भेळ पार्टी

दिंनाक: 29 May 2019 18:15:58


 
शाळा हे संस्कारांचे मुख्य केंद्र आहे, असं आपण म्हणतो खरं; पण याची प्रचिती येण्यासाठी काही प्रसंगही घडावे लागतात. असे प्रसंग घडले की आपल्या शाळेतील दैनंदिन अध्ययन, आयोजित केलेले कार्यक्रम, उपक्रम हे सर्व निश्चित दिशेने पुढे चालले आहे, याची खात्री पटते.
शाळेचा पहिला दिवस सर्वांच्या लक्षात असतो. शाळा सुरू झाली की, मराठी विषयाचे शिक्षकही ‘शाळेचा पहिला दिवस’ या विषयावर निबंध लिहायला सांगतात. आता तुम्हीच पाहा... फाल्गुन महिना संपत आला आहे. थोड्याच दिवसात गुढीपाडव्याचा सण आपण साजरा करू. वर्षाचा पहिला दिवस... पण गुढीपाडव्याचा आदला दिवस वर्षाचा शेवटचा दिवस असतो. आपण वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून त्याला फारसं महत्त्व देत नाही. लगेचच पाठोपाठ येणार्‍या पहिल्या दिवसाची आपल्याला आतुरता असते. अगदी तसंच शाळेचा पहिला दिवस आपल्या कायम लक्षात राहतो; पण शेवटचा दिवस (त्या शैक्षणिक वर्षापुरता) आपल्या खिजगणतीतही नसतो. असं का होतं... कारण लगेचच दुसर्‍या दिवशी वार्षिक परीक्षा सुरू होणार असते. आमच्या शाळेतील आठवी ‘ब’ या वर्गातील विद्यार्थ्यांनी मात्र हा दिवस अविस्मरणीय केला. 
सोमवारपासून वार्षिक परीक्षा सुरू होणार म्हणून आदल्या शनिवारी शेवटच्या तासिकेला विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक वर्षाचा समारोप करायचे ठरवले. विद्यार्थ्यांनी ‘भेळ पार्टी’ करण्याचा बेत आखला. ठरलं असं की प्रत्येकाने मुरमुरे, फरसाण, चिरलेला कांदा, कोथिंबीर, टोमॅटो घरून घेऊन यायचे. 
शनिवारी शेवटच्या तासिकेला वर्गशिक्षक झोडगे सर वर्गात गेले. सर्व विद्यार्थ्यांनी आणलेले साहित्य त्यांनी गोळा केले. मी विषय शिक्षक असल्याने या भेळ पार्टीचे मलाही निमंत्रण होते. सर्वांसाठी मी स्वतः बनविलेले चिंचेचे पाणी घेऊन येणार, असं आधीच सांगून ठेवले होते. झोडगे सरांनी स्वतः बनविलेले गुलाबजाम मोठ्या डब्यात आणले होतेच.
वर्गातील काही हौशी विद्यार्थ्यांनी मोठमोठ्या भांड्यांत भेळ बनवायला सुरुवात केली. वेगवेगळ्या प्रकारचे मुरमुरे आणि फरसाण यामुळे भेळेला मस्त चव आली होती. सर्व विद्यार्थ्यांनी या भेळेवर यथेच्छ ताव मारला. सर्वांनीच आपल्यासाठीच भेळ बनवायची आहे तर आपल्या पुरते साहित्य नेऊ असा संकुचित विचार न करता आपल्याबरोबर मित्रालाही पोटभर खायला मिळेल इतके साहित्य आणल्याने भेळ पोटभर तयार झाली होती.
भेळ खाता खाता सहजच मी म्हणालो, “या वर्षी ज्या विशेष गोष्टी शिकायला मिळाल्या त्या आठवून पाहा बरं.” असं म्हणताच एकजण उभा राहिला आणि म्हणाला, “मला या वर्षी गणित विषय आवडीचा वाटू लागला. तो पूर्वी मला आवडत नसे. झोडगे सरांनी दर महिन्याला आमच्याकडून गणिताच्या कार्डातील सगळ्या कृती करून घेतल्यामुळे माझी गणित विषयाबद्दलची भीती कुठच्या कुठे पळून गेली.” दुसरा विद्यार्थी राज जोशी म्हणाला, “मी याच वर्षी शाळेत प्रवेश घेतला. या शाळेत आल्यावर मला एका