ओवी आजीजवळ अभ्यासाला बसली होती खरी. पण तिचं चित्त काही थार्‍यावर नाही, हे आजीच्या अनुभवी नजरेनं केव्हाच हेरलं होतं. वहीची पानं उलटली जात होती, पण नजर स्थिर नव्हती. शेवटी न राहवून आजीने विचारलंच, “अगं ओवी, तुझा शेवटचा पेपर ना उद्या, मग लक्ष देऊन अभ्यास कर.” ओवीने पुस्तकं, वही बाजूला सरकवली आणि गप्पा मारायचाच पवित्रा घेतला. “अगं, लक्षच लागत नाहीये अभ्यासात. कधी एकदाचा उद्याचा पेपर संपतोय आणि कधी लोळत टीव्ही बघतेय असं झालंय मला.” ओवी स्वप्नात असल्यासारखी बडबडायला लागली. आजी म्हणाली, “वा! वा! काय तर म्हणे लोळत पडणार. अगं, जरा हत्तीकडून शीक काहीतरी. तुला आवडतो नं तो.”
सत्त्वेषु गरुतर: कलाष्वपि निपूण:।
शक्तिमान बुद्धिमान आचरणीय: गज:॥
“हत्ती कसा सर्व प्राण्यांमध्ये मोठा आहे शरीराने; म्हणून तो शक्तिमान तर आहेच; त्याचबरोबर सगळ्यात बुद्धिमानसुद्धा आहे. म्हणूनच गजाननाला आपण बुद्धीची, कलेची देवता मानतो. त्याला जे करायला शिकवू ते तो सहजपणे शिकतो. मग ते अवघड काम असो किंवा कला.”
ओवी एकदम उसळलीच. म्हणाली, “अगं हो... मी सर्कस बघितली. तेव्हा हत्ती क्रिकेट खेळत होते, देवाची पूजा, आरती करत होते. एवढं मोठ्ठं शरीर एका पायावर तोलून धरत छोट्याशा स्टुलवर उभे होते. खरंच आजी त्यांना खूप गोष्टी येत होत्या. “पण मला एक कळलं नाही; आजी, तुला आत्ता हत्तीची आठवण का आली?” ओवीच्या तोंडाचा चंबू आणि चेहर्‍यावरचं प्रश्‍नचिन्ह पाहून आजी हसून म्हणाली, “बघ तुला आता जवळजवळ दोन महिन्यांची सुट्टी लागणार. ती काय लोळत घालवायची का? त्यापेक्षा हत्तीसारखं बलवान होण्यासाठी रोज व्यायाम कर, ज्ञानात भर घालण्यासाठी भरपूर वाचन कर, शब्दकोडी सोडव आणि हो गायन, वादन, नृत्य, चित्र काढणे, रंगवणे, क्विलिंग पेपरपासून छान छान वस्तू करणे, सोपे सोपे चटपटीत पदार्थ करायला शिकणे अशा विविध कलांमध्ये स्वत:ला तयार कर.” “गुड वन, आजी! फूल रिस्पेक्ट. मग शाळा सुरू झाल्यावर कॉलर ताठ करून सांगणार, मी सुट्टीत काय काय शिकले ते.” ओवीने खूश होऊन आजीला कडक सॅल्यूट ठोकला. आजीनी हळूच शेंगदाण्याचा लाडू ओवीच्या तोंडात भरवला आणि हातात पुस्तकही दिलं.

- शुभांगी देशपांडे
विद्यापीठ हायस्कूल, पुणे