साहित्य

जाड पांढरा कागद ( शक्यतो गुळगुळीत ), वेगवेगळ्या प्रकारची पाने, फेव्हिकॉल, वॉटर कलर, पोस्टर कलर, भेंडी, सिमला मिरची, कारले वगैरे.

आता तुम्हाला भाज्यांचे ठसे कसे करायचे ते माहित आहे. त्याचाच उपयोग करून भेटकार्ड बनवायची आहेत.

पाने, भेंडी, वापरून केलेल्या चित्राचा नमुना इथे दिला आहे. हे कार्ड बनवायला सोपे असते व चटकन होते.

आता फेव्हिकॉल वापरून भेटकार्ड कशी करता येतील ते पाहू.

भेटकार्ड बनविण्यासाठी योग्य आकाराचा कार्डशीटचा तुकडा घ्या. त्यावर फेव्हिकॉलचा एक थेंब (साधारण रुपयाच्या नाण्याएवढा) घ्या. ब्रशच्या मागच्या बाजूने त्या थेंबातून सूर्यकिरणासारख्या रेषा काढा.

कार्डशीटवर असे २-३ थेंब वेगवेगळ्या रंगाने टाकून त्यामधून वर सांगितल्याप्रमाणे रेषा काढून घ्या. फेव्हिकॉल पूर्णपणे वळल्यावर पोस्टर कलरने रंगवा. या प्रकारे फेव्हिकॉलच्या थेंबातून वेगळी नाक्षीशी करता येते.

तसेच कार्डावर आधी पेन्सिलने हलक्या हाताने पानाफुलासारखी लहानशी नक्षी काढून घ्या. त्या रेषांवर फेव्हिकॉलचे लहान लहान थेंब टाका. आता फेव्हिकॉलच्या टिंबांचे चित्र तयार होईल. मग ब्रशच्या मागच्या बाजूने फेव्हिकॉलचे टिंब जोडा. फेव्हिकॉल पूर्णपणे वळल्यावर पोस्टर कलरने रंगवा. चित्राच्या शेजारी चौकट काढा. छान भेटकार्ड तयार होईल.

समुद्रकिनाऱ्यावरील वाळू वापरूनही आपण कार्ड बनवू शकतो. चित्रावर ब्रशने फेव्हिकॉल लावा आणि त्यावर बारीक वाळू टाका. कार्ड उचलून हलक्या हाताने झटकून घ्या. ज्या भागात फेव्हिकॉल लावलेले आहे, तेवढ्याच भागावर वाळू चिकटलेली असेल.

बघा, सर्वांपेक्षा वेगळे असे तुमचे भेटकार्ड तयार झाले.

या कामासाठी गडद निळा, हिरवा, चॉकलेटी अशा रंगांचा जाडसर कागद वापरला तरी चालतो.

- मेधा सुदूंंबरेकर.