गार्गी शाळेतून घरी आली ती तणतणतच! आज शाळेत सातवी विरुद्ध आठवी खो-खोची मॅच होती. गार्गी सातवीची कॅप्टन होती. तिच्या संघातील नेहा ही पट्टीची खेळाडू, पण आज ती खेळणार नव्हती. का? तर म्हणे तिची पाळी सुरू झाली होती आणि तिच्या आईने तिला खेळू नको सांगितलं होतं. पाळी म्हणजे काय, हे गार्गीच्या आईने तिला खूप छान समजावून सांगितलं होतं. परंतु अजून तिला स्वतःला तो अनुभव नव्हता. टी.व्ही.वर तिने सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिरातीतील मुली खेळताना, सायकल चालवताना बघितल्या होत्या. पण तिला हे माहीत नव्हतं की, नेहाला पाळीच्या सुरुवातीचे दोन दिवस पोटदुखी व कंबरदुखीचा खूप त्रास व्हायचा. गार्गी आणि नेहा एकाच वयाच्या, पण पाळीच्या वेळी प्रत्येकीला होणारा त्रास वेगवेगळा असू शकतो, हे नेहाला पटत नव्हतं.

सई एका वनवासी पाड्यावर राहाते. ती शहरातून तिथे गेलेली. तिची पाड्यावरची मैत्रीण दुर्गा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत जाते. दोघीही बारा-तेरा वर्षांच्या. दोघी मिळून जवळच्या विहिरीवर पाणी भरायला जात. छोट्या कळशा घेऊन दोन फेर्‍या रोजच्या व्हायच्या. दुर्गाचं घरं विहिरीच्या वाटेवर. आज सई दुर्गाकडे गेली, तर दुर्गा घराच्या कोपर्‍यात बसलेली. दुर्गाची आई म्हणाली की, दुर्गा आता चार दिवस पाणी भरायला येणार नाही. पाळीचे चार दिवस दुर्गाला पाणी, स्वयंपाक, शाळा सगळ्याला सुट्टी होती. शेतातील कामांना मात्र ती जात असे.

नववीचा वर्ग सुरू होता. गणिताचा जाधव सरांचा तास होता. अत्यंत कडक अशी त्यांची ख्याती असल्याने वर्ग त्यांना बिचकूनच असायचा. सर वर्गात आले, गृहपाठाच्या वह्या पाहू लागले. तपासता तपासता वृंदाच्या बाकाजवळ आले आणि तिने रडायलाच सुरुवात केली. तिने गृहपाठ केला नाही हे उघड होतं. आता वृंदाचं काही खरं नव्हतं. तिच्या शेजारी बसलेल्या मानसीने हळूहळू आवाजात सरांना काहीतरी सांगितलं आणि सर वृंदाला काहीही शिक्षा न करता केदारच्या बाकाजवळ आले. केदारचा अभ्यास आजही पूर्ण नव्हता. त्याला शिक्षा झालीच. तासाला सर काय शिकवत आहेत. याकडे त्याचं लक्षचं नव्हतं, रागाने तो धुमसत होता. ज्या कारणासाठी त्याला शिक्षा झाली त्यातून वृंदा सहिसलामत सुटली. का? तर म्हणे, तिला पाळीचा खूपच त्रास होतो. हे कारण त्याला स्वप्निलकडून कळलं. या स्वप्निलला भारी मुलींचा पुळका. म्हणूनच, अख्खा वर्ग त्याला दादा म्हणतो.

अशा नेहा, दुर्गा, वृंदा आणि स्वप्निल, केदार कदाचित तुमच्याही पाहण्यात असतील. मासिक पाळी हा या सर्व उदहरणांमधील समान धागा, पण प्रत्येक उदाहरणामधील पाळीचं रूप वेगळं आणि त्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोनही वेगळा. गार्गी आणि केदारला मासिक पाळी सुरू असताना काही मुलींना काही काळ शारीरिक त्रास होऊ शकतो; याची माहितीच नाही, तर दुर्गावर पाळी यायला लागल्यापासून अनावश्यक बंधने आहेत.

पाळीच्या मागचं विज्ञान आपल्याला सांगतं की, ही बाळाच्या आगमनाची तयारी असते. झाडाला फळ येण्यापूर्वी फूल येतं. प्रत्येक फुलाचं मात्र फळात रूपांतर होतंच असं नाही. फूल वाट बघतं परागीभवन होण्याची; कीटक, वारा, पाणी यांद्वारे परागकण पसरवले जाण्याची. पण, हे नेहमीच होईल असं नाही. मग काय होतं, दुसर्‍या दिवशी फूल गळून पडतं. म्हणजे, ही झाडाला आलेली पाळीच की, पण फुलाला कोणी त्यासाठी कमी लेखत नाही. मासिक पाळीकडे मात्र इतक्या सहजतेने, मोकळेपणाने पाहिलं जात नाही. स्त्री ही नवीन पिढीची निर्माती आहे. त्यामुळे तिच्या लैंगिक आरोग्याची काळजी घेणे, ही संपूर्ण समाजाची म्हणजे ती सोडून इतर सर्व सामाजिक घटकांची जबाबदारी नाही का? पण म्हणजे इतरांनी काय करायचं?

