मुलींच्या वाढीतला महत्त्वाचा टप्पा, तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घडामोड म्हणजे दर महिन्याची पाळी. त्या वेळी शरीरात घडणारे बदल, होणारे नुकसान (रक्तस्रावामुळे) व ते भरून काढण्यासाठी आवश्यक असलेला योग्य आहार या गोष्टी समजून घेणेही महत्त्वाचे आहे. एकूणच मासिक चक्र नियमित व योग्य प्रमाणात चालू राहाणे, आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. पाळीविषयी सर्वच शास्त्रीय माहिती प्रत्येक मुलीला असणे फार गरजेचे आहे. पण, या लेखात त्यापैकी एका महत्त्वाच्या गोष्टीची माहिती घेऊ या, ती म्हणजे पाळीसाठी पाळायची स्वच्छता व वापरात असलेली साधने.

पाळी दर महा येणार एवढी एकच गोष्ट समान असते. पण, ती किती दिवस येणार, किती प्रमाणात, होणारा त्रास, पाळावे लागणारे नियम, उपलब्ध असणारी साधने, असणार्‍या सोयी हे प्रत्येकीचे निराळे असू शकते. पण त्यातही एक गोष्ट नक्कीच समान आहे, ती म्हणजे त्या दिवसांत नेहमीपेक्षा अधिक स्वच्छता पाळणे फार गरजेचे आहे. त्या काळात होणारा रक्तस्राव नीटपणे शोषला जाणे व त्यासाठी वापरले जाणारे साधन स्वच्छ असणे हे महत्त्वाचं आहे. काही ठिकाणी पॅडसारखे तयार व तुलनेने महाग साधन उपलब्ध होणे व परवडणे कदाचित शक्य नसेल, तरीही किमान स्वच्छ कापड वापरणे, हे तरी करायलाच हवे. अनेक घरांत आजही महिला कापडाचा वापर करतात. जर काही नियम पाळले, तर ही जुनी पद्धतदेखील अवलंबायला हरकत नाही.

सर्वात महत्त्वाचे, एकाच घरात दोन-तीन जणी पाळी येणार्‍या असल्या, तरीही प्रत्येकीने वापरायचे कापड स्वतंत्रच असले पाहिजे. ते वापरल्यानंतर शक्यतो एकेरी पसरून, उन्हात हवेशीर जागी वाळवले पाहिजे. ते सुती व मऊ असावे. टर्किश टॉवेल वा नॅपकिनसारखे; ज्याची सुते वर आलेली असतात. तसे असू नये. कारण त्यात अडकलेला स्राव पूर्णपणे निघेलच असे नाही .कपडा शिवून वापरण्यापेक्षा एकेरी कपडा घड्या घालून वापरावा, म्हणजे त्यात आतले भाग ओले राहाणे वा आत रक्त वा गाठी अडकून राहाणे हे होत नाही. असे झाले, तर जंतुसंसर्ग होऊ शकतो; म्हणून कापड स्वच्छ धुणे, खडखडीत वाळवणे व तीन चार महिने झाले की दुसरे कापड घेणे आवश्यक आहे.

हल्ली मेडिकल दुकानात एमसीचे कापड या नावाने लाल रंगाचे मऊ फ्लॅनेलचे तयार तुकडे मिळतात. ते फार महाग नाहीत. ते आणून वापरता येतात. त्यांचीही स्वच्छता तशीच पाळावी. वापरून खराब झालेले कापड अन्य कोणत्याही कामाला वापरू नये व ते लगेच जाळून टाकावे, म्हणजे त्याच्यामुळे अन्यत्र जंतुसंसर्ग होणार नाही. अन्यथा ते कचर्‍यात टाकले, तर कुत्री-मांजरे ते बाहेर काढतात, कधी पाण्याच्या स्रोतात त्यातील जंतू मिसळू शकतात.

