“आजी ऽऽ लवकर इकडे ये अगं येना पटकन.” “अगं हो हो आलेच. काय झालं एवढं?’आजी देवघरातून लगबगीने ओवीजवळ आली.  तर ओवी भिंतीच्या जवळ जाऊन काहीतरी आश्‍चर्याने पाहत होती. लांबच लांब मुंग्यांची रांग. डोक्यावर पांढरे कण असणारी मुंग्यांची ती शिस्तबद्ध रांग खूपच छान दिसत होती. “अगं किती लांबून येतात या. त्यांचे पाय नाही का दुखत?” आजी हसून म्हणाली, “अगं जिद्द असेल तर आपणसुद्धा, ‘इधर की दुनिया उधर करु शकतो.” आता हे सुभाषित ऐक, -

‘योजनांना सहस्त्रं हि शनैर्गच्छेत् पिपीलिका

अगच्छन् वैनतेयोडऽ पि पदमेकं न गच्छती॥

म्हणजे छोटी मुंगी जिद्दीने हळूहळू चालत हजारो मैल अंतर पार करते पण कधी कधी, पक्ष्यांचा राजा असणारा गरुड इच्छा नसली तर एक पाऊलही पुढे जात नाही.

     यासाठी ओवी तुला आणखी एक छान उदाहरण सांगते. तू ज्या महर्षी कर्वेस्त्री शिक्षण संस्थेत शिकतेस त्या संस्थेची स्थापना करणारे महर्षी कर्वेसुद्धा असेच जिद्दीने कामाला लागले आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी कष्ट करण्याची मनाची तयारी केली. जसा मुंगीचा जीव छोटासा, तशी महर्षी अण्णांची मूर्तिसुद्धा लहानच होती. ते अबोल, भिडस्त होते. अगं एकदा तर त्याच्या अबोल स्वभावामुळे त्यांना परीक्षेलासुद्धा बसता आलं नव्हतं. त्यांची शारीरिक ताकद कमी असली तरी मनाची ताकद खूप जबरदस्त होती. आपल्याकडे काय नाही याचा विचार न करता काय आहे. त्याच्या जोरावरच तुमची एवढी मोठ्ठी संस्था स्त्री शिक्षणाचं एवढं मोठ्ठ काम करतेय. स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाचं व्रतचं जणू अण्णांनी घेतलं होतं आणि ते आजही तसंच चालू आहे.”

     “आजी, मलाही माझी शाळा, संस्था खूप आवडते. आणि मी सुद्धा महर्षी अण्णांसारखी होणार. जिद्दीने खूप अभ्यास करणार संस्थेसाठी काम पण करणार. मी पण मुंगीसारखी जिद्दी होणार.”

     “शहाणी गं माझी जिद्दी मुंगी. माझ्या या शहाण्या मुंगीला गोड गोड आंबाबर्फी देते.”आजीने मायेने म्हणाली.

- शुभांगी देशपांडे, सहशिक्षिका

विद्यापीठ हायस्कूल