मुलींच्या घरातील वातावरण, तिच्या आजूबाजूचा समाज तिची मानसिकता घडवत असतो. पाळीच्या दिवसांत बाजूला बसणे, देवळात जायला बंदी, पाळी यायला लागली म्हणजे तू मोठी झालीस म्हणून खेळणे, फिरणे, उशिरापर्यंत बाहेर राहाणे, मुलांशी बोलणे यांवर घरच्यांनी घातलेली बंधने यांमुळे अनेक मुलींना पाळी म्हणजे नको ती कटकट, स्वातंत्र्यावर मर्यादा असे वाटते. याविरुद्ध बंडखोरीची भावना बळावू लागते. तर काही मुलींना ही टाळण्याची, लपवण्याची गोष्ट वाटते. पाळीच्या काळात जर त्या नॅपकिन ऐवजी कपडा वापरत असतील; तर तो नीट धुणे, उन्हात  वाळवणे, आरोग्यासाठी खूप आवश्यक असते. पण, काही मुली संकोचापायी तो कपडा इतर कपड्यांखाली वाळत घालतात. त्यामुळे गर्भाशय मुखाला जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. काही मुलींमधे भीतीची भावना रुजायला लागते, असं व्हायला नको असेल; तर पाळीमागील विज्ञानाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचे आहे. 

मुलींच्या पालकांनी विषेशतः आईने पाळी ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे, हे स्वीकारले पाहिजे. पण, ती तर आहे तुमच्या आधीच्या पिढीची. त्यामुळे तिला ही माहिती पटवून देणं ही तुमचीच जबाबदारी आहे. जर मुलींना पाळीच्या काळात इतर काही त्रास होत नसेल, तर त्या शारीरिक कष्टाची कामंही करू शकतात.

काही मुली व महिलांना या काळात पोटात, कंबरेत वेदना जाणवतात. कारण गर्भाशयाच्या अस्तराचे तुकडे होऊन ते पाळीच्या वेळी शरीराबाहेर टाकले जातात, त्यासाठी गर्भाशयाच्या स्नायूंचे आकुंचन, शिथिलीकरण होत राहाते. त्यामुळे ओटीपोटात तीव्र वेदना होतात. अशा वेळी त्यांना आरामाची, विश्रांतीची आवश्यकता असते, हे समजून घेऊन मुलांनी आपली आई, बहीण, वर्गमैत्रीण यांना आवश्यक तो मदतीचा हात पुढे करायला हवा. आम्ही वयात येणार्‍या मुला-मुलींसाठी जे आत्मभान शिबीर घेतो, त्यात पाळीचे विज्ञान त्यांना समजावून सांगतो. ते ऐकलेल्या मुला-मुलींच्या नंतर अशा प्रतिक्रिया येतात की, आता आईचे किंवा मोठ्या ताईचे महिन्याचे हे दिवस त्यांनी न सांगताही आमच्या लक्षात येतात व आम्ही त्यांना आपणहूनच मदत करतो.

मासिक पाळीसंबंधित आरोग्य हा प्रत्येक वयात आलेल्या मुलींचा मुलभूत अधिकार आहे. या दिवसांत तिला स्वच्छ, आरामदायी सॅनिटरी नॅपकिन मिळायला हवे, गरजेनुसार ते बदलण्यासाठी बंदिस्त, सुरक्षित जागा असायला हवी; तसेच वापरून झालेल्या सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्याची किंवा स्वच्छतेची व्यवस्था असायला हवी. या सर्व गोष्टी तिला पुरवणे ही घराची व समाजाची जबाबदारी आहे. या विषयाबद्दलची जनजागृती व्हावी; म्हणून जगभर २८ मे हा दिवस, ‘मेन्स्ट्रुअल हेल्थ डे’ म्हणून पाळला जातो. हा लेख वाचणारी मुले, मुली वर्षाचे ३६५ दिवस मासिक पाळी विषयात आपल्याला कळलेली माहिती इतरांना देत राहिली तरी असा केवळ एक दिवस साजरा करण्याची आवश्यकताच राहणार नाही.

- शोभना भिडे