यानंतरचे साधन म्हणजे विकत मिळणारे सॅनिटरी पॅड. हल्ली विविध कंपन्यांची विविध मापे व कमी अधिक स्रावासाठी वेगवेगळ्या क्षमता असलेली पॅड्स उपलब्ध आहेत. परंतु, ती निवडताना आपली गरज व आर्थिक क्षमता लक्षात घेऊनच निवडावीत. जाहिरात वा ब्रॅण्ड याकडे लक्ष देण्याचे कारण नाही. पॅड वापरले, म्हणजे सगळे प्रश्न सुटतात असे मुळीच नाही. पॅड वापरतानाही स्वच्छतेचे भान ठेवले पाहिजे. अनेकदा आपल्याला वरवर ओलावा जाणवत नसल्यामुळे दीर्घकाळ तेच पॅड वापरले जाते. तसे केल्याने त्याजागेला जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. रॅश येऊ शकते. त्यामुळे कोरडे आहे असे वाटत असले, तरीही दर चार-पाच तासांनी पॅड बदललेच पाहिजे. शिवाय अनेकदा आपले अंतर्वस्त्रही घट्ट असते. त्यावरून जर जीन्ससारखे टाईट बसणारे कपडे असतील, तर त्या जागेची एकूणच योनीमार्गातील उष्णता खूप वाढते जी हानिकारक आहे. अनेक गंभीर समस्या यातून उद्भवू शकतात. हल्ली वाढत चाललेल्या गर्भाशय व गर्भधारणेच्या समस्यांमागे हेही एक कारण आहे का, याचा अभ्यास चालू आहे. त्यामुळे बाहेर जाताना पॅड व घरी असताना साधे सुती कापड व सैलसर कपडे असाही मध्य काढता येतो. वापरलेल्या पॅड्सची विल्हेवाट ही एक स्वतंत्र समस्या आहे. पहिली गोष्ट म्हणजे, कोणत्याही परिस्थितीत वापरलेले पॅड तसेच कुठेतरी टाकून देऊ नये. आपले आरोग्य म्हणजेच सर्व समाजाचे आरोग्य. आपल्या अस्वच्छतेने इतरांना त्रास होऊ शकतो व तसाच आपल्याही वाट्याला येऊ शकतो. त्यामुळे स्वच्छतेचे भान ठेवलेच पाहिजे.

वापरलेले पॅड टाकण्यासाठी पिशवी पुरवणे खरेतर कंपन्यांना बंधनकारक आहे. ते नसले, तरी आपण लहान पिशवीत वा किमान कागदात घट्ट गुंडाळून टाकावे .आपल्या परिसरात कचरा गोळा होताना तो ओला, सुका, वैद्यकीय असा वेगवेगळा गोळा होत असेल, तर ते नियम पाळावेत. पण कचरा वेचणारीही माणसेच आहेत. आपल्या वयाच्या काही मुलामुलींनाही परिस्थतीमुळे हे काम करावे लागते. उघडे गलिच्छ पॅड वा कापड उचलताना त्यांना येणारी किळस व त्यांच्या आरोग्याला असणारा धोका याचे भान वापर करणार्‍या व्यक्तीने बाळगलेच पाहिजे. अशी टाकलेली पॅडसदेखील पर्यावरणाला धोकादायकच असतात. अजूनही त्यांच्या संपूर्ण विल्हेवाटीचा उपाय कोणालाही सापडलेला नाही. आपण ती नीट गुंडाळून स्वतंत्रपणे कचर्‍यात टाकणे एवढे निदान करू शकतो. सध्या काही प्रमाणात पर्यावरणपूरक जैविक पॅडस व ती जाळण्यासाठी मशीन उपलब्ध आहेत. त्यांचा वापर जरूर करावा. तरुण मुले-मुली, विद्यार्थी यांना संशोधनाला वाव असलेली ही समस्या आहे. यावर पर्यावरण व आरोग्य दोन्ही साधेल, असा काही कल्पक मार्ग निघू शकतो का यावर शाळाशाळांत, गटात चर्चा, स्पर्धा अवश्य घ्याव्यात. याही पुढे जाऊन ‘शी कप’ नावाचे एक लहान आकाराच्या दुमडल्या जाणार्‍या कपसारखे साधन आता प्रचलित होऊ पाहाते आहे. जैविक कप शरीराच्या आत पाळीच्या मार्गात बसवता येतो व तो भरल्यानंतर रिकामा करून धुऊन परत बसवता येतो. दीर्घकाळ एकच कप वापरता येत असल्याने आर्थिकदृष्ट्या व पर्यावरणदृष्ट्याही तो चांगला पर्याय आहे. परंतु, तो अजून तरी फार प्रचलित नाही. त्यामुळे साधन कोणतेही असले, तरी ते वैयक्तिक व सामाजिक स्वच्छतेचे नियम पाळूनच वापरले गेले पाहिजे. या बाबतीत आळस, काटकसर, कालबाह्य झालेल्या रूढी, अंधश्रद्धा यात नव्या पिढीने न अडकता, आपण नीट माहिती करुन घेऊन ती आपल्या मागील पिढीला वा आजूबाजूच्या अज्ञानी महिलांपर्यंत पोहोचवायला हवी!

पाळीवेळी वापरायचे साधन हा आरोग्यदृष्ट्या महत्त्वाचा मुद्दा आहे, फॅशन वा प्रतिष्ठेचा नाही, हे लक्षात ठेवावे व निवड करावी हे योग्य!

- विनिता तेलंग