आजच्या जगात ‘करिअर’ हा परवणीचा शब्द झाला आहे. शिशुविहार ते वृद्धाश्रम सर्वत्र हा शब्द ऐकू येतो. पण प्रश्न पडतो की आपल्या सर्वांना करिअर या शब्दातून नेमका काय अर्थ अभिप्रेत आहे? यशस्वी म्हणजे काय? 
अनेकदा करिअर आणि यशस्वी या शब्दांचा अर्थ ‘लठ्ठ पगाराची नोकरी’ असा घेतला जातो आणि ती मिळविण्यासाठी चालू होते एक आंधळी शर्यत!
पालक-शिक्षक दोघे मुलांना पळविण्याचा प्रयत्न करत राहतात. त्यासाठी भावनिक दबाव आणले जातात. आमिष दाखविली जातात. मुले पळत राहतात. अनेकदा दिशाहीन. ज्यांची गती कमी पडते त्यांची फरपट होते. शिकण्यातली गमंत जाते आणि शिक्षणाच्या प्रवासाची ‘शर्यत’ होऊन जाते. आयुष्यातील या शिकण्याच्या सुंदर प्रवासाचा हेतू इतरांना मागे टाकणे असा असू शकत नाही.
आजच्या जगात जीवनावश्यक गोष्टींसाठी पैसा आवश्यक आहे हे सत्य आहे; पण त्यासाठी शिकण्यातली, जगण्यातली गंमतच निघून जाणार असेल तर त्याचा उपयोग नाही.
वर्गात सर्वाधिक मार्क पडणार्‍याचीच करिअर होतात आणि कमी मार्क पडणार्‍यांचे पुढे करिअर होत नाही? खरंच हे वाक्य सत्य आहे? सचिन तेंडूलकर हा क्रिकेटचा देव झाला. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झाला ते त्याच्या आवडत्या क्षेत्रात मेहनत घेतल्याने. कदाचित आवडते क्षेत्र असल्यामुळेच मेहनत घेतली गेली असेल. त्याच्या पालकांनी त्याला बळजबरीने डॉक्टर-इंजिनिअर करण्याचा प्रयत्न केला असता तर...
गानकोकिळा लतादीदींकडेही असंच उदाहरण म्हणून पाहता येईल. अगदी शिक्षणात कच्चा आहे; म्हणून शाळेतून काढून टाकलेल्या जगविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईनचंसुद्धा!
शेतकरी, लेखक, कवी, व्यावसायिक, गायक, चित्रकार आणि खेळाडू हेही त्यांच्या ‘करिअर’मध्ये यशस्वी असतात. यशाची व्याख्या करताना त्यात ‘जीवनात आनंदी’ ही महत्त्वाची संज्ञा आहे.
पालक म्हणून आपण मुलांना संधी उपलब्ध करून देणे, शिक्षक म्हणून त्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी दिशादर्शन करणे, भावंड म्हणून भावनिक आधार देणे, मित्र म्हणून प्रोत्साहन देणे हे आपले कर्तव्य आहे. असे झाल्यास मुलांवर शिकण्याचा ताण येणार नाही आणि शिक्षणातली गंमत हरवणार नाही. 
आज बहुतांश पालक जागृत होतो आहे. मोठ्या शाळाही जाहिरात करताना शाळेतील छंदवर्गांचा प्रामुख्याने उल्लेख करतात. त्यावर विशेष मेहनत घेतात. 
मुलांनीदेखील सर्व खेळा-कलांमध्ये सहभागी व्हावे. त्यांचा आनंद घ्यावा. न जाणो आपले आवडते क्षेत्र आपणास कुठे गवसेल आणि हरल्यानंतर नव्याने डाव मांडायचा हे तत्त्वज्ञान खेळच तर आपल्याला शिकवते.
करिअर निवडताना, आपण जे काही निवडू ते आयुष्यभर आपणास आनंद देईल का? याचा जरूर विचार करावा आणि एकदा ध्येय ठरले की मेहनतीने मार्गक्रमण करावे. एक लक्षात ठेवा कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी, एक व्यक्ती, एक माणूस म्हणून विकसित होणे आवश्यक आहे.
- अमित पावशे