साहित्य : 

१) वापरलेली/ खराब झालेली प्लास्टिक बाटली/ डबा
२) कटर
३) माती, बिया/ छोटे रोपटे
४) प्लास्टिकला भोक पडण्यासाठी कर्कटक
प्रकार - १
१) एका प्लास्टिक बाटलीचे २ भाग करा. फोटोमध्ये १ लीटर पिण्याची बाटली वापरली आहे. वरच्या भागामध्ये असलेल्या टोपणाला कर्कटकच्या साहाय्याने काही भोक पाडा. (फोटो १-२)
२) खालच्या भागामध्ये पाणी भरा व वरचा भाग त्यात उलटे ठेवून त्यात हवी तेवढी माती भरा व बिया/रोपटे लावा. मातीच्या थराआधी विटांचे बारीक तुकडे वापरल्यास माती पाण्याच्या भागात जाण्याची शक्यता कमी आहे. (फोटो ३-४)
प्रकार २ 
१) २ प्लास्टिकचे डबे घ्या. एका डब्याला खालील बाजूस काही भोक पाडा. कापसाचे सूत/सुतळी याचे डब्याच्या आकारापेक्षा थोडे मोठे तुकडे करा व केलेल्या भोकातून हे तुकडे घाला. डब्याच्या दोन्ही बाजूंस तुकड्यांचा काही भाग राहिला पाहिजे. याच भागात माती भरा व बिया/ रोपटे लावा. (फोटो ५-६)
२) दुसर्‍या डब्यामध्ये पाणी भरा व वरील डबा त्यावर सुलटे ठेवून बाहेर आलेले सूत पाण्यामध्ये बुडवा. (फोटो ७-८)
सूचना -
• माती; रोपट्यांना हवे तेवढेच पाणी शोषून घेते. त्यामुळे खालील भागातील पाणी कमी झाल्यावरच त्यात पाणी भरावे लागते. रोज वरून मातीमध्ये पाणी घालण्याची गरज नाही व खालील भागास भोक नसल्यामुळे पाणी बाहेर झिरपत नाही. त्यामुळे हवे असल्यास खालील भागास दोरी बांधून ही कुंडी वर लटकवू शकता.
• प्रकार १ मध्ये प्रकार २ पेक्षा जास्ती प्रमाणामध्ये पाणी शोषले जाते. पण प्रकार २ मध्ये सुतळी/सूताचे विघटन झाल्यास पुन्हा बदलावे लागते. प्रकार १ मध्ये पाण्याची पातळी वरील भागाच्या भोकांना लागून असली तरच पाणी शोषले जाईल. प्रकार २ मध्ये सुतळी पाण्यात असेपर्यंत पाणी शोषले जाईल.
• तुम्ही केलेल्या प्रकारानुसार व वापरलेल्या बाटलीच्या/ डब्याच्या वरील भागाच्या आकाराप्रमाणेच रोपटे निवडा.

- संपदा कुलकर्णी