ञ व शिक्षक (voice coach).

 

५) शारीरिक गणिक बुद्धी

   (Bodily Kinesthetic Intelligence)

 • डोळे आणि शरीर ह्यांमधील तारतम्य चांगले
 • हालचाल निपुणता
 • शारीरिक चपलता

व्यवसायाच्या संधी :
मानववंशशास्त्रज्ञ (anthropologist), खेळाडू, डॉक्टर-सर्जन, नर्तक, बायॉलॉजिस्ट, जिओलॉजिस्ट, परिचारक/परिचारिका, फिजिओ थेरपिस्ट, हातवारे-भाषा दुभाषे (sign-language interpreters).

 

६) आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता
     (Interpersonal Intelligence)

 • दुसर्‍याला समजून घेण्याची क्षमता
 • वागणे आणि संवाद यामागचा अर्थ समजण्याची क्षमता
 • लोकांची नाती आणि त्यांच्या परिस्थितीचा त्रयस्थ असून अचूक अंदाज

व्यवसायाच्या संधी
जाहिरात तज्ज्ञ , सल्लागार, मदतनीस, मानसोपचार तज्ज्ञ व समोपदेशक (Psychologist-Counselor), मानवी संसाधन तज्ज्ञ (Human Resource HR Personal)  राजकीय क्षेत्रात संधी, विपणन - विक्री (Marketing and sales).

 

७) आत्म वैयक्तिक बुद्धी

    (Interpersonal Intelligence)

 • स्वतः बद्दल जागरूक
 • बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता
 • स्वतःच्या आजूबाजूच्यांशी आणि जगाशी असलेल्या संबंधाबद्दल जागरूक

व्यवसायाच्या संधी
मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशक (Psychologist-Counselor), उद्योजक, दार्शनिक (Philosopher), कलाकार, गुन्हेगारीतज्ज्ञ (Criminologist), शास्त्रज्ञ, लेखक.

 

८) प्रकृतिवादी बुद्धिमत्ता

   (Naturalistic Intelligence) 

 • वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र व प्राणीशास्त्र यामध्ये रुची
 • माहितीचे वर्गीकरण व गटांमध्ये विभाजन करता येणे
 • बागकाम, जंगल भ्रमंती, पक्षी-प्राणी निरीक्षण यात   अधिक रुची

व्यवसायाच्या संधी
शेती तज्ज्ञ, जीव शास्त्रज्ञ, वनस्पती शास्त्रज्ञ, बागकाम तज्ज्ञ, फॉरेस्ट ऑफिसर, पर्यटन, शेती पर्यटन.

 

 अशी आशा आहे की ही सर्व माहिती तुम्हाला; पुढील शिक्षणाची शाखा कोणती निवडावी, माझे व्यक्तिमत्व कोणत्या करिअरसाठी योग्य आहे आणि कोणतं करिअर माझ्या व्यक्तिमत्वासाठी योग्य आहे, कोणता व्यवसाय/उद्योग करताना मला मजा येईल. या आणि अशा प्रश्नांची उत्तरे शोधायला नक्कीच मदत करेल. तुम्ही सर्वजण उद्याचे सुजाण भारतीय आहात, सर्व पर्याय पडताळून पाहा, योग्य निवड करा, तुमचे १०० % परिश्रम द्या, तसेच हेही लक्षात असू द्या की प्लॅन ’A’ फसला तर इंग्रजी वर्णमालेमध्ये अजून २५ मुळाक्षरे आहेत.

 • अपर्णा दीक्षित