गोष्टीचं अप्रूप वाटलं. ती गोष्ट म्हणजे, या शाळेत विविध विषयांची मंडळं आहेत. मला पूर्वी फक्त गणपती मंडळं माहीत होती. विषयांचीही मंडळं असतात, हे मला या शाळेत आल्यावर समजले. मी गणित मंडळ, इतिहास मंडळ, भूगोल मंडळ या मंडळांमध्ये सहभागी झालो. वर्षभर या मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमांमुळे, तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या व्याख्यानांमुळे या विषयांतील आश्चर्यचकित करायला लावणारी माहिती मला मिळाली. याशिवाय सर्जन मंडळामुळे पुण्यातील नामवंत चित्रकारांना भेटता आले. कलाकारांशी गप्पा मारता आल्या. मनातल्या शंकांचे निरसन करता आले. वाङ्मय मंडळात आणि वक्तृत्व मंडळात सहभागी झाल्यामुळे मी लेखन करू लागलो, आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होऊ लागलो. मला बक्षिसे मिळाली. आत्मविश्वास वाढला. माझ्या दृष्टीने हे शैक्षणिक वर्ष खूप आनंददायी अनुभव देणारे ठरले.”
 दुवेदी आडनाव असणारा विद्यार्थी म्हणाला, “आमचे वर्गशिक्षक हे मला वर्षभर तार्‍यासारखे वाटले. आम्ही सगळे ग्रह होतो. सतत त्यांच्याभोवती फिरून आम्ही त्यांच्याकडून ज्ञानाचा प्रकाश शोषून घेतला. आपल्या शाळेतील ओरिगामी मंडळामुळे मी उत्तमोत्तम कलाकृती निर्माण करू शकतो, हा आत्मविश्वास वाढला. माझ्या प्रत्येक कामात टापटीपपणा आला.”
मागच्या बाकावर बसणारा विद्यार्थी प्रसाद शेवटी उभा राहिला आणि म्हणाला की, “मी वर्षभर वर्गशिक्षकांच्या सूचनांचे तंतोतंत पालन केले नाही. मी कधीकधी मारामारी केली. मित्रांना वाईट वाईट बोललो; पण पुढच्या वर्षी मात्र मी नक्की सुधारणा करणार. आज शेवटचा दिवस... मला वाईट वाटतं की हे सर्व मित्र पुढच्या वर्षी माझ्या वर्गात असतीलच असे सांगता येऊ शकत नाही. वर्षभर वर्गशिक्षक सांगत असूनही हवा तेवढा अभ्यास न केल्याने कदाचित मी या वर्गात नसेल. माझी तुकडी बदलेल. आज शेवटच्या तासिकेला मला या सगळ्या गोष्टी आठवून माझाच मला राग येतोय.” सगळे विद्यार्थी प्रसादचे बोलणे ऐकत होते.
या शेवटच्या दिवशी शेवटच्या तासिकेला शाळेने वर्षभर केलेल्या चांगल्या कर्माची पोचपावतीच मिळाली.
आता तुम्हीच सांगा, असा अनौपचारिक भेळ पार्टीचा कार्यक्रम झाला नसता तर विद्यार्थ्यांच्या मनातील भावना आम्हा शिक्षकांपर्यंत पोहोचल्याच नसत्या. काही ठरावीक विद्यार्थी पुढे येऊन नेहमीच आपलं मनोगत व्यक्त करतात, पण जेव्हा वर्गशिक्षक झोडगे सर म्हणाले की, “जे नेहमीच बोलतात त्यांनी न बोलता जो विद्यार्थी आतापर्यंत कधीच पुढे आला नाही त्याने आपले अनुभव सांगण्यासाठी पुढे यावे.” तेव्हा प्रसाद बोलता झाला. असे अनेक प्रसाद मागच्या बाकावर बसलेले असतात. त्यांची मनेही संस्कारित होत असतात. पण यासाठी वर्गांवर्गांमध्ये मागे बसणार्‍या, पुढे बसलेल्या विद्यार्थ्यांच्यामागे लपणार्‍या प्रसादसारख्या विद्यार्थ्यांना बोलायची संधी मिळाली पाहिजे.
 
- विकास पढेर, सहशिक्षक
